Saturday, July 18, 2026

तंबोऱ्याच्या स्वरांवर संकटाचे सावट!

Share

भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा हा तंबोऱ्याच्या अखंड, संथ आणि ध्यानस्थ करणाऱ्या सुरांमध्ये वसलेला असतो. चार तारांमधून निघणारा हा नाद प्रत्येक गायकाला आणि वादकाला स्वरांचे एक भक्कम कोंदण पुरवतो आणि त्यांच्या सादरीकरणाला आधार देतो. अनेक शतके भारतीय संगीताची अनन्य ओळख बनलेले हे पारंपारिक वाद्य आता गंभीर संकटाचा सामना करत आहे. निसर्गात वेगाने होणारे हवामान बदल केवळ शेती, उद्योग किंवा हिमनद्या वितळण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते आता थेट तंबोऱ्याच्या आवाजातील गोडवा, खोली आणि त्याचा अनुनाद (Resonance) नष्ट करत आहे. वाढते जागतिक तापमान, मोसमी पावसाचे बदललेले लहरी चक्र आणि एकूणच पर्यावरणाचा ढासळता समतोल यामुळे तंबोऱ्याचा मूळ आवाज आता हळूहळू पण मुळातूनच बदलत आहे.

वास्तविक पाहता, भारतीय संगीत आणि निसर्गाचे आदिम नाते आहे. बारकाईने ऐकले, तर अनेक तालवाद्यांचे नमुने वेगवेगळ्या पृष्ठभागांवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या आवाजाशी साधर्म्य दर्शवतात. ‘ताल’ या हिंदी चित्रपटाच्या शीर्षकगीतात या नैसर्गिक आवाजांचा झालेला सुरेख संगम आजही रसिकांच्या स्मरणात आहे. अगदी मातीचा घडा किंवा मटकासुद्धा आपल्या संगीताला एक वेगळाच पोत देतो, ज्याचे उत्तम उदाहरण ‘माचिस’ चित्रपटातील ‘चप्पा चप्पा चरखा चले’ या गाण्यात पाहायला मिळते. निसर्गाच्या या विविध रूपांना वाद्यांमध्ये जिवंत ठेवण्याच्या याच समृद्ध परंपरेला आता हवामान बदलामुळे तडे जात आहेत, ही गोष्ट संगीतप्रेमींमध्ये चिंता आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे.
तंबोऱ्याच्या रचनेचा विचार केला, तर त्याचे विविध प्रकार पाहायला मिळतात. हिंदुस्तानी संगीतात प्रामुख्याने वापरला जाणारा आणि महाराष्ट्रातील मिरज या प्रसिद्ध शहरात बनवला जाणारा ‘मिरज-शैलीचा’ तंबोरा हा वाळलेल्या भोपळ्यापासून (तुंबा) तयार केला जातो. याउलट, कर्नाटक संगीतात पसंत केला जाणारा ‘तंजावर-शैलीचा’ तंबोरा पूर्णपणे फणसाच्या लाकडापासून बनवला जातो, त्यात भोपळ्याचा वापर केला जात नाही. गायकाच्या आवाजाच्या पट्टीनुसारही तंबोऱ्याचे वर्गीकरण होते. पुरुष गायकांसाठी जाड तारा असलेला मोठा तंबोरा वापरतात, जो खोल आवाजाची निर्मिती करतो; तर महिला गायकांसाठी बारीक तारा असलेला लहान तंबोरा वापरला जातो, जो वरच्या पट्टीतील स्वरांसाठी योग्य असतो. कुशल कारागीर हे वाद्य अत्यंत मेहनतीने आणि प्रत्यक्ष हातांनी घडवतात.
तंबोऱ्याचा खरा जीव आणि त्याची ओळख त्याच्या गोलाकार रेझोनेटरमध्ये म्हणजेच वाळलेल्या भोपळ्यात असते. हे विशेष भोपळे प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील ठराविक शेतांमध्ये काळजीपूर्वक पिकवले जातात. व्हायोलिन किंवा गिटार हे प्रामुख्याने मॅपल किंवा स्प्रूससारख्या लाकडापासून बनवले जातात, परंतु आपला तंबोरा एका सेंद्रिय भोपळ्यावर अवलंबून असतो. या भोपळ्याची जाडी, त्याचा नैसर्गिक गोलाकार आणि अंतर्गत घनता यावरच तंबोऱ्याचा मुख्य नाद आणि ओव्हरटोन्स अवलंबून असतात. ‘द चेंजिंग इकॉलॉजी ऑफ द कोलकाता तंबोरा’ या अभ्यासातून हे वाद्य भारतीय संगीतकारांना शेकडो किलोमीटर दूर घडणाऱ्या पर्यावरणीय बदलांशी नकळत जोडते!

गेल्या दोन दशकांत पारंपारिक कारागिरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आज मिळणारे भोपळे हे २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत आकाराने खूप लहान, पातळ सालीचे आणि कमालीचे नाजूक झाले आहेत. तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे हे भोपळे वेळेआधी सुकतात. मग त्यांची जाडी वाढत नाही आणि ते तारांचा ताण सहन करू शकत नाहीत. परिणामी, तंबोऱ्यातून निघणारा जो समृद्ध आणि दीर्घकाळ टिकणारा अनुनाद असायचा, तो मिळवणे आता दुर्मीळ झाले आहे.

वाद्यांच्या भौतिक रचनेचा आणि ध्वनिशास्त्राचा विचार केला, तर लाकूड आणि हवेतील आर्द्रता यांचा थेट संबंध असतो. एका निरीक्षणांनुसार, पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे तंबोऱ्याचे लाकूड थोडे प्रसरण पावायचे आणि त्यामुळे वाद्याची कंपन क्षमता वाढून तंबोरा अधिक चांगला आणि घुमारदार आवाज द्यायचा. यालाच संगीतकार ‘वाद्य चांगले गात आहे’ असे म्हणायचे. परंतु आता हवामानातील तीव्र आणि लहरी चढउतारांमुळे लाकडातील आर्द्रतेचे प्रमाण २ ते ४ टक्क्यांनी वेगाने बदलते. तीव्र पाऊस आणि त्यानंतर लगेच तीव्र तापमान यामुळे लाकडाचे आकुंचन-प्रसरण चक्र बिघडले आहे. यामुळे वाद्याचा पूल (जवारी) आणि तारांमधील संतुलन बिघडून वाद्याची ट्युनिंग स्थिर राहात नाही.
या पर्यावरणीय बदलांमुळे पुरवठा साखळी आणि शेतकऱ्यांवरही ताण आला आहे. तंबोऱ्यासाठी विशेष ‘तुंबा’ पिकवणारे लहान शेतकरी आता पिकांवर पडणारी नवीन कीड, बुरशीजन्य रोग आणि अनपेक्षित अवकाळी पाऊस यांमुळे त्रस्त आहेत. पिकांचे सतत नुकसान होत असल्यामुळे अनेक पिढ्यांपासून ही शेती करणारे शेतकरी आता व्यावसायिक हायब्रीड पिकांकडे वळत आहेत. ती वाद्यांसाठी उपयुक्त नसतात. चांगल्या दर्जाच्या नैसर्गिक भोपळ्यांची तीव्र टंचाई असल्याने उत्तम तंबोऱ्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. नवीन शिकणारे कलाकार यामुळे दर्जेदार तंबोरे खरेदी करू शकत नाहीत.
या संकटावर पर्याय म्हणून आता बाजारात फायबरग्लास, कार्बन फायबर किंवा इंजिनिअर्ड लाकडाचा वापर करून कृत्रिम तंबोरे बनवले जात आहेत. हे पर्याय टिकाऊ आणि स्वस्त असले तरी, नैसर्गिक भोपळ्याच्या फायबरमधील सेंद्रिय रचनेमुळे निघणारा जो उबदार, जिवंत आणि नैसर्गिक नाद असतो, तो या कृत्रिम वाद्यांमध्ये नसतो. इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल तंबोरे रियाजासाठी उपयुक्त ठरत असले, तरी ते मूळ तंबोऱ्याच्या समृद्ध ओव्हरटोन्सची जागा घेऊ शकत नाहीत. हा केवळ एक भौतिक बदल नसून आपल्या अमूर्त सांस्कृतिक वारशासमोरील मोठे संकट आहे. आपली गुरु-शिष्य परंपरा ही या विशिष्ट स्वरांच्या अनुभूतीवर आणि लहरींवर टिकून आहे. जर मूळ वाद्याचा आवाजच बदलला, तर येणाऱ्या पिढ्या संगीताचा एक वेगळाच अनुभव घेतील.

हे संकट केवळ भारतापुरते किंवा तंबोऱ्यापुरते मर्यादित नाही, तर जगभर अशा अनेक वाद्यांना फटका बसत आहे. युरोपमधील व्हायोलिन बनवणारे कारागीर स्कॅन्डिनेव्हियन जंगलांमधील स्प्रूस लाकडाच्या बदलत्या गुणवत्तेमुळे चिंतेत आहेत. कॅरिबियन बेटांवर ‘मरिम्बा’ वाद्यासाठी लागणाऱ्या महोगनी लाकडाचा पुरवठा दुष्काळामुळे घटला आहे. जपानमध्ये चक्रीवादळांमुळे त्यांच्या राष्ट्रीय ‘कोटो’ वाद्यासाठी लागणाऱ्या बांबूची गुणवत्ता खराब होत आहे. भारतातही तबला किंवा इतर चर्मवाद्यांसाठी लागणाऱ्या प्राण्यांच्या कातडीऐवजी प्लास्टिकचा वापर वाढल्याने त्यांचा मूळ ध्वनी बदलतो आहे. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल क्रांतीमुळे वाद्यांची निर्मिती सोपी झाली असली तरी, या प्लास्टिक आणि बॅटऱ्यांचा पर्यावरणावरील कार्बन फूटप्रिंट खूप मोठा आहे.

शेवटी, तंबोरा किंवा मरिम्बासारख्या वाद्यांचे रक्षण करणे म्हणजे केवळ वाद्य वाचवणे नसून, ज्या जैवविविधतेवर ही वाद्ये अवलंबून आहेत तिचे रक्षण करणे होय. म्हणूनच, निसर्ग संवर्धनाकडे केवळ पर्यावरणीय दृष्टिकोनातून न पाहता सांस्कृतिक दृष्टीने पाहायला हवे. आता जेव्हा तुम्ही तंबोऱ्याचा तो शांत, गंभीर सूर ऐकाल, तेव्हा विचार करा की तुम्ही शतकांचा प्रवास करून आलेली एक जिवंत, रसरशीत परंपरा ऐकत आहात. मात्र, आता एका डिजिटल भविष्याकडे वाट चालत आहे आणि तिला वाचवणे शेवटी आपल्याच हातात आहे…

अन्य लेख

संबंधित लेख