भगवान श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व हे केवळ एका देवतेचे किंवा आध्यात्मिक गुरूचे नाही, तर ते भारतीय परंपरेतील एका अद्वितीय ‘व्यावहारिक मुत्सद्दी रणनीतीकाराचे’ मानले जाते. कुरुक्षेत्राच्या रणांगणापासून ते राजदरबारातील सत्तासंघर्षापर्यंत कृष्णाने दाखवलेली रणनीती कोणत्याही एका काळापुरती मर्यादित नसून ती शाश्वत आहे. कृष्णाची मुत्सद्देगिरी केवळ पुस्तकी आदर्शवादावर आधारलेली नव्हती, तर ती परिस्थितीचे भान ठेवून स्वतःचे कर्तव्य, लोककल्याण आणि सामाजिक न्यायासाठी विवेकी कृती करण्यासाठी दिशा दाखवणारी होती.
संकुचित अस्मितांचे आव्हान
आज आपल्या देशात जात, भाषा, प्रांत आणि विविध संकुचित अस्मितांच्या भिंती दिवसेंदिवस अधिक उंच केल्या जात आहेत. निवडणुका किंवा तात्कालिक स्वार्थासाठी माणसाला माणसाशी लढवणे सहज सोपे झाले आहे. परिणामी, हजारो वर्षे एकत्र राहणाऱ्या समाजात अविश्वासाची दरी रुंदावत चालली असून बंधुभाव हरवत आहे.
मात्र श्रीकृष्णाने ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः’ असे सांगून त्याने जन्मावर आधारित श्रेष्ठता नाकारली आणि ‘गुण व कर्म’ याला सर्वोच्च मानले. गोकुळात गोपाळांना लोणी, दूध, तूप मिळण्यासाठी हंडी फोडणारा बालकृष्ण किंवा गोपाळांबरोबर एका पंगतीत ‘काला’ खाणारा कृष्ण, पुढे महाभारताच्या महामंथनातसुद्धा सर्व घटकांना एका सूत्रात बांधण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतो. त्याच्या दृष्टीने व्यक्तीची योग्यता त्याच्या जन्मावरून नव्हे, तर त्याच्या गुणांवरून आणि कर्मावरून ठरली. कृष्णाच्या दृष्टीने समाज हा वेगवेगळ्या तुकड्यांचा समुच्चय नसून, तो एकाच चैतन्याने जोडलेला एक सजीव देह आहे. हाताला लागलेली ठेच जशी संपूर्ण शरीराला कळवळून टाकते, तसेच समाजातील कोणत्याही एका घटकाची उपेक्षा संपूर्ण राष्ट्राला दुर्बल बनवते. आज आपल्याला नेमकी हीच ‘समरसतेची’ भावना रुजवावी लागेल; जिथे जाती-पातीच्या पलीकडे जाऊन ‘आपण सर्व एकाच समाजाचे अंग आहोत’ हा आंतरिक विश्वास जागा होईल.
स्वावलंबनाचा मार्ग
सध्या आपल्या तरुणाईपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न उभा आहे. शहरांकडे होणाऱ्या अंधाधुंद स्थलांतरामुळे खेडी ओस पडत आहेत आणि शहरे बकाल होत आहेत. आपल्या पारंपरिक शेतीकडे आणि स्थानिक कौशल्यांकडे दुर्लक्ष करून केवळ शहरी झगमगाटाला भुलणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. माणसाला केवळ तात्पुरत्या सवलती किंवा मदतीची सवय लावली, तर त्याच्यातला उपजत स्वाभिमान आणि कष्ट करण्याची ऊर्मी संपून जाते; आणि यातून परावलंबनाची नवी साखळी तयार होते.
पांडवांना जेव्हा वाटणीत ‘खांडववन’ मिळाले, तेव्हा ती निव्वळ ओसाड, खडकाळ आणि निरुपयोगी जमीन होती. तिथे कोणताही हताश मनुष्य परिस्थितीला दोष देत बसला असता; पण कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी स्वकष्टाने त्या खडकाळ मातीचे रूपांतर ‘इंद्रप्रस्थ’ या वैभवशाली नगरीत केले. आज तरुणांना केवळ नोकरी मागणारे न बनवता, स्थानिक पातळीवर उद्योग उभे करणारे आणि कौशल्यसंपन्न बनवणे हाच खरा तोडगा आहे. जेव्हा गावागावांत काम निर्माण होईल, तेव्हा अनावश्यक स्थलांतर कमी होईल आणि देश खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल.
मानसिक नैराश्याचा विळखा आणि निष्काम पुरुषार्थ
आजची तरुण पिढी भौतिक सुखांच्या आणि सुविधेच्या जगात वावरत असली, तरी मानसिक पातळीवर कमालीची एकटी आणि तणावग्रस्त आहे. एका बाजूला अवास्तव अपेक्षांचे ओझे, मूल्यहीन स्पर्धा आणि दुसऱ्या बाजूला अपयशाची टोकाची भीती. यामुळे नात्यांमधील संवाद तुटत आहेत आणि समाजमन दिशाहीन होत चालले आहे. आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव खूप प्रकर्षाने आहे, पण समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती असणाऱ्या कर्तव्याचा मात्र सोयीस्कर विसर पडत चालला आहे.
कुरुक्षेत्रावर शस्त्र टाकून रथात बसलेला अर्जुन हा आजच्या संभ्रमित आणि थकलेल्या तरुणाचेच नेमके रूपक होता. त्याला लढायचे नव्हते, कारण त्याला स्वजनांची काळजी होती, त्यामुळे कर्तव्याप्रती नैतिक द्वंद्व निर्माण झाले होते आणि त्याची परिणती म्हणून तो युद्धासाठी शस्त्र उचलीत नव्हता. अशा वेळी कृष्णाने त्याला परिस्थितीपासून पळून जाण्याची खोटी सहानुभूती दिली नाही; उलट त्याच्यातील सुप्त आत्मभान जागे केले. “परिणामांची चिंता बाजूला ठेव आणि सध्याच्या क्षणी तुझ्या वाट्याला आलेले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकतेने कर” हीच ती निष्काम कर्मयोगाची संजीवनी आहे. एकाच कर्मयोगावर अवलंबून न राहता ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग असे परिस्थितीनुसार विविध मार्ग निवडणे गरजेचे आहे. एक मार्ग बंद झाला तरी दुसरे मार्ग उपलब्ध असतात. चारित्र्य, नैतिकता आणि कर्तव्याची जाणीव हाच मानसिक शांततेचा आणि निरोगी समाजजीवनाचा खरा पाया आहे.
श्रीकृष्णाची मुत्सद्देगिरी म्हणजे आंधळा आदर्शवाद नाही आणि स्वार्थी कपटनीतीही नाही; ती आहे ‘परिस्थितीनुसार अंतिम न्यायासाठी चालवलेली विवेकाची वाट.’ आज देशाला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढून स्वाभिमानी, स्वयंपूर्ण आणि संगठित बनवायचे असेल, तर कृष्णनीतीचा हा समतोल मार्ग अत्यंत आवश्यक आहे. वेळप्रसंगी शांतिदूत, सारथी, राजा, मित्र, सखा, भाऊ अशा यथार्थपणे पार पाडलेल्या विविध जबाबदाऱ्या कृष्णाच्या दैवी अंशापलीकडील व्यावहारिक व्यक्तिमत्व अधोरेखित करतात. सामर्थ्यसंपन्न राष्ट्र, समरस समाज, स्वावलंबी अर्थव्यवस्था आणि चारित्र्यसंपन्न नागरिक या चार स्तंभांवरच भारताचे उज्ज्वल भविष्य उभे राहू शकते, हाच संदेश श्रीकृष्णाच्या मुत्सद्देगिरीतून आपल्याला मिळतो.