प्रस्तावना
भारतभूमी ही अनादी काळापासून शक्तीची उपासक राहिली आहे. भारतीय जीवनदृष्टीत स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नसून ती राष्ट्रनिर्मितीची, संस्कृतीच्या संवर्धनाची आणि धर्मरक्षणाची मूळ प्रेरणा मानली गेली आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीकडे कधीही ‘अबला’ म्हणून पाहिले नाही; तर तिला वात्सल्याने समाजाचे भरणपोषण करणारी अन्नपूर्णा आणि राष्ट्रवर संकट कोसळताच हाती शस्त्र घेऊन अन्यायाचा संहार करणारी रणचण्डिका मानले आहे. जेव्हा जेव्हा या पुण्यभूमीवर परकीय आक्रमणांचे काळे ढग दाटून आले, तेव्हा तेव्हा येथील मातृशक्तीने आपल्या बांगड्यांच्या किणकिणीसोबतच तलवारीचा खणखणाटही जगाला ऐकवला आहे. याच उज्ज्वल आणि तेजस्वी परंपरेतील एक देदीप्यमान रत्न म्हणजे कर्नाटकातील कित्तूर संस्थानची स्वाभिमानी वीरांगना —राणी चेन्नम्मा!
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अभ्यासताना सामान्यतः १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला परकीय सत्तेविरुद्धचा पहिला मोठा सशस्त्र उठाव मानले जाते. परंतु, त्याही आधी तब्बल तेहतीस वर्षे—सन १८२४ मध्ये—ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या मुजोरीला आणि विस्तारवादी राक्षसी महत्त्वाकांक्षेला रणांगणावर थेट आव्हान देणारी पहिली रणरागिणी राणी चेन्नम्मा होती. संपूर्ण देशात इंग्रजांच्या कुटील भेदनीतीमुळे मोठमोठे राजे-महाराजे आपले सार्वभौमत्व गमावत असताना, दक्षिण भारतातील एका छोट्याशा संस्थानाच्या राणीने स्वराज्याची आणि राष्ट्रीय स्वाभिमानाची पहिली ठिणगी चेतवली.
कुशल राजकारिणी
बेळगावजवळील काकती या गावात २३ ऑक्टोबर १७७८ रोजी धोंडप्पा आणि पद्मावती या सुसंस्कृत दांपत्याच्या पोटी चेन्नम्माचा जन्म झाला. बालपणापासूनच तिच्यावर स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि शौर्याचे सखोल संस्कार झाले. केवळ अक्षरओळख, भाषा, इतिहास आणि धर्मग्रंथांचे चिंतनच नव्हे, तर घोडेस्वारी, तलवारबाजी आणि धनुर्विद्या यांसारख्या युद्धकलांमध्येही तिने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी अद्वितीय नैपुण्य मिळवले होते. कित्तूरचे पराक्रमी राजे मल्लसर्ज देसाई यांच्याशी विवाह झाल्यानंतर चेन्नम्माने केवळ एक राणी म्हणून नव्हे, तर प्रजेच्या सुखदुःखाशी एकरूप होणारी माता आणि राजकारभाराची उत्तम जाण असलेली प्रशासक म्हणून आपली ओळख निर्माण केली.
पुढे नियतीने चेन्नम्माच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ आणले. सन १८१६ मध्ये पती राजे मल्लसर्ज यांचे निधन झाले आणि त्यानंतर काही वर्षांतच, १८२४ मध्ये तिचा एकुलता एक पुत्र शिवलिंगरुद्र सर्ज यालाही मृत्यूने गाठले. एका पाठोपाठ एक कोसळलेल्या या आघातांनी सामान्यतः कोणीही खचून जाईल; परंतु मनगट बळकट असणारी या वाघिणीने संकटाच्या काळी वैयक्तिक दुःख बाजूला सारून राष्ट्रधर्माला सर्वोच्च स्थान दिले. आपल्या संस्थानाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि राजगादीची परंपरा टिकवण्यासाठी तिने आपल्या विश्वासू सरदारांच्या सल्ल्याने शिवलिंगप्पा या सुयोग्य बालकाला दत्तक घेतले आणि कित्तूरच्या सिंहासनाचा कारभार समर्थपणे हाती घेतला.
दत्तक वारस नामंजूर
तो काळ ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यविस्ताराचा होता. भारतातील एकेक स्वतंत्र राज्य कोणत्या ना कोणत्या बहाण्याने गिळंकृत करण्याचे इंग्रजांचे षड्यंत्र सुरू होते. धारवाडचा तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर सेंट जॉन थॅकरे याने चेन्नम्माचे दत्तक विधान बेकायदेशीर ठरवले आणि कित्तूरच्या तिजोरीवर तसेच प्रशासनावर इंग्रजांचे नियंत्रण लादण्याचा हुकूम सोडला. पुढे लॉर्ड डलहौसीने अधिकृतपणे राबवलेल्या ‘दत्तक वारस नामंजूर’ या अन्यायकारक धोरणाचा हा पहिला मस्तवाल प्रयोग होता. थॅकरेने कित्तूरचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याची भाषा करताच, राणी चेन्नम्माने प्रथम शांततेच्या आणि राजशिष्टाचाराच्या मार्गाने मुंबईच्या गव्हर्नरकडे आपली बाजू मांडली. परंतु, व्यापारी म्हणून आलेल्या आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांना न्यायाची भाषा समजणारी नव्हती; त्यांना केवळ भारताची गुलामगिरी हवी होती.
जेव्हा अनुनयाचे सर्व मार्ग संपतात आणि स्वभूमीच्या अस्मितेवर घाला पडतो, तेव्हा शस्त्र उचलणे हाच खरा धर्म ठरतो, हे राणीने ओळखले. थॅकरेने कित्तूरच्या जनतेला धमकावण्याचा प्रयत्न केला असता, राणीने अत्यंत बाणेदारपणे उत्तर दिले—”कित्तूर हे आमचे स्वतंत्र राज्य आहे. आम्ही इंग्रजांचे मांडलिक नाही आणि तुम्हाला एक पैशाचाही कर देणार नाही. आमच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी आम्ही मागे हटणार नाही!” राणीच्या या सिंहगर्जनेने कित्तूरच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वाभिमानाचा वणवा पेटवला.
शूरता आणि क्षमाशीलता यांचे मूर्तिमंत उदाहरण
ऑक्टोबर १८२४ मध्ये थॅकरेने अफाट सैन्य आणि तोफखाना घेऊन कित्तूरच्या किल्ल्याला वेढा घातला. आपल्याकडील मोजक्याच सैन्याच्या आणि प्रजेच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेच्या बळावर राणी चेन्नम्मा स्वतः पुरुषाचा वेश परिधान करून आणि हाती नंग्या तलवारीनिशी रणभूमीत उतरली. किल्ल्याचे दरवाजे उघडताच कित्तूरच्या वीरांनी इंग्रजी फौजेवर विजेसारखा प्रहार केला. राणीचे एकनिष्ठ सेनापती संगोळ्ळी रायण्णा, अमातूर बाळप्पा आणिगुरुसिद्धप्पा यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला. अमातूर बाळप्पाच्या अचूक गोळीने अहंकारी थॅकरे जागीच ठार झाला आणि ब्रिटिश सैन्याची दाणादाण उडाली.
या पहिल्या युद्धातील विजयानंतर राणी चेन्नम्माने जे वर्तन केले, ते भारतीय युद्धनीतीचे आणि उच्च सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडवणारे होते. युद्धात बंदी बनवलेल्या सर वॉल्टर इलियट आणि स्टीव्हन्सन या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, तसेच इंग्रज स्त्रिया व लहान मुलांना तिने कोणताही त्रास दिला नाही. उलट पुन्हा कित्तूरवर आक्रमण न करण्याच्या अटीवर त्यांना सन्मानाने मुक्त केले. शत्रूच्याही कुटुंबाचा आणि स्त्रियांचा आदर करण्याची ही उदात्त वृत्ती केवळ भारतीय संस्कारांतूनच प्रकट होऊ शकते.
कट करणारे कपटी इंग्रज
परंतु, नीतिशून्य आणि कपटी इंग्रजांनी दिलेला शब्द पाळला नाही. पराभवाचा डंख मनात ठेवून त्यांनी मुंबई, मद्रास आणि सोलापूर येथून प्रचंड फौजफाटा एकत्र केला आणि डिसेंबर १८२४ मध्ये कित्तूरवर पुन्हा आक्रमण केले. शत्रूचे संख्याबळ आणि शस्त्रास्त्रे कित्येक पटींनी अधिक असूनही राणी चेन्नम्मा आणि तिचे वीर सैन्य बारा दिवस अहोरात्र झुंजत राहिले. मात्र, आत्मविस्मृती आणि स्वकीयांच्या फितुरीची कीड येथेही लागली. मल्लप्पा शेट्टी आणि वेंकटराव या घरातीलच फितुरांनी वैयक्तिक स्वार्थापोटी इंग्रजांशी हात मिळवला आणि कित्तूरच्या तोफांच्या दारूगोळ्यात शेणाचे पाणी मिसळून तो निकामी केला. ऐन युद्धात तोफा थंडावल्याने राणीच्या सैन्याची मोठी कोंडी झाली.
अखेर इंग्रजांनी कपटाने राणी चेन्नम्माला बंदी बनवले आणि बैलहोंगलच्या किल्ल्यात कडक पहार्यात ठेवले. चार भिंतींच्या बंदीवासात राहूनही या रणरागिणीचा स्वाभिमान आणि ईश्वरावरील श्रद्धा तसूभरही ढळली नाही. आपल्या मातृभूमीच्या मुक्तीचे स्वप्न उराशी बाळगत, शिवउपासना आणि धर्मग्रंथांचे पठण करत असतानाच २१ फेब्रुवारी १८२९ रोजी या तेजस्विनीने आपला देह ठेवला. तिच्या महान बलिदानानंतरही तिचा मानसपुत्र आणि निष्ठावान सेनापती संगोळ्ळी रायण्णा याने इंग्रजांविरुद्धचा गनिमी लढा सुरूच ठेवला आणि अखेर फासावर जाऊन हौतात्म्य पत्करले.
शतशः वंदन
राणी चेन्नम्माचे समग्र जीवन म्हणजे प्रजेवरील असीम वात्सल्य, कुशल संघटनकौशल्य आणि अन्यायाविरुद्ध तुटून पडणारे दुर्दम्य क्षात्रतेज यांचा अपूर्व संगम आहे. तिने रणांगणावर सांडलेले रक्त वाया गेले नाही, तर त्यातूनच पुढील काळातील स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले. आजच्या काळातही जेव्हा समाजासमोर आणि राष्ट्रासमोर विविध आव्हाने उभी आहेत, तेव्हा प्रत्येक भारतीय स्त्रीच्या अंतःकरणात राणी चेन्नम्मासारखेच संस्कार, राष्ट्रप्रथम मानण्याची वृत्ती, सांस्कृतिक स्वाभिमान आणि कणखर नेतृत्वगुण जागृत होणे, हीच या महान वीरांगनेच्या चरणी खरी आदरांजली ठरेल.