नवी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठात तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा लोकशाहीचा आवाज घुमणार आहे. २००६ मध्ये बरखास्त करण्यात आलेली विद्यार्थी संघटना पुन्हा बहाल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनाला यश आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने आदेश काढून विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. मोहम्मद महताब आलम रिझवी यांनी आज जाहिर केलेल्या परिपत्रकानुसार पुढील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत:
- विद्यार्थी संघटनेच्या घटनेस मंजुरी मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत निवडणुका पार पडतील.
- आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या निलंबनाच्या आणि ‘कारणे दाखवा’ नोटीस मागे घेण्यात आल्या आहेत.
- आंदोलन काळात सुरक्षारक्षकांच्या वर्तनाची आणि भूमिकेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली जाईल.
- विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात केलेले वादग्रस्त किंवा अब्रूनुकसानीचे पोस्ट सोशल मीडियावरून तात्काळ हटवण्याचे व पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त करण्याचे मान्य केले आहे.
- हा अधिकृत आदेश निघाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले उपोषण आणि आंदोलन तात्काळ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
२० वर्षांचा प्रदीर्घ लढा
जामिया मिलिया इस्लामियामध्ये २००६ मध्ये विद्यार्थी संघटना बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून विद्यापीठात विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणतीही अधिकृत संघटना कार्यरत नव्हती.
आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि विद्यापीठाच्या कारभारात विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. विद्यार्थ्यांच्या या तीव्र भूमिकेपुढे अखेर विद्यापीठ प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.