ठाणे : सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रांत नैतिकतेचे पतन होत असताना, भावी पिढीला रामायण, महाभारत आणि थोर महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांची ओळख करून देण्यासाठी ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ सातत्याने कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सांस्कृतिक परीक्षेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ठाणे विभागातील ७८ शाळांमधील ९ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षकांचा नुकताच ठाण्यात एका विशेष सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी ‘राष्ट्रपती पुरस्कार’ विजेते शिक्षक डॉ. नरेंद्र पाठक, सामाजिक कार्यकर्ते अभयराव जगताप आणि अनुराधा गोखले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र पाठक यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडीतील सर्वात वरच्या थरावरील बाळकृष्णाची, तर शिक्षकांना त्या मनोऱ्याचा भक्कम ‘आधारस्तंभ’ अशी उपमा देऊन त्यांचे कौतुक केले. “श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी समाजात भ्रम पसरवून राजकारण केले जात आहे,” अशी परखड टीका करत त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे अभिनंदन केले. अभय जगताप यांनी प्रतिष्ठानच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले, तर अनुराधा गोखले यांनी भारतीय संस्कृतीच्या महानतेवर प्रकाश टाकला.
मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा संकल्प
आगामी काळात इयत्ता ५ वी ते १० वी मधील मुलींना सक्षम करण्यासाठी शाळांमध्ये स्वसंरक्षण वर्गांचे प्रशिक्षण देण्याचा मानस प्रतिष्ठानने यावेळी व्यक्त केला. सुरुवातीला केवळ १५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात आता हजारो विद्यार्थी सहभागी होत आहेत, ही अभिमानास्पद बाब असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सोहळ्यात ‘निनाद नृत्यकला निकेतन’च्या वतीने सादर करण्यात आलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून सोहळ्याची सांगता झाली.