Monday, March 16, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान

Share

अहिल्यानगर (राहुरी) : देशाच्या अन्नसुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय शेतीचे भविष्य आता तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या विशेष प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यपाल महोदयांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.

पदवी स्वीकारल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. “शेतकऱ्यांना पाणी सुरक्षेसोबतच आता वीज सुरक्षा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे या वर्षाअखेरपर्यंत १४ हजार मेगावॉट वीज निर्मिती केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज मिळणे शक्य होईल,” असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील दहा वर्षांत शेती क्षेत्रात मूलगामी बदल करण्याचे काम शासनाने केले आहे. पायाभूत सुविधांमध्ये शाश्वत बदल करून कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविता येईल. पावसाचा पडणारा थेंब अन् थेंब साठविला पाहिजे, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना आणली; ज्यामुळे महाराष्ट्रात भूजल पातळी वाढली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरण बदलामुळे कृषी क्षेत्रात सर्वाधिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. देशात ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेत सर्वाधिक १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांना डिजिटल ओळख दिली आहे. हा डेटा वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. महाविस्तार ॲपद्वारे शेतकऱ्यांना सल्ला दिला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे २५ टक्क्यांपर्यंत उत्पादन खर्च कमी होत असून 50 टक्के उत्पादन वाढत आहे. शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी शाश्वत शेतीचे मॉडेल उपयोगी येणार आहे. कृषी क्षेत्रात आपल्याला पुढील दहा वर्षांत अजून खूप परिवर्तन करायचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रातील बदलासाठी कृषी विद्यापीठे, राज्य शासन यासोबतच कृषी पदवीधर यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीला पुढे नेणे आवश्यक असून केमिकलचा वापर कमी करणे आवश्यक आहे. माती खराब होणार नाही मोठ्या प्रमाणात संशोधन होत असून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले पाहिजे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून काम केले तर त्याचा चांगला बदल दिसेल. उत्पादन खर्च कमी करून मूल्यसाखळी तयार करावी लागणार आहे. कृषी तंत्रज्ञानावर आधारित उद्योग कसे वाढवता येतील यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख