वृत्तांकन – सुशासन संवाद
सुशासन संवाद हा पांचजन्य नियतकालिकाचा कार्यक्रम, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री १० या वेळात ताज हॉटेल, कुलाबा- मुंबई येथे पार पडला. त्यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञ मंडळी येथे एकत्र आली होती. सुशासन म्हणजे काय, नेतृत्व कसे असावे, सामाजिक भान आणि भारतीय विकासाविषयी विविध अंगांनी संवाद, चर्चा आणि व्याख्याने या निमित्ताने झाली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री डॉ. नितेश राणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री व्ही. भागय्याजी, स्वामी निजामृतानंद पुरी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी अभिनेते आणि गोरखपूरचे खासदार श्री रवि किशन, अभिनेते श्री नितीश भारद्वाज, श्री सिद्धार्थ पटणी, सचिव, सीमा सेवा फाउंडेशन, उद्योजिका श्रीमती छाया नंजप्पड आणि NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष कुमार चौहान, अशा दिग्गज मंडळींनी या कार्यक्रमात विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमास हजेरी लावली आणि विविध विषयांवर मोकळेपणाने आपले विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरूवात करताना पांचजन्यचे संपादक श्री हितेश शंकर यांनी या कार्यक्रमासाठी मुंबईची निवड करण्यामागचे विचार मांडले. आजवर मुंबई अनेक बाह्य आक्रमणे आणि घुसखोरीला तोंड देत आली आहे; आणि तरीही तिचे धैर्य आणि विकासाची गती जराही कमी झालेली नाही. म्हणूनच या धैर्यवान शहरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या धैर्यशील नगरीत विचारमंथन करत असताना २०४७ च्या दिशेने आगेकूच करणाऱ्या भारताच्या विकास आणि सुशासनासाठी विचाररूपी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू शर्मा यांनी आपले विचार व्यक्त करताना असे म्हटले की फक्त आर्थिक विकास म्हणजे विकसित भारत नव्हे. अगदी शेवटच्या घटकापर्यन्त सरकारी योजना आणि त्यांचे लाभ पोचणं म्हणजे खऱ्या अर्थाने विकास असेल. त्यासाठी सरकार आणि समाज यांच्यात संवाद हवा तरच आपल्याला सुशासनाचे ध्येय साध्य करता येईल.
या संवादसत्राच्या आरंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री व्ही. भागैया यांच्या हस्ते भगवद्गीतेवर आधारित पुस्तकाचे विमोचन झाले. सध्याच्या genz च्या संदर्भात मुलाखतीत विचारलेल्या
“ भारतात प्रश्न विचारणे आवडत का नाही?” अशा अर्थाच्या प्रश्नास उत्तर देताना भागय्याजींनी मांडलेला एक मुद्दा अतिशय महत्वचा होता. भारताला प्रश्न विचारण्याचे वावडे कधीही नव्हते, कोणतेही उपनिषद काढून बघा, युवा पिढीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधतच त्या परंपरांचा विकास होत आला आहे. प्रश्न विचारणाऱ्या पिढीविषयी गैरसमज करून घ्यायला नको. फक्त या पिढीकडे जसा जोश आहे तसेच होशही हवा असे मत त्यांनी मांडले.
मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची हिंदुत्वाचा पुनरुच्चार करणारी मुलाखत जोशपूर्ण होती. प्रत्येक प्रश्नाचे तर्कसंगत आणि रोखठोक उत्तर देत त्यांनी आपल्या विचार आणि आचारातले हिंदुत्व दाखवून दिले. यानिमित्ताने हलाल मांसविक्रीविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हिंदू खाटीक समाजाची मोहीम असणाऱ्या ‘मल्हार झटका मांस’ चा उल्लेख करून त्याचा अधिकाधिक प्रसार करत हिंदू खाटीक समाजासाठी उभे राहण्याचे आवाहन केले.
बॉलीवूडमध्ये बनणारे विविध ऐतिहासिक सिनेमे, त्यातील ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड याविषयी डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी आपली परखड मते प्रस्तुत केली.
त्याशिवाय मुलांना ott पेक्षा पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करा असे मत अभिनेते नीतिश भारद्वाज आणि अभिनेते रवी किशन दोघांनी व्यक्त केले. सतत पहिल्या अथवा ऐकल्या जात असलेल्या जलद कंटेंट मुळे मुलांमध्ये स्थैर्य निर्माणच होत नाहीये. ते व्हायला हवे असे मत त्यांनी मांडले.
त्याशिवाय सीमान्त सेवा फाउंडेशन चे सिद्धार्थ पटणी यांनी देशाची सुरक्षा ही फक्त सैन्याची जबाबदारी नसून स्थानिक जनतेची आणि पूर्ण समाजाची देखील आहे असे मत व्यक्त केले. याशिवाय श्रीमती छाया नंजप्पा, श्री आशिष कुमार चौहान, स्वामी निजामृतानंद पुरी यांच्या मुलाखती देखील विचारप्रवण अशाच झाल्या.
समारोपाच्या सत्रासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. “महाराष्ट्राला उद्यमशीलता, नवोन्मेष आणि लोकसहभागाची दीर्घ परंपरा आहे. राज्याच्या विकासाच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करताना, या सामर्थ्याला प्रभावी संस्था आणि प्रतिसादात्मक प्रशासनाची जोड देणे, हे आपल्यापुढील आव्हान आहे. आम्ही कौशल्य-आधारित शिक्षण आणि उद्योग-चालित शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून दरी कमी करत आहोत, त्याचबरोबर नवीन उद्योग, स्टार्टअप्सना पाठिंबा आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या उच्च मागणी असलेल्या, भविष्यवेधी क्षेत्रांमधील गुंतवणुकीद्वारे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करत आहोत. आमची उद्दिष्टे आणि आमच्या घोषणा यात सुसंगतता आहे. महाराष्ट्र ऊर्जेचे पुनर्निर्माण करण्यासाठी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांसारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी काम करत आहे, त्याचबरोबर लोक आणि पर्यावरण या दोघांच्याही गरजांना प्रतिसाद देणाऱ्या विकासाचा पाठपुरावा करत आहे.” अशा प्रकारचे विचार त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
समाजाच्या अधिकाधिक सहभागाशी शासनाच्या कृतींचा मेळ घालून त्यातून सुशासन निर्माण व्हावे यादृष्टीने पांचजन्यने आयोजित केलेले एकदिवसीय संवाद सत्र अधिकाधिक विचारप्रवण आणि नवे विचार देणारे ठरले.
-मैत्रेयी जोशी