Thursday, March 26, 2026

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो

Share

मुंबई : रामनवमीच्या पावन मुहूर्तावर मुंबईकर एका ऐतिहासिक दृश्यात्मक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आझाद मैदानावर २६ आणि २७ मार्च २०२६ रोजी तब्बल २००० ड्रोन्सचा भव्य शो आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा यांचा हा अद्भूत मिलाफ सायंकाळी ७:०० वाजल्यापासून मुंबईकरांना विनामूल्य अनुभवता येईल.

या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत होणारा ‘शिवकल्याण राजा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम. शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांना सुरांच्या माध्यमातून उजाळा दिला जाणार असून, त्याच वेळी आकाशात २००० ड्रोन्सच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विविध पैलू साकारले जातील.

या नेत्रदीपक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार आणि खासदार अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

मरीन ड्राईव्हवरील ड्रोन शोमध्ये साकरलेली ‘गुढी’ आणि ‘शिवरायांची प्रतिमा’ पाहून संपूर्ण देश थक्क झाला होता. आता त्याच धर्तीवर, परंतु अधिक भव्य स्वरूपात २००० ड्रोन्सचा वापर करून आझाद मैदानावर कथा सांगणारी दृश्ये साकारली जाणार आहेत. मुंबईतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन शो ठरणार आहे.

वेळ आणि ठिकाण:

दिनांक: २६ आणि २७ मार्च २०२६

वेळ: सायंकाळी ७:०० वाजता

स्थळ: आझाद मैदान, मुंबई

“हा केवळ एक शो नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि प्रगतीचा हुंकार आहे. सर्व मुंबईकरांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे,” असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख