Friday, September 4, 2026

दिव्यांग शिक्षणाला ‘दिशा’!

Share

महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘दिशा अभियान’च्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचे काम केले जात आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’चे उद्दिष्ट साध्य करताना समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वसमावेशक विकास होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४७० हून अधिक शाळा, २७०० हून अधिक शिक्षक आणि २१ हजारांपेक्षा अधिक दिव्यांग व बौद्धिक अक्षम विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत. या विद्यार्थ्यांना आधुनिक अध्यापन तंत्राच्या आधारे शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दिव्यांग कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष शिक्षकांचा प्रतिनिधिक सत्कारही करण्यात आला.

दिव्यांग विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ गुणांच्या आधारे न करता त्यांचा आत्मविश्वास, सामाजिक समरसता आणि समाजात सहभागी होण्याची क्षमता यांनाही महत्त्व देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शासन आणि सेवाभावी संस्थांच्या संयुक्त सहभागातून या क्षेत्रात उल्लेखनीय काम उभे राहिले असून, महाराष्ट्र दिव्यांग शिक्षणाच्या क्षेत्रात देशासाठी दिशादर्शक ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमात जय वकील फाउंडेशन, बजाज फिनसर्व्ह, एचटी पारेख फाउंडेशन यांसह विविध सामाजिक संस्थांचे योगदान आहे. त्यांच्या संवेदनशील कार्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष आभार मानले.

यावेळी महाराष्ट्रातील विशेष शिक्षकांचा प्रतिनिधिक सत्कार करण्यात आला. तसेच ‘दिशा अभियान’ प्रभावीपणे राबविणाऱ्या विविध विशेष शाळांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख