‘राष्ट्र सेविका समिती’च्या स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शारीरिक – घोष (बॅंड) विभागामार्फत शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य ‘विजयघोष-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी ‘घोष प्रतियोगिता’ आणि ‘सांघिक वादन’ होणार आहे.
राष्ट्र सेविका समिती ही महिलांमध्ये काम करणारी अखिल भारतीय संघटना आहे. ‘विजयघोष’ या उपक्रमांतर्गत पुण्यात दोन कार्यक्रम होणार असून कोल्हापूर आणि अहिल्यानगर येथेही कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांची वेळ सायंकाळी साडेपाच आहे. महिला शक्तीचे शिस्तबद्ध संचलन आणि सामूहिक घोष वादन, वादन स्पर्धा हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे. राष्ट्रभक्तीचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्यात विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला ‘राष्ट्र सेविका समिती’च्या वंदनीय प्रमुख संचालिका व्ही. शांताकुमारी यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत. गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंजली तापडिया प्रमुख पाहुण्या म्हणून या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील.
पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता येथे होणाऱ्या कार्यक्रमात समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार आणि प्रसिद्ध संगीतकार सुयोग कुंडलकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
कोल्हापूरमध्ये खासबाग येथील प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे होणाऱ्या कार्यक्रमात समितीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, प्रचारिका भाग्यश्री साठे प्रमुख वक्त्या म्हणून तर ज्येष्ठ तबलावादक राजप्रसाद धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अहिल्यानगरमधील कार्यक्रम रेणावीकर प्रशाला (सावेडी नाका) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला समितीच्या अखिल भारतीय सह घोषप्रमुख प्राची पाटील आणि सुप्रसिद्ध गायिका अपूर्वा निषाद यांची प्रमुख उपस्थिती असेल.