गेल्या काही दिवसांपासून सौदी अरेबियाच्या शेजारी असलेल्या येमेन मधील हुती बंडखोरांनी सौदी अरेबियात हल्ले सुरू केले आहेत… विशेषतः सौदीतील अमेरिकन लष्करी तळांवर…
मात्र हुती बंडखोरांनी मक्केवर एका ड्रोनने हल्ला केला व आम्ही ते पाडले असा दावा सौदी अरेबियाने केल्यामुळे इस्लामी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे…
सहाजिकच ही “हुती” मंडळी कोण आहे? याबद्दल जनमानसात कमालीची उत्सुकता वाढली आहे…
हुती (Houthi) हा येमेनमधील एक सशस्त्र आणि राजकीय गट आहे… त्याला ‘अंसार अल्लाह’ (देवाचे पाईक) असेही म्हटले जाते…
मुळात “हुती” हे अरब वंशाचे शिया मुस्लिम आहेत… ते मूळचे उत्तर येमेनचे रहिवासी असून… शिया इस्लाममधील झैदी (Zaydi) या उपपंथाचे पालन करतात… यांना ‘फायव्हर शिया’ असेही ओळखले जाते…
इमाम झैद इब्न अली यांना मानणारा झैदी हा शिया संप्रदायाचा उपपंथ असला तरीही… वजू करताना दोन्ही पाय घोट्यापर्यंत पाण्याने धुणे अनिवार्य (फर्ज) मानणे… नमाजाला हात छातीवर किंवा पोटावर बांधून उभे राहणे… दिवसातून ५ वेळा नमाज पडणे… पहिल्या दोन खलिफांना मान्यता देणे… संकट समयी देखील आपली खरी ओळख लपवणाऱ्या “अल तकिया”ला मान्यता न देणे… तसेच त्यांचे कायदे आणि न्यायशास्त्र (Fiqh) हे सुन्नी इस्लामच्या ‘हनफी’ (Hanafi) विचारसरणीशी अत्यंत साधर्म्य दर्शवणारे असल्यामुळे… अनेक शिया विद्वान झैदींना शिया मुसलमान मानतच नाहीत…
हुती समुदायाची लोकसंख्या संपूर्ण येमेनच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३५% (जवळपास १.२ कोटी) आहे… यापैकी सशस्त्र सैनिकांची संख्या सध्या सुमारे ३,५०,००० (साडेतीन लाख) इतकी आहे…
येमेनची उर्वरित ६५% लोकसंख्या प्रामुख्याने सुन्नी मुस्लिम आहे…
परंतु शेकडो वर्षांपासून उत्तर येमेनवर झैदी मुसलमानांची घट्ट पकड होती…
२० व्या शतकांत झैदी शिया पंथाचे अली अब्दुल्ला सालेह १९७८ ते २०१२ अशी ३४ वर्षे येमेनचे राष्ट्राध्यक्ष होते…

तर हुसेन अल-हुती हा येमेनमधील अल्पसंख्याक झैदी शिया समुदायाचा धार्मिक नेता होता…
१९६० च्या दशकात येमेनमध्ये राजेशाही संपल्यानंतर झैदी समुदायाचा राजकीय प्रभाव कमी झाला होता… त्याच वेळी, शेजारील सौदी अरेबियाच्या प्रभावामुळे येमेनमध्ये सुन्नी ‘वहाबी’ (Wahhabi) विचारसरणीचा प्रसार वेगाने होत होता…
आपल्या झैदी धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक ओळख नष्ट होण्याच्या भीतीने हुसेनने या धार्मिक आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी चळवळ सुरू केली…
हुसेन अल-हुती हा अमेरिकन साम्राज्यवाद आणि इस्रायलचा कट्टर विरोधी होता… २००१ मधील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि २००३ मधील इराक युद्धानंतर येमेनचे अध्यक्ष सालेह यांनी अमेरिकेशी जवळीक साधली व दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात अमेरिकेला पाठिंबा दिला…
हुसेन अल-हुतीने या धोरणाचा तीव्र निषेध केला आणि सालेह सरकारवर येमेनचे सार्वभौमत्व अमेरिकेला विकल्याचा आरोप केला… हुसेन अल-हुतीचा मूळ प्रदेश असलेला उत्तर येमेनमधील सादा (Saada) हा प्रांत आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला होता… सालेह सरकारकडून या भागाची होणारी सातत्यपूर्ण उपेक्षा, गरिबी, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यांमुळे स्थानिक लोकांमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष होता…
२००० च्या दशकाच्या सुरुवातीला हुसेनच्या समर्थकांनी मशिदींमध्ये आणि जाहीर सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिका आणि इस्रायल विरोधी हिंसक घोषणाबाजी (‘सरखा’) सुरू केली… यामुळे सालेह सरकारला आपल्या सत्तेला आव्हान मिळत असल्याचा धोका वाटू लागला…
जून २००४ मध्ये सरकारने हुसेन अल-हुतीला अटक करण्याचे आदेश दिले आणि त्याच्यावर बक्षीस जाहीर केले… या अटकेच्या प्रयत्नांमधूनच हुती समर्थक आणि सरकारी सैन्यात सशस्त्र संघर्ष पेटला आणि त्याचे रूपांतर एका मोठ्या बंडात झाले…
सप्टेंबर २००४ मध्ये सरकारी सैन्याने हुसेन अल-हुतीला ठार केले… परंतु त्याच्या मृत्यूनंतर या चळवळीला त्याचेच नाव मिळाले… “हुती बंडखोर” आणि त्याच्या भावांनी हा लढा पुढे सुरू ठेवला…
२०१० च्या दशकातमध्य पूर्व व उत्तर आफ्रिकेत लोकशाही समर्थक, सरकारविरोधी निदर्शने, उठाव आणि क्रांतीची अर्थात् अरब स्प्रिंगची एक मोठी लाट आली…
या अरब स्प्रिंगच्या दरम्यान अब्दुल्ला सालेह यांच्या हुकूमशाही राजवटीविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरोधात जनतेने तीव्र निदर्शने केली… अखेर राजकीय दबावामुळे आणि एका करारांतर्गत २०१२ मध्ये त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आणि सत्ता उप-राष्ट्राध्यक्ष अब्द्रबबुह मन्सूर हदी यांच्याकडे सोपवली…
मात्र २१ सप्टेंबर २०१४ रोजी हुती बंडखोरांनी येमेनची राजधानी साना (Sanaa) वर पूर्णपणे ताबा मिळवला आणि सरकारी संस्था आपल्या नियंत्रणात घेतल्या…
या बंडानंतर तत्कालीन पंतप्रधान मोहम्मद बसिंदवा आणि नंतर २०१५ च्या सुरुवातीला अध्यक्ष अब्द रब्बू मन्सूर हादी यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशातून पळ काढावा लागला…
हुतींच्या या यशस्वी बंडामुळे येमेनमध्ये अधिकृतपणे भीषण गृहयुद्धाला सुरुवात झाली आणि ते आजपर्यंत सुरू आहे…
येमेनमधील या गृहयुद्धात (२०१४ ते सध्या) आतापर्यंत ३,७७,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे…
सध्या हुती बंडखोर हे उत्तर येमेन आणि राजधानी सनाचे प्रत्यक्ष (de facto) शासक आहेत, तर आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकार दक्षिण येमेनमधून (आदेन शहरातून) कार्यरत आहे…
हुती बंडखोर हे शिया पंथीय मुसलमाना असल्यामुळे…
सहाजिकच यहुदी इस्त्राएलाशी त्यांचे जुने कट्टर धार्मिक वैर आहे…
परंतु वहाबी सुन्नी पंथीय सौदी अरेबियाला मुसलमान देश असूनही आपल्या सीमेवर येमेनमधील शिया इराण धार्जिणे हुती बंडखोरांचे सरकार अजिबात नको आहे… त्यामुळे २०१५ मध्ये सौदी अरेबियाने हुतींना रोखण्यासाठी येमेनात लष्करी हस्तक्षेप केला होता… त्यामुळे हुती बंडखोरांचे सौदी अरेबियाशी पराकोटीचे वैर आहे…
अमेरिका ही सौदी अरेबियाची पारंपरिक आणि मुख्य मित्र आहे… अमेरिका सौदीला लष्करी आणि गुप्तचर मदत पुरवते… त्यामुळे हुती बंडखोरांचा सौदी अरेबिया वर भयंकर राग असून अमेरिकेशी देखील वैर आहे…
आत्यंतिक शिया धर्मप्रेमापोटी हुती बंडखोरांना इराणकडून मुख्यत्वे लष्करी, आर्थिक, तांत्रिक आणि गुप्तचर स्वरूपाचे मोठे सहाय्य मिळते… इराणच्या या भक्कम पाठिंब्यामुळेच हुती बंडखोरांची लष्करी ताकद कमालीची वाढली असून त्यांनी लाल समुद्र आणि बाब अल-मंदेब सामुद्रधुनी सारख्या जागतिक स्तरावर महत्त्वाच्या सागरी मार्गांवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे… आणि सौदी अरेबियात खोलवर… अगदी मक्केजवळ धडक मारण्यापर्यंत त्यांची हिम्मत वाढली आहे…