Wednesday, October 21, 2026

पोलीस स्मृती दिनानिमित्त अभिवादन

Share

देशाची आंतरिक सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था राखताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व जवानांच्या बलिदानाचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

https://x.com/CMOMaharashtra/status/2112764937630339248/photo/2

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त नायगाव, मुंबई येथील पोलीस मुख्यालयातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून देशसेवा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विविध देशांचे राजनैतिक अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

लडाखमधील हॉट स्प्रिंग परिसरात २१ ऑक्टोबर १९५९ रोजी सुमारे १६ हजार फूट उंचीवर गस्त घालत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर चिनी सैन्याने गोळीबार केला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस देशभरात पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शौर्याला या दिवशी अभिवादन केले जाते.यंदाच्या वर्षात कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या १५४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या अभिवादन सोहळ्यात पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचा, त्यागाचा आणि देशसेवेच्या भावनेचा गौरव करण्यात आला.

अन्य लेख

संबंधित लेख