Monday, December 1, 2025

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन

Share

बीड : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बीड शहरात ‘विजयी संकल्प सभे’ला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ. ज्योती घोमरे (बीड), गीता पवार (गेवराई), संध्या मेंडके (माजलगाव), रामचंद्र निर्मळ (धारूर) आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बीड (Beed) जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

बीड शहरासाठी ₹५०० कोटींचा निधी आणि मुंडे साहेबांचे प्रेम

फडणवीस यांनी बीड शहरासाठी सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख करत दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. देवेंद्र फडणवीस म्हणाले: “लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांचे बीडवर अत्यंत प्रेम होते. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात बीड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी जवळपास ₹५०० कोटींच्या योजना आपण बीडमध्ये सुरु केल्या आहेत.”

बीड शहराच्या विकास अजेंड्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील दोन प्रमुख समस्यांना अग्रक्रम देण्याचे आश्वासन दिले. बिंदुसरा नदीचे शुद्धीकरण आणि शहरातील पाण्याची समस्या यावर तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, “शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच बिंदुसरा नदीच्या शुद्धीकरणाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.” फडणवीस यांच्या या आश्वासनामुळे बीड शहराच्या पर्यावरणाचा आणि मूलभूत गरजांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

मतदारांना थेट आवाहन
पंतप्रधान मोदींचे विकासाचे व्हिजन बीड जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन फडणवीस यांनी मतदारांना केले. ते म्हणाले, “मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे विकासाचे व्हिजन बीड जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी, उद्या २ तारखेला कमळ चिन्हाच्या विजयाची जबाबदारी आपण घ्या. पुढील ५ वर्षे बीडकरांच्या विकासाची आणि प्रगतीची पूर्ण जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू.” या सभेला मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस व इतर मान्यवर उपस्थित होते. भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार या सभेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

अन्य लेख

संबंधित लेख