Thursday, July 23, 2026

पाण्याच्या पाऊलखुणा

Share

हर बूंद जिंदगी का

मानवी संस्कृतीचा विकास, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता राखण्यासाठी पाणी हा सर्वात मूलभूत आणि संवेदनशील नैसर्गिक घटक आहे. तथापि, वाढती लोकसंख्या, जलद गतीने होणारे औद्योगिकीकरण आणि हवामान बदलामुळे जागतिक स्तरावर गोड्या पाण्याच्या उपलब्धतेवर अभूतपूर्व ताण निर्माण झाला आहे. यासाठी शासन पातळीवर वेळोवेळी वेगवेगळ्या धोरणांना, उपक्रमांना, अभियानांना राबवण्यात आले आहे. सध्या याचसाठी भारत सरकारने ‘Catch the Rain’ हे नवे अभियान सुरू केले आहे. त्या निमित्ताने, सध्याचा आपला पाण्याचा वापर, आवश्यकता, पाणी प्रश्न, पाणी वितरण, नद्यांचे महत्त्व अशा अनेक विषयांवर आपण चर्चा करणारी ‘हर बूंद जिंदगी का’ नावाने एक ११ लेखांची माला सुरू करत आहोत. त्यातील हा पहिला लेख.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2286237&reg=48&lang=1

पाण्याच्या पाऊलखुणा या आजच्या लेखात, एकूणच पारंपरिक दृष्टिकोनातून पाण्याचा वापर केवळ पाण्याच्या थेट नळावरील वापरापुरता मोजला जात असे, परंतु आधुनिक पर्यावरण शास्त्रामध्ये Water Footprint ही संकल्पना मानवी उपभोग आणि निसर्गाची पाणी वहन क्षमता यांच्यातील संबंधांचे अचूक आणि वास्तववादी चित्र समोर आणते. या पाण्याच्या पाऊलखुणांचे विविध पैलू, जागतिक गोड्या पाण्याचे वितरण, नैसर्गिक जलचक्रातील मानवी हस्तक्षेप, आणि भारत व विशेषतः महाराष्ट्रातील जलसंकटाच्या भविष्यातील स्वरूपाविषयी चर्चा करणार आहोत.

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जलवापर

Water Footprint म्हणजे एखादी व्यक्ती, समुदाय, व्यवसाय किंवा संपूर्ण देशाने वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे वापरलेल्या गोड्या पाण्याचे एकूण आकारमान. ही संकल्पना सर्वप्रथम २००२ मध्ये प्रा. अर्जेन होएकस्ट्रा यांनी मांडली. मानवी व्यवहारामध्ये पाण्याचा वापर दोन प्रकारे होतो:

  • प्रत्यक्ष जलवापर : यामध्ये घरगुती स्तरावर थेट नळातून वापरले जाणारे पाणी समाविष्ट आहे, जसे की पिणे, स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, कपडे धुतणे आणि बागेला पाणी देणे. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडममध्ये एका व्यक्तीचा सरासरी प्रत्यक्ष जलवापर दररोज १४३ लिटर आहे, जो प्रामुख्याने थेट गोड्या पाण्याच्या साठ्यातून येतो.
  • अप्रत्यक्ष जलवापर : हा पाण्याचा छुपा प्रवाह आहे, जो आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या अन्नधान्य, औद्योगिक वस्तू आणि सेवांच्या निर्मिती प्रक्रियेत विविध टप्प्यांवर वापरला जातो. आपण खरेदी करत असलेल्या प्रत्येक वस्तूच्या निर्मितीचा आणि वाहतुकीचा एक निश्चित जल प्रवास असतो, ज्याला आभासी पाणी म्हटले जाते.
गोडे पाणी विरुद्ध खारे पाणी

जरी पृथ्वीचा ७०% ते ७१% पृष्ठभाग पाण्याने वेढलेला असला तरी, त्यातील बहुतांश जलसाठा मानवी वापरासाठी सुयोग्य नाही. पृथ्वीवरील एकूण जलसाठ्यापैकी सुमारे ९७.२% ते ९७.५% पाणी हे समुद्रातील अति-क्षारयुक्त खारे पाणी आहे. यातील केवळ गोड्या पाण्याचे प्रमाण एकूण जलसाठ्याच्या केवळ २.५% ते ३% इतकेच आहे. या एकूण गोड्या पाण्यापैकी सुमारे ७०% साठा हा आर्क्टिक, अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमधील हिमनद्या आणि पर्वतरांगांमधील बर्फाच्या स्वरूपात गोठलेला आहे. उर्वरित गोड्या पाण्यापैकी ३०% साठा हा जमिनीखालील कठीण खडकांच्या स्तरात भूजल म्हणून साठवलेला आहे. नद्या, गोड्या पाण्याचे तलाव आणि पाणथळ जागा यांमध्ये केवळ ०.३% गोडे पाणी भूपृष्ठावर द्रव स्वरूपात उपलब्ध आहे, जे जगातील ८ अब्ज लोकसंख्या आणि जलीय परिसंस्थेचा मुख्य आधार आहे.

भारतातील जल परिस्थिती

जलचक्र ही पृथ्वीच्या निर्मितीपासून (सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी) अविरत सुरू असलेली एक स्वयंचलित भौतिक प्रणाली आहे. मात्र तरीही आपल्या अनियंत्रित वापरामुळे पाण्यावर सध्या बराच ताण आहे. भारताच्या दृष्टीने पहिले तर, जगातील एकूण लोकसंख्येच्या १८% लोकसंख्या भारतात राहते, परंतु भारताच्या वाट्याला जगातील गोड्या पाण्याचे केवळ ४% स्त्रोत आले आहेत. त्यात सध्या भारतात अनियंत्रित भूजल उपसा सुरू झाला आहे. उदाहरणार्थ, पंजाबमध्ये भूजल उपशाचे प्रमाण १५६% च्या वर गेले आहे. मात्र यामुळे हा भाग भविष्यात वाळवंट बनण्याची भीती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील जल परिस्थिती

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक ४३% मोठी धरणे असणारे राज्य आहे. राज्यात ४४,००० गावांमध्ये १ लाखापेक्षा जास्त तलाव आणि लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. तरीही महाराष्ट्र दरवर्षी तीव्र पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करतो. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र ३०८ लाख हेक्टर असून लागवडीयोग्य क्षेत्र २२५ लाख हेक्टर आहे, ज्यातील ४०% क्षेत्र हे कायम अवर्षणप्रवण मानले जाते. राज्यातील जलसंकट हे नैसर्गिक टंचाईपेक्षा व्यवस्थापनातील दोषांमुळे अधिक गडद झाले आहे. महाराष्ट्रातील जलस्रोतांचे वाटणी आणि उपलब्धता खोरेनिहाय सुद्धा अत्यंत असमान आहे; याविषयी पुढील लेखात चर्चा होईलच.

भविष्यातील जलसंकट

भविष्यात पाण्याचा तुटवडा केवळ पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित नसून तो देशाच्या अखंडतेला आणि अर्थव्यवस्थेला खिळ घालणारा ठरणार आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार, पाण्याच्या संकटामुळे २०५० पर्यंत भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (GDP) ६% पर्यंत मोठी घट होऊ शकते. भारतीय बँकांच्या कर्ज वितरणाचा ४०% भाग हा थेट जल-ताण असलेल्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेला असल्यामुळे, पाणी टंचाईमुळे बँकिंग क्षेत्रात बुडीत कर्जाचे (NPA) संकट उभे राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या जलसंकटाला टाळण्यासाठीपाण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापर कमी करणे आणि भविष्यातील जलप्रलय टाळण्यासाठी भारताला एका सर्वसमावेशक ‘चक्रीय जल अर्थव्यवस्थेकडे’ वाटचाल करणे अनिवार्य आहे. पाणी ही केवळ उपभोग्य वस्तू नसून ती भावी पिढीकडून आपल्याकडे आलेली ठेव आहे. आपण आज जर पाण्याचा वापर जबाबदारीने कमी केला नाही, तर भविष्यातील सामाजिक आणि आर्थिक प्रगती केवळ पाण्याच्या एका थेंबासाठी रखडेल यात शंका नाही.

आता, पुढील भागात आपण प्राचीन भारतीय संस्कृतीत पाण्याचे असणारे महत्त्व अधोरेखित करणार आहोत.

Catch the Rain | Official Theme Song
PIB India

Table of contents

अन्य लेख

संबंधित लेख