Friday, August 14, 2026

पवारांचा फुलटॉस; फडणवीसांचा षट्कार….

Share

चाकण औद्योगिक वसाहतीतील २० कंपन्या वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारला लक्ष्य केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्याला राजकीय रंग न देता आकडेवारी आणि वस्तुस्थितीच्या आधारे उत्तर देत विरोधकांच्या दाव्यांमागील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्याच्या आकडेवारीवरून काही जणांनी महाराष्ट्रातून उद्योग निघून जात असल्याचे चित्र उभे केले. मात्र, फडणवीस यांनी या आकडेवारीचा संदर्भ स्पष्ट करताना सांगितले की, बंद झालेल्या कंपन्यांपैकी ७६ टक्के कंपन्या ‘डिफंक्ट’ म्हणजे प्रत्यक्षात कधी सुरूच न झालेल्या कंपन्या आहेत. त्यामुळे केवळ ‘कंपन्या बंद’ हा आकडा दाखवून महाराष्ट्रातील उद्योगविश्व अडचणीत असल्याचे चित्र रंगवणे दिशाभूल करणारे ठरू शकते.

फडणवीस यांनी याउलट महाराष्ट्राची उद्योग क्षेत्रातील ताकदही आकडेवारीसह मांडली. देशात सध्या सर्वाधिक नोंदणीकृत कंपन्या महाराष्ट्रात असून त्यांची संख्या ३ लाख ९६ हजार २११ आहे. २०२५-२६ मध्ये देशातील प्रमुख राज्यांमध्ये सर्वाधिक ४१ हजार ५२५ नव्या कंपन्यांची नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे.

म्हणजेच, एका बाजूला ‘कंपन्या बंद झाल्या’ असा गजर आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक नव्या कंपन्यांची नोंदणी आकडे स्वतःच कोणते चित्र खरे आहे, हे सांगत आहेत.

विशेष म्हणजे, फडणवीस यांनी चाकणच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. उलट चाकणमध्ये समस्या आहेत, हे स्पष्टपणे मान्य करत उद्योगमंत्री उदय सामंत यांना तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. १२ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा परिषद अशा संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात आली असून समस्यांवर अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडाही निश्चित करण्यात आला आहे.

त्यामुळे फडणवीसांच्या भूमिकेचा गाभा स्पष्ट आहे, समस्या आहेत म्हणून त्या नाकारायच्या नाहीत आणि समस्यांचा आधार घेत महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राची चुकीची प्रतिमा निर्माणही होऊ द्यायची नाही.

पवारांनी चाकणमधील २० कंपन्यांचा मुद्दा उपस्थित केला; फडणवीसांनी त्यावर थेट उपाययोजनांची माहिती दिली. पवारांनी रोजगार वाचविण्याची चिंता व्यक्त केली; फडणवीसांनी ‘एकही उद्योग बाहेर जाऊ नये’ हा सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.

आता या चर्चेत उपहासाची खरी जागा आकडेवारीच्या राजकारणाला आहे. ‘३६ हजार कंपन्या बंद’ एवढेच सांगितले तर महाराष्ट्र उद्योगविहीन होत असल्याचे चित्र दिसते; पण त्यातील ७६ टक्के कंपन्या प्रत्यक्षात सुरूच झाल्या नव्हत्या, हे सांगितले की चित्रच बदलते!

म्हणूनच चाकणच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी असली, तरी महाराष्ट्राच्या उद्योगविकासाच्या आकडेवारीला ‘कोंडी’ झालेली नाही, हे फडणवीसांनी आकडेवारीतून दाखवून दिले आहे.

आता सरकारसमोरचे पुढचे लक्ष्यही स्पष्ट आहे आकडेवारीत महाराष्ट्र क्रमांक एकवर आहेच; प्रत्यक्ष उद्योगांसाठीही महाराष्ट्र क्रमांक एकवरच राहावा, यासाठी चाकणच्या समस्या सोडवणे.

अन्य लेख

संबंधित लेख