Wednesday, August 12, 2026

…म्हणून साजरी करतात दिव्याची अमावस्या?

Share

समजून घेऊया महत्त्व आणि परंपरा

भारतीय संस्कृतीत सण समारंभ, व्रतवैकल्ये यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक राज्यात, गावात हे सण साजरे करण्याची खास पद्धत आहे. आषाढ महिना संपून श्रावण सुरु झाला की महाराष्ट्रात सणांची रेलचेल सुरू होते. श्रावणात तर श्रावणी सोमवार, मंगळागौर, जीवतीची पूजा, नागपंचमी, राखीपौर्णिमा गोपाळकाला असे एका मागोमाग एक सण येतात. साधारणपणे या सणांचा आणि ऋतूचा जवळचा संबंध असतो. हिंदू संस्कृतीत सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण त्यामागे शास्त्रीय कारणेही दडलेली असतात. आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरू होण्याचा शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या, ज्याला दिव्यांची आवस असंही म्हटलं जातं.


दिव्यांच्या अमावस्येचे महत्त्व

या दिवशी दिव्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. घरातील चांदीचे, तांब्या-पितळ्याचे, मातीचे सगळे दिवे स्वच्छ घासून पुसून ते देवापुढे लावले जातात. यामध्ये समई, पणती, निरांजन असे विविध दिवे आसनावर मांडून त्याची हळद-कुंकू वाहून पूजा केली जाते. तेल किंवा तूप आणि वात घालून हे दिवे प्रज्वलित केले जातात. दिवा हा प्रकाश, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक असल्याने दिव्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. वर्षभर घरात सुख, शांती आणि समृद्धी राहावी, अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश निर्माण व्हावा, अशी प्रार्थना केली जाते. या दिव्यांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. साधारणपणे या दिवशी कणकेचे दिवे करुन त्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो. नंतर हे दिवे प्रसाद म्हणून खाल्लेही जातात. ते करणे शक्य नसेल तर खीर किंवा गोडाचा कोणताही पदार्थ केलेला चालतो.

असे करायचे कणकेचे दिवे
गुळाचे पाणी करुन घ्यायचे. कणीक आणि थोडा बारीक रवा घेऊन त्यात थोडेसे मीठ घालायचे. आवडीप्रमाणे यात हळद घातली तरी चालते. गुळाच्या पाण्यात ही कणीक भिजवून घ्यायची. या कणकेचे दिव्याचे आकार करुन ते इडलीच्या कुकरमध्ये उकडून घ्यायचे. या दिव्यांमध्ये तूप घालून त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग प्रसाद म्हणून खायचे.

पितरांसाठीही एक दिवा लावण्याची पद्धत

दीप अमावस्या ही सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते. अमावस्या ही मुख्यतः पित्रांनाच समर्पित असते. यादिवशी पितरांचे पूजन तर्पण केल्याने पितृदोष नाहीसा होतो व पितरांची कृपा कुटुंबावर राहते. त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी एक दिवा लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्याने हा दिवा घरातील दक्षिण दिशेला लावावा असे शास्त्रात सांगितले आहे.

– सायली जोशी-पटवर्धन

अन्य लेख

संबंधित लेख