Tuesday, September 1, 2026

“जलो मत बराबरी करो” अमित ठाकरे…

Share

पुण्याच्या शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात “छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो का लावला”, असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो हटवायला लावला… याप्रकरणी प्राचार्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी FIR दाखल केला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २ कार्यकर्त्यांना अटक केली असल्याचे वृत्त आहे…

अमित ठाकरे यांना नरेंद्र मोदी आवडत नसले तरी तिथे त्यांचा लावलेला फोटो हा नरेंद्र मोदी म्हणून लावलेला नव्हता तर भारताचे पंतप्रधान म्हणून लावला होता… आणि शासकीय आस्थापनांमध्ये राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रपती, पंतप्रधानांचे फोटो लावण्याचे भारताच्या संविधानाने निश्चित असे राजशिष्टाचाराचे (protocol) नियम आहेत… नवीन पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पदावर आल्यानंतर केंद्र सरकारकडून त्यांचे अधिकृत फोटो छापून सर्व कार्यालयांना पाठवले जातात… ते पदावर असेपर्यंतच त्यांचे फोटो लावणे बंधनकारक असते आणि पद सोडल्यानंतर ते सन्मानपूर्वक बदलले जातात… आणि त्यानुसारच त्या शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात नरेंद्र मोदी यांचा तो फोटो लावलेला होता… मनसेने लोकसभेला २७२ खासदार निवडून आणावेत आणि राजसाहेब ठाकरे यांना पंतप्रधान करावे… आज देशभरात ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे फोटो आहेत त्या सर्व ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांचे फोटो लागतील आणि राजकीय द्वेषापोटी कोणी ते काढण्याचा प्रयत्न केला तर इतकऱ्याच पोटतिडकीने आम्ही त्या नतद्रष्टाचे वाभाडे काढू…

देशाच्या पंतप्रधानांचा राजशिष्टाचारानुसार लावलेला फोटो काढणे हा गंभीर गुन्हा आहे… म्हणून प्राचार्यांनी तक्रार केली आणि पोलिसांनी FIR नोंदवून अटकसत्र सुरु केले आहे… जर ही कारवाई झाली नसती तर देशात अराजक (anarchy) माजायला वेळ लागला नसता… शासकीय आस्थापनांमध्ये राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रपती, पंतप्रधानांचे फोटो लावण्याचा राजशिष्टाचार त्याचसाठी निश्चित करण्यात आला आहे… अन्यथा ते कोणाच्या निवडीवर सोडले तर देशभरात अक्षरशः अनागोंदी माजेल…

अमित ठाकरे यांना नरेंद्र मोदी यांच्याविषयी द्वेष वाटणे… असूया वाटणे स्वाभाविक आहे… मोदीजींनी २००१ पासून आजपर्यंत एकूण ४ विधानसभा आणि ३ लोकसभा निवडणूका लढवल्या आहेत… प्रत्येक निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्याने बाजी मारलेली आहे… एवढेच नव्हे तर आपल्या पक्षाला देखील लक्षणीय यश मिळवून दिले आहे… आजमितीस  नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या लोकप्रियतेवर पक्षाच्या संघटनेच्या बळावर २४० लोकसभा खासदार आणि १,८११ विधानसभा आमदार निवडून आणले आहेत…

२०१४ ची लोकसभा तर त्यांनी गुजरात (वडोदरा) आणि उत्तर प्रदेश (वाराणसी) अशा दोन राज्यांतून निवडणूक लढवून दोन्ही ठिकाणी दणदणीत विजय मिळवला आहे… आणि आपल्या या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी “राष्ट्र सर्वोपरी” या भूमिकेशी कधीही तडजोड केलेली नाही…

दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे यांनी ते रहात असलेल्या माहीम मतदारसंघातून २०२४ साली विधानसभा निवडणूक लढवली होती… ते नुसते हरले नाहीत तर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले…

२००६ ते त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची दैदिप्यमान कामगिरी तर विचारायला नको… २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आणणाऱ्या मनसेने गेल्या २० वर्षात इतक्या राजकीय कोलांट्या उड्या मारल्या आहेत की… आज त्यांचा एकही खासदार वा आमदार नाही… आणि मुंबई महापालिकेत जेमतेम ६ नगरसेवक आहेत… सोशल मीडियावर तर मनसे म्हणजे “मतदार नसलेली सेना” अशी टर उडवली जाते…

त्यामुळे राजकीय वाताहात झालेल्या अमित ठाकरे यांना जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या नरेंद्र मोदींविषयी द्वेष वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे… आम्ही त्यांची तडफड समजू शकतो…

मात्र यानिमित्ताने देशाच्या पंतप्रधानांविषयी विरोधी पक्षाने आदरभाव दाखविण्याची दोन आदर्श उदाहरणे आम्ही अमित ठाकरे यांना सांगू इच्छितो…

पहिले उदाहरण… १९९९ साली संसदेत भाषण करताना तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक आठवण सांगितली होती…

“१९७७ साली इंदिरा गांधी यांचा पराभव होऊन जनता पक्षाच्या मोरारजी देसाई यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले… अटलजी त्या मंत्रीमंडळात परराष्ट्र मंत्री झाले… एक दिवस त्यांच्या लक्षात आले… पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चित्र संसदेच्या व्हऱ्यांडातून गायब झाले आहे… ते चित्र कोणी काढले? म्हणून अटलजींनी चौकशी केली… कोणीच उत्तर दिले नाही… अटलजींनी पुढाकार घेऊन पंडित नेहरू यांचे ते चित्र होते तिथे लावून घेतले”…

दुसरे उदाहरण… तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ३ ऑक्टोबर २००९ रोजी अरुणाचल प्रदेशला भेट देऊन तिथे

निवडणूक रॅली घेतली होती… त्यानंतर १३ ऑक्टोबर २००९ रोजी चीनने या दौऱ्यावर अधिकृतपणे आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली होती… चीनने केलेल्या विरोधानंतर भाजपचे खासदार आणि प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी अधिकृत पत्रक काढून चीनच्या या उद्धट भूमिकेचा “आमच्या देशाच्या पंतप्रधानांना अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्यासाठी चीनचा व्हिसा घेण्याची गरज नाही” असे सांगून सणसणीत निषेध केला होता… भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांच्या ‘नरम’ भूमिकेवर भाजपने टीका केली होती आणि देशाच्या अखंडतेसाठी सरकारने चीनला चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी संसदेत केली होती…

वरील दोनही उदाहरणांवरून आपले राजकीय मतभेद कितीही असले तरी त्या लढाईची युद्धभूमी वेगळी आहे… देशाचे पंतप्रधान म्हणून आपण त्यांचा सन्मान ठेवलाच पाहिजे… ही भाजपची “वयम् पंचाधिकम शतम्”ची भूमिका देशातील जनतेला भावली आणि भाजप २ वरून ३०३ वर पोहोचला…

अमित ठाकरे यांना भाजपच्या यशाचे आणि आपल्या पक्षाच्या अपयशाचे रहस्य उलगडले असेल अशी आम्हाला आशा आहे… “जलो मत बराबरी करो” अमित ठाकरे…

अन्य लेख

संबंधित लेख