प्रस्तावना
धर्म- लग्नकार्यापासून ते थेट निवडणुकीच्या राजकारणापर्यंत हा शब्द आपल्या डोक्यावर अक्षरशः घोंघावत असणार शब्द. पण कधी आपल्याला प्रश्न पडतो का, की या ‘धर्म’ शब्दाचा खरा अर्थ काय?
बऱ्याचदा आपण इंग्रजीतल्या ‘रिलिजन’ किंवा उर्दूतल्या ‘मजहब’ या शब्दांना धर्म समजण्याची गल्लत करतो. रिलिजन किंवा मजहब म्हणजे एक विशिष्ट उपासना पद्धत, एखादा पंथ किंवा संप्रदाय. पण भारतीय संस्कृतीने ज्या ‘धर्मा’चा विचार केला, तो यापेक्षा व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. तो एखाद्या वारापुरता किंवा प्रार्थनेच्या वेळांपुरता मर्यादित नाही, मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून टाकणारी एक वैश्विक प्रणाली आहे, असे दिसून येते.
‘धर्म’ शब्दाचा उगम
या शब्दाचा उगम कसा झाला, हे पाहूया. संस्कृतमध्ये ‘धृ’ नावाचा एक मूळ धातु आहे, ज्याचा अर्थ होतो धारण करणे, आधार देणे, रक्षण करणे किंवा एखादी गोष्ट टिकवून ठेवणे.
यावरूनच प्राचीन विद्वानांनी धर्माची व्याख्या केली- ‘धरति लोकान् ध्रियते पुण्यात्मभिः इति वा धर्मः|’ सोप्या भाषेत सांगायचं तर, ‘जी व्यवस्था संपूर्ण सृष्टीला, समाजाला आणि आपल्यासारख्या माणसांना एकत्र बांधून ठेवते, जिच्यामुळे आपले अस्तित्व टिकून आहे, तो म्हणजे धर्म.’ याचा दुसरा एक अर्थ म्हणजे, जो मार्ग चांगल्या, चारित्र्यवान आणि प्रामाणिक लोकांनी स्वतः जगून दाखवला, तो मार्ग म्हणजे धर्म. थोडक्यात, विश्वाची सुंदर व्यवस्था आणि मनुष्याचे आद्य कर्तव्य म्हणजेच धर्म.
ऋग्वेदापासून उपनिषदांपर्यंतचा प्रवास
या शब्दाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. ऋग्वेद काळात, निसर्गाचे नियमन करणारी शक्ती आणि विश्वाचे पोषण करणारे निसर्गाचे नियम म्हणजे धर्म मानले गेले. ऋतुचक्र नियमित चालणे, सूर्य-चंद्र वेळेवर उगवणे या नैसर्गिक व्यवस्थेला म्हणजेच ऋताला धर्म म्हटले गेले.
पुढे वाजसनेयी संहिता आणि अथर्ववेदाच्या काळात आचरणाचे नियम, यज्ञ आणि त्यातून मिळणारी ‘नैतिक शक्ति’ किंवा ‘पुण्य’ या अर्थाने धर्म हा शब्द वापरला जाऊ लागला. उपनिषदांच्या काळात मोठी वैचारिक क्रांती झाली. धर्माला माणसाच्या रोजच्या आयुष्याशी आणि कर्तव्याशी जोडलं गेलं. माणसाच्या आयुष्याचे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचे टप्पे म्हणजेच आश्रम आणि प्रत्येकाचे समाजाप्रती असलेले कर्तव्य येथे स्पष्ट करण्यात आले. ‘धर्मो नाम कर्तव्य:’ व्याख्येनुसार, नीतिधर्म, विद्यार्थीधर्म, गृहस्थ धर्म, माणुसकीचा धर्म, न्याय देणे हा न्यायाधीशाचा धर्म, तर चूक झाल्यास प्रायश्चित्त धर्म किंवा संकटाच्या काळात स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तात्पुरता स्वीकारलेला मार्ग. असे विविध धर्म सांगितले आहेत.
थोर ऋषीमुनी आणि धर्मशात्र
प्राचीन ऋषीमुनींनी या धर्माची लक्षणे सांगितली आहेत, जिच्यापुढे आपण नतमस्तक होतो.
- कणाद ऋषी: यांनी वैशेषिक सूत्रात धर्माची अत्यंत व्यावहारिक आणि आधुनिक व्याख्या केली आहे. ते म्हणतात, ज्या जीवनपद्धतीमुळे माणसाला या जगात भौतिक प्रगती, संपत्ती, सुख आणि उत्तम आरोग्य मिळते; आणि त्याच वेळी मनाला आंतरिक शांतता व मोक्ष मिळतो, तोच खरा धर्म. केवळ भौतिक किंवा केवळ अध्यात्म हवे असेही नाही; दोन्हीचा सुवर्णमध्य म्हणजे धर्म.
- महर्षी जैमिनी: यांनी वेदांनी उपदेश केलेल्या समाजोपयोगी, कल्याणकारी गोष्टी आचरणात आणण्याला धर्म मानले. कारण, एक माणूस चुकू शकतो. मात्र अनेक दृष्टयांच्या आणि ऋषींच्या वैचारिक मंथनातून आलेले वेदांचे ज्ञान हे सर्वंकष विचार करायला मदत करते आणि म्हणूनच आचरणीय आहे.
- महर्षी व्यास: महाभारताच्या शांतिपर्वात व्यासांनी धर्माचा सामाजिक पैलू मांडला. त्यांच्या मते, जो समाजाला धारण करते, माणसांना विस्कळीत होण्यापासून वाचवून एकत्र बांधून ठेवते, तो धर्म होय. व्यासांनी एक सुवर्णनियम सांगितला जो आजही जगाला लागू पडतो – ‘स्वतःला जे वर्तन दुःखदायक किंवा त्रासदायक वाटते, ते आचरण इतरांशी कधीही करू नका.’
- मनु आणि याज्ञवल्क्य: यांनीही धर्माची व्यावहारिक लक्षणे सांगितली आहेत. यात धैर्य, क्षमाशीलता, मनावर ताबा मिळवणे, चोरी न करणे, अंतर्बाह्य स्वच्छता, बुद्धीचा विकास, सत्य आणि राग न येणे या मूल्यांचा समावेश आहे. सदाचार आणि स्वतःच्या विवेकाचा आवाज ऐकणे यालाच त्यांनी धर्म मानले. आचारः प्रथमो धर्मः। म्हणजे, आचार (चांगले वर्तन) हाच पहिला धर्म आहे. दुराचारी माणसाला वेदांचे किंवा शास्त्रांचे ज्ञान असले, तरी तो पवित्र ठरत नाही. त्यामुळे काळाला सुसंगत अशा धर्मव्याख्या बदलत गेल्या तरी गाभा तोच राहिला.
धर्म आणि विज्ञान: एक सुवर्णमध्य
आजच्या विज्ञानयुगात बऱ्याचदा धर्म आणि विज्ञान यांच्यात नको तेवढे वाद रंगताना दिसतात. पण खरं तर हे दोन परस्परविरोधी नसून एकमेकांना पूरक असणारे पैलू आहेत.
विज्ञानाचे काम हे प्रामुख्याने बाह्य जगताशी, जड सृष्टीशी आणि ‘कसे’ (How) या प्रश्नाशी संबंधित आहे. धर्माचे काम हे मानवाच्या अंतर्जगताशी, नैतिक मूल्यांशी आणि ‘का’ (Why) या प्रश्नाशी संबंधित आहे. विज्ञानामुळे माणसाला शक्ती मिळते, पण त्या शक्तीचा वापर कसा करावा, याचे शहाणपण धर्म किंवा नीतीच शिकवू शकते. इतिहासातील अणुशक्तीचा प्रयोग याची साक्ष देतो.
आपल्या देशात राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर समाजसुधारकांनी ज्या रूढींमुळे समाजात अस्वास्थ्य किंवा अव्यवस्था निर्माण होत होती त्यांना कालानुरूप एक नवे, प्रवाही आणि लोककल्याणकारी रूप दिले.
शेवटी
भारतीय संस्कृती आणि धर्मशास्त्राचा हा संपूर्ण विचार केवळ एका विशिष्ट कालखंडापुरता किंवा विशिष्ट भूभागापुरता मर्यादित नाही. व्यक्तीचा विकास करताना समाजाचे नुकसान होणार नाही आणि समाजाचा विचार करताना निसर्गाचा समतोल बिघडणार नाही, याची काळजी धर्मशास्त्राने घेतली आहे. तसेच जरी, प्रत्येकाचा निहित धर्म वेगवेगळा असेल. तरी, आजच्या अस्वस्थ जगात एकमेकांचा आदर करत ज्याचा त्याचा धर्म म्हणजे कर्तव्य पार पाडणे हीच काळाची खरी गरज आहे आणि आपल्या सर्वांच्या उन्नतीचा मार्ग आहे.