Thursday, July 16, 2026

चेहरा कायम सतेज हवा, घरीच करा हे सोपे उपाय

Share

सौंदर्य खुलवायला कशाला हव्यात महागड्या ट्रीटमेंटस…

आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. पण रोजच्या धावपळीत आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळतोच असे नाही. कधी आरोग्याच्या तक्रारी तर कधी प्रदूषण आणि इतर गोष्टींमुळे आपली त्वचा खराब होते. पिंपल्स, निस्तेज-काळवंडलेली त्वचा आपल्या सौंदर्यात बाधा आणते. काही वेळा तर त्वचा इतकी निस्तेज दिसते की आपण चक्क आजारी दिसायला लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, सुरकुत्या यांमुळे अकाली प्रौढ दिसायला लागतो. पण त्वचा कायम सतेज आणि टवटवीत दिसली तर आपल्याला आणि समोरच्यांनाही छान वाटते. त्वचा अशी छान दिसावी यासाठी स्वत:कडे थोडे लक्ष देऊन काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात.


चेहरा थोडा निस्तेज दिसायला लागला की आपण आधी पार्लरमध्ये तरी जातो. हजारो रुपये खर्च करुन तात्पुरते चांगले दिसतो मात्र काही दिवसांतच पुन्हा पहिल्यासारखे. काही जणी तर इतका मेक अप करतात की त्यामुळे मूळ चेहरा झाकला जातो. मात्र हे दोन्ही खर्चिक तर असतेच पण ते दिर्घकाळ टिकणारेही नसते. मेकअप केल्याने चेहऱ्यावर त्याचे वाईट परीणाम होण्याचीही शक्यता असते. मग चेहरा कायम टवटवीत राहावा यासाठी घरच्या घरी आणि दिर्घकाळ उपयुक्त होईल असं काय करता येईल याचा प्रामुख्याने विचार करायला हवा. स्वयंपाकघरातील नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास सौंदर्य खुलण्यास कशी मदत होते ते समजून घेऊया…


१. सालं फेकून देऊ नका – आपण बरेचदा पपई, केळं यांसारखी फळं खातो. ही फळं खाताना आपण साहजिकच त्याची सालं काढतो. ही सालं फेकून न देता ती काही वेळ चेहऱ्यावर लावून ठेवा. काकडी, बीट, बटाटा यांसारख्या भाज्यांच्या सालींचाही आपण चेहऱ्यासाठी उपयोग करु शकतो. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिकरित्या क्लिन्सिंग होण्यास मदत होईल आणि चेहऱ्याचा उजळपणा वाढेल.

२. असे करा फेस पॅक – कॉफी, मध, डाळीचे पीठ, हळद, साय, मुलतानी माती, केळी, दही यांसारख्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून आपण घरच्या घरी फेसपॅक तयार करु शकतो. आपल्या त्वचेला कोणत्या गोष्टी सूट होतात ते पाहून योग्य तो पॅक तयार करावा. यामध्ये असणारे घटक नैसर्गिक असल्याने ते त्वचेसाठी घातक नसतात. त्यामुळे त्याचा उपाय नाही झाला तरी अपाय नक्कीच होत नाही.

३. त्वचा मॉईश्चराईज ठेवा – त्वचा सतेज ठेवण्यासाठी ती सतत हायड्रेट राहणे आवश्यक असते. अशावेळी चेहरा धुतल्यावर त्याला मॉईश्चरायजर लावणे आवश्यक असते. मॉईश्चरायजर सतत लावायचे नसेल तर चक्क तेल, लोणी, तूप यांचाही वापर आपण करु शकतो. यामुळे त्वचा छान ग्लो करते. तसेच दिवसभर भरपूर पाणी पिणेही अतिशय आवश्यक असते.

४. फेस मसाज महत्त्वाचा – आपल्याला याची फारशी सवय नसते. पण वेळ मिळेल तेव्हा चेहऱ्याला छान मसाज केल्यास चेहऱ्यावरचा ग्लो टिकून राहण्यास मदत होते. यासाठी फेस टॅपिंग, फेस योगा यांसारख्या गोष्टींचा चांगला उपयोग होतो.

५. जीवनशैली – व्यायाम केल्याने आपल्याला घाम येतो आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात. यामुळे नकळतच चेहऱ्यावर छान ग्लो येतो. पुरेशी झोप झाली तरीही पोट साफ राहते आणि त्वचा चमकदार दिसायला मदत होते. याशिवाय आपला आहारही संतुलित असेल तर शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळतात आणि त्वचेचे चांगले पोषण होते. त्यामुळे जीवनशैलीशी निगडीत या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी.

– सायली जोशी-पटवर्धन

अन्य लेख

संबंधित लेख