सातारा : हिंदू धर्माचा आधारस्तंभ असलेल्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंदिरांसमोरील विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी साताऱ्यात चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता येथे ही परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्यभरातून १ हजारांहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.
मंदिरांचे संघटन काळाची गरज
‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’चे राज्य संघटक संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, मंदिरांचे सरकारीकरण, वक्फ बोर्डाचे वाढते अतिक्रमण, तिरुपती बालाजीसारख्या ठिकाणी प्रसादातील भेसळ आणि मंदिरांच्या भूमीचे घोटाळे यांसारख्या गंभीर समस्यांवर या परिषदेत व्यापक चर्चा होईल. “धर्म टिकला तरच आपण टिकू, त्यामुळे मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पू. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी यावेळी केले.
मंदिर महासंघाची मोठी कामगिरी
मंदिर महासंघाने आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील २ हजार ४०० हून अधिक मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ यशस्वीपणे लागू केली आहे. तसेच महाराष्ट्रातील शेकडो एकर देवस्थान जमीन घोटाळेबाजांपासून वाचवली आहे. कर्नाटकात मंदिरांवरील कर सुधारणा विधेयकाला विरोध करून ते रोखण्यात महासंघाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या परिषदेला राज्याचे फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, जैन मंदिराचे गिरीश शहा, मंदिर क्षेत्रात कार्यरत लेखक-अभ्यासक संदीप सिंह, श्री क्षेत्र आळंदी येथील ‘ज्ञानेश्वर महाराज संस्थान’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज, देहू-आळंदी येथील मंदिरांचे विश्वस्त, ११ मारुति मंदिरांचे विश्वस्त,‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट तसेच, ‘श्री अष्टविनायक मंदिरां’चे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, संत पिठांचे प्रतिनिधी, अन्य मंदिरांचे विश्वस्त आदी मान्यवर या मंथनात सहभागी होतील.
या परिषदेच्या माध्यमातून मंदिरांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी आणि हिंदू मंदिरांची स्वायत्तता जपण्यासाठी एक ठोस दिशा निश्चित केली जाणार आहे.