Monday, September 28, 2026

वडगाव पॅटर्न :  राष्ट्रीय सन्मान मिळविणारी सुभाष राठोडांची  जि. प. प्राथमिक शाळा 

Share

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगावने रचलेला नवा इतिहास संपूर्ण राज्यासाठी आशेचा किरण ठरला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत पटसंख्येत झालेली ३२ वरून थेट १०३ पर्यंतची नेत्रदीपक वाढ, कॉर्पोरेट दर्जाच्या आधुनिक डिजिटल सुविधा आणि ग्रामस्थांचा अभूतपूर्व सहभाग यामुळे या शाळेचा ‘वडगाव पॅटर्न’ आज महाराष्ट्रभरात कौतुकाचा विषय बनला आहे.

या शैक्षणिक आणि भौतिक क्रांतीची थेट केंद्रीय स्तरावर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन’ (NIEPA, नवी दिल्ली) या देशपातळीवरील सर्वोच्च शैक्षणिक संस्थेने विशेष दखल घेतली आहे. संस्थेच्या प्राचार्य संघमित्रा त्रिभुवन यांनी या शाळेच्या पुनरुज्जीवनावर आणि यशावर विशेष ‘केस स्टडी’ तयार केली असून राष्ट्रीय स्तरावर या मॉडेलचा सत्कार करण्यात आला आहे.

एकेकाळी २०० हून अधिक पटसंख्या असणाऱ्या वडगाव शाळेची पटसंख्या हळूहळू घसरत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अवघ्या ३२ वर आली होती. शाळा जवळजवळ बंद पडण्याच्या उंबरठ्यावर उभी ठाकली होती. अशा अत्यंत बिकट आणि आव्हानात्मक परिस्थितीत मुख्याध्यापक श्री. सुभाष रामचंद्र राठोड, विषय शिक्षिका श्रीम. सरस्वती गायकवाड आणि श्री. वैजनाथ जाधव या समर्पित शिक्षक चमूने शाळेची धुरा आपल्या हाती घेतली.

विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेकडे आकर्षित करणे आणि पालकांचा सरकारी शिक्षण पद्धतीवरील ढासळलेला विश्वास पुनरुज्जीवित करणे हे या शिक्षकांसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी ‘शाळा गैरहजर विद्यार्थ्यांच्या दारी’ आणि ‘भात लावणी’ हे अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले.

या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधला. मुलांच्या गैरहजेरीची कारणे शोधून त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना केल्या. शिक्षकांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित म्हणजे पालकांचा जिल्हा परिषद शाळेवरील विश्वास पुन्हा दृढ झाला. या उपक्रमाची दखल ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या राष्ट्रीय वृत्तपत्रांसह विविध प्रमुख वृत्तवाहिन्यांनी घेतली.

शिक्षकांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पटसंख्येत टप्प्याटप्प्याने वाढ झालेली आहे.

२०२३-२४: ३२ विद्यार्थी, २०२४-२५: ४९ विद्यार्थी,  २०२५-२६: १०३ विद्यार्थी (पटसंख्येचा १०० पार टप्पा)

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये गावात इयत्ता पहिलीत असलेल्या २४ मुलांपैकी २१ मुलांच्या पालकांनी महागड्या खाजगी इंग्रजी शाळांचा पर्याय नाकारून या जिल्हा परिषद शाळेतच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित केला. हा बदल ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील एक मोठी क्रांती मानला जात आहे.

CSR आणि लोकसहभागातून कायापालट

शाळेचा भौतिक चेहरामोहरा बदलण्यासाठी केवळ शासकीय अनुदानाची वाट न पाहता, शिक्षक एकत्रितरित्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) आणि स्थानिक लोकसहभागाचा (Community Participation) अत्यंत प्रभावी वापर केला. विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क साधून त्यांनी शाळेत हायटेक आणि आधुनिक सुविधांची उभारणी केली:

१. डिजिटल क्लासरूम व आधुनिक संगणक लॅब: ‘अकले अमाईन्स’ कंपनीच्या सहकार्याने शाळेत सुसज्ज संगणक लॅब उभारण्यात आली. अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘Teachmint Interactive Board’ चा वापर सुरू करण्यात आला, ज्यामुळे कठीण विषयही विद्यार्थ्यांना दृकश्राव्य (Audio-Visual) माध्यमातून सहज समजतात. २. हाय-स्पीड इंटरनेट व स्मार्ट ऑडिओ सिस्टीम: प्रत्येक वर्गखोली LAN कनेक्शनद्वारे हाय-स्पीड इंटरनेटने जोडली गेली आहे. प्रत्येक वर्गात २ प्रकारचे आधुनिक स्पीकर, माइक आणि कराओके मायक्रोफोन बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, गायन आणि कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. ३. ‘मुस्कान किताब घर’ (वाचन संस्कृती): विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी स्वयं-अभ्यासाची सुविधा असलेले ‘मुस्कान किताब घर’ हे वाचनालय सुरू करण्यात आले. येथे मुले आपल्या आवडीची पुस्तके मोकळेपणाने वाचू शकतात. ४. पायाभूत सुविधांचा विकास:

  • ‘बिर्ला कार्बन इंडिया लि.’ कडून संपूर्ण शाळेची आकर्षक व बोलकी रंगरंगोटी करण्यात आली.
  • ‘केळकर कंपनी’ कडून कम्पोस्ट प्लँट आणि स्मार्ट टीव्हीची सुविधा पुरवण्यात आली.
  • ‘मर्क लाईफ सायन्सेस’ कडून स्वच्छतागृहांची उत्तम निर्मिती करण्यात आली.
  • सर्व वर्गांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

आनंददायी शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन

केवळ अभ्यासाचे ओझे न लादता शिक्षण ही एक आनंददायी प्रक्रिया कशी बनेल, याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष दिले. दर शनिवारी ‘फन-डे शनिवार’, पावसाळ्यात चिखलातील खेळांच्या स्पर्धा (रोख बक्षीसांसह), वाढदिवस उत्सव (केक व खाऊ वाटप), धबधबा व नदी सहल, गावातून शैक्षणिक रॅली आणि विविध सणांनिमित्त आकर्षक सजावट यामुळे मुले आनंदाने शाळेत येऊ लागली. शालेय पोषण आहारासोबतच विद्यार्थ्यांना नियमितपणे केळी, अंडी आणि बिस्किटे असा पूरक व पौष्टिक आहार दिला जातो. ‘झाड दत्तक योजना’ आणि ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत लावलेली ७५ झाडे १००% जगवण्यात आली. तसेच नोव्होझाइम्स कंपनी व ग्रामस्थांच्या मदतीने २२५ हून अधिक वृक्षारोपण करून परिसरात भाजीपाल्याची सुंदर परसबाग व फुलांची बाग फुलवण्यात आली आहे. याशिवाय ओला-सुका कचरा वर्गीकरण, गांडूळ खत निर्मिती आणि ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण केले जात आहे.

पुरस्कार आणि यशाची मोहर

शाळेने शैक्षणिक आणि भौतिक क्षेत्रात केलेल्या या अफाट कामगिरीमुळे शासनाच्या वतीने विविध पुरस्कारांनी शाळेला सन्मानित करण्यात आले आहे. या शाळेला विशेष ‘ग्रामीण उत्कृष्ट शाळा’ अनुदान देऊन गौरविण्यात आले.  तब्बल १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक शाळेने पटकावले.

“शिक्षकांचे उपक्रमशील अध्यापन, डिजिटल शिक्षण, ABL (Activity Based Learning), ज्ञानरचनावाद आणि स्व-अध्ययनामुळे वडगाव शाळेच्या पटसंख्येत झालेली वाढ कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील इतर सर्व शाळांनी वडगावच्या या उपक्रमांचे आणि ‘वडगाव पॅटर्न’चे अनुकरण केले पाहिजे.”

— मा. पुनीता गुरव (शिक्षणाधिकारी – प्राथमिक, जि. प. रायगड)

“पालकांचा सरकारी शाळेवरील गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमला एक वर्ष अहोरात्र मेहनत करावी लागली. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सरपंच, CSR कंपन्या, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हे अभूतपूर्व परिवर्तन शक्य झाले आहे.”

— श्री. सुभाष राठोड (मुख्याध्यापक, जि. प. शाळा वडगाव)

योग्य ध्येय, शिक्षकांची तळमळ, तंत्रज्ञानाची जोड आणि लोकसहभाग यांच्या संगमातून सरकारी शाळांचाही कॉर्पोरेट दर्जाचा कायापालट होऊ शकतो, हे ‘वडगाव पॅटर्न’ने सिद्ध केले आहे. ही शाळा आज केवळ रायगड जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रासाठी एक दीपस्तंभ आणि मार्गदर्शक वस्तुपाठ ठरली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख