Thursday, July 23, 2026

झुरळांची जत्रा आणि कारभारी सतरा

Share

महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक गावात… गावाच्या देवळाची  दरवर्षी लहान मोठी का होईना पण जत्रा भरते…या जत्रेत सर्व प्रकारची दुकाने थाटली जातात… भजी बटाटेवड्यांपासून खेळण्यांपर्यंत… अगदी जुगार मटक्याचे स्टॉल्ससुद्धा चोरून मारून लावले जातात… त्यामुळे जत्रेत देवाप्रती भक्ति असलेले अगदी थोडे असतात पण हौशे नवशे गवशे यांची मात्र तोबा गर्दी असते…

सध्या दिल्लीच्या जंतरमंतरवर झुरळांची अशीच एक भव्य जत्रा भरलेली आहे…ज्या NEET पेपरफुटी वरून ही जत्रा भरली आहे त्या NEET ची फेरपरीक्षा होऊन त्याचे निकाल देखील जाहीर झाले पण झुरळांची जत्रा मात्र “मढ्यामागून रडं” अशी अजूनही सुरू आहे…

या जत्रेत महाराष्ट्राच्या हौश्या नवश्या गवश्यांची मात्र रेलचेल आहे… विशेषतः भाजपच्या मोदी शहा युगातील जहाल राजकारणामुळे सत्तेच्या सारीपाटावरील “बार्गेनिंग पॉवर” संपलेले बरेच गवशे जत्रेला जाऊन आले…त्यातले काही गवशे तर जत्रेचा कारभारी अमेरिकन झुरळ सम्राट मराठी आणि आपणही मराठी अस्मितेचे स्वयंघोषित एकमेव ठेकेदार असा बादरायण संबंध जोडून जत्रेला जाऊन आले…

वाडवडिलांच्या पुण्याईवर बांडगुळासारखे जगणारे… मध्यंतरी पाठीवर वसलेला डाससुद्धा स्वतःच्या शेपटीने उडवू न शकणारा… आणि सहसा आपला घरचा झोपाळा न सोडणारा… स्वतःचे खासदार आमदार पक्ष आणि चिन्ह सांभाळू न शकणारा मुंबईचा लबाड बोका अगदी मध्यरात्री जत्रेत जाऊन आला… आपल्या विझलेल्या मशालीने आग लावायला गेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा मागून आला… केंद्र, राज्य आणि ज्याला तो वडिलोपार्जित संपत्ती समजत होता ती मुंबई महापालिका… कुठेच सत्तेत भागीदारी नाही की हातात सत्ताही नाही त्यामुळे वेडेपिसा झालेला हा बोका आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे… अनायासे जमलेल्या गर्दीसमोर राणा भीमदेवी थाटाचे भाषण देऊन “आयत्या पिठावर रेघेट्या” मारून आला…

या बोक्याचा सुपारी चघळणारा चुलत भाऊ तसाही दुपार शिवाय उठत नाही आणि मुंबईच्या बाहेर नाशिक शिवाय कुठेही फिरकत नाही… त्याने आपल्या पिल्लाला जत्रेला पाठवलं… एरवी मुंबईमध्ये हिंदी भाषेतला एकही शब्द सहन न होणाऱ्या या बोक्याचे पिल्लू दिल्लीला आंदोलनकर्त्यांशी कोणत्या भाषेत बोलले देव जाणे…

त्या झुरळांच्या जत्रेच्या निमित्ताने का होईना पण भारतीयांच्या विस्मरणात गेलेली बोक्यांची बिरादारी अख्ख्या होल इंडियात टीव्ही चॅनेलवर दिसली…

तेवढ्यात एक महाराष्ट्रातील किंचितसे नेते देखील जत्रेत फेरफटका मारून आले… नेहमीप्रमाणे आपले वेगळेपण दाखवत त्यांनी दिल्लीची जत्रा आपल्या गावात भरवण्यासाठी एक दिवसाचा महाराष्ट्र बंद देखील पुकारला… पण त्या जत्रेत बाकी कोणी दुकाने लावायला तयारच नाही… त्यामुळे त्यांनी आपले एकट्याचेच दुकान थाटून एकट्यानेच आपली जत्रा भरवली… नाही म्हणायला पूर्वजांच्या पुण्याईने त्यांच्या दुकानात थोडीफार हालचाल असते…

शेवटी अमेरिकन झुरळ सम्राटाला आपल्या गोधडीची ऊब द्यायला पोचले महाराष्ट्रातील आरक्षण आंदोलनजीवी गोधडी सम्राट… आपण म्हणजे आपला पूर्ण समाज असा या गोधडी सम्राटांचा गोड गैरसमज झालेला आहे… “आमरण उपोषण” हा त्यांचा आवडता छंद आहे आणि ते त्यांनी बऱ्याच वेळा केलेले आहे… झुरळ सम्राट देखील २ दिवसांच्या आमरण उपोषणाला बसला होता… त्यामुळे गोधडीला ब्लँकेटचे विशेष प्रेम उफाळून आले…

गोधडी सम्राटांच्या वल्गना काय तर… “माझा सगळा समाज दिल्लीला आणेल”, “दिल्ली बंद करेल”… मागे यांनी “पंतप्रधानांचे विमान महाराष्ट्रात उतरू देणार नाही” म्हणून डिंगा मारल्या होत्या…

आता देखील त्यांनी झुरळ सम्राटाला सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत जंतर-मंतरची जागा सोडू नका म्हणून सल्ला दिला आहे… “सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत” जागा सोडायची नसेल तर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तिथे घरे बांधायला हरकत नाही…

आता तर प्रत्येक हौश्या नवश्या गवश्याला काजव्यासारखं वाटू लागलंय की… जंतरमंतरवर पडलेला सगळा उजेड हा आपल्याच पार्श्वभागाचा आहे…एकंदर बघता… जंतरमंतरवर भरलेल्या झुरळांच्या जत्रेची… “झुरळांची जत्रा आणि कारभारी सतरा” अशी केविलवाणी स्थिती झाली आहे…

अन्य लेख

संबंधित लेख