गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीने राष्ट्रवाद, ऐतिहासिक सत्य आणि सामाजिक वास्तव मांडणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून एक नवी दिशा घेतली आहे. मात्र, या बदलत्या चित्रासोबतच काही विशिष्ट घटक आणि विचारसरणीकडून अशा चित्रपटांना विरोध करण्याचे प्रयत्नही सातत्याने होताना दिसतात. याचेच उदाहरण म्हणजे अभिनेत्री अनित पद्दा हिच्या बहिणीच्या प्रतिक्रिया आणि अनितची आगामी ‘हुंकार’ (Hunkkaar – The Roar) ही वेब सिरीज.
अभिनेत्री अनित पद्दा हिच्या बहिणीने राष्ट्रीय विचारसरणीच्या चित्रपटांवर केलेली टीका आणि त्यानंतर अनितच्या नव्या सिरीजचा आलेला टीझर या सगळ्या घडामोडींचा कालक्रम पाहता, यामागे एक विशिष्ट नरेटिव्ह किंवा अजेंडा तर कार्यरत नाही ना, असा प्रश्न पडत आहे.
राष्ट्रीय विचारसरणीच्या चित्रपटांवर टीका
मार्च २०२६ मध्ये अनितची बहीण रीत पद्दा हिची एक सोशल मीडिया पोस्ट प्रचंड वादग्रस्त ठरली. तिने ‘धुरंधर’, ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’ यांसारख्या अत्यंत लोकप्रिय, वास्तववादी आणि राष्ट्रीय अस्मिता जागवणाऱ्या चित्रपटांना प्रोपेगांडा असे संबोधले.
यावरून स्पष्ट होते की, एका बाजूला जेव्हा देशातील सामान्य जनता सत्य घटनांवर आधारित चित्रपटांना उदंड प्रतिसाद देत आहे, तेव्हा दुसरीकडे विशिष्ट विचारसरणीचे लोक या चित्रपटांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. रीत पद्दाच्या या वक्तव्यामुळे नेटिझन्सनी संताप व्यक्त केला होता. आणि रीतच्या या वक्तव्याची पाळेमुळे ही बहिणीच्या या वेबसिरीजमध्ये दिसतं आहेत.
व्यावसायिक यश की नरेटिव्हचा भाग?
अनित पद्दा हिने जुलै २०२५ मध्ये ‘सायरा’ (Saiyaara) या व्यावसायिक चित्रपटातून मोठी ओळख मिळवली. परंतु, रीत पद्दाच्या वादग्रस्त पोस्टनंतर लगेचच जियो हॉटस्टारवर अनितची ‘हुंकार’ ही वेब सिरीजची घोषणा होणे, याच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.
‘हुंकार’चा विषय
आज ‘हुंकार’ सिरीजच्या टीझरवरून, ही कथा एका ‘बापजी’ (गुरु) आणि त्यांच्या आश्रमातील अत्याचाराभोवती फिरते. यामध्ये अनितने १७ वर्षांच्या मीनू रावतची भूमिका केली आहे.
धार्मिक मानसिकतेला लक्ष्य करणाऱ्या विषयांवरील सिरीज याआधीही वादात सापडल्या आहेत. एका बाजूला राष्ट्रवादावर आधारित चित्रपटांना ‘प्रोपोगांडा’ म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला आपणही अशा पुरोगामी प्रोपोगांडा चालवत परंपरा व संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कथांचा भाग व्हायचे, हा विरोधाभास सामान्य जनतेच्या आणि प्रेक्षकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.