Thursday, September 10, 2026

बाप्पाच्या दर्शनाआड सायबर भामट्यांचा डाव..

Share

ऑनलाइन दर्शन, घरपोच प्रसाद, व्हीआयपी पास अन् स्वस्त गणेशमूर्तीच्या आमिषाद्वारे ऑनलाइन लुटीचे जाळे

गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव… १०० वर्षांहून अधिक काळाची समृद्ध परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून मागच्यावर्षी घोषित करण्यात आले आहे.घराघरात विराजमान होणारा बाप्पा, सार्वजनिक मंडळांची रोषणाई, आरास, विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम, दर्शनासाठी होणारी गर्दी, भक्तीमय वातावरण यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हर्षाचे,उत्साहाचे वातावरण असते.

आजमितीला काळ बदलला तसे उत्सवाचे स्वरूपही बदलले आहे. दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी, देणगीसाठी डिजिटल व्यवहार, मंडळांचे सोशल मीडिया अकाउंट, ऑनलाइन कार्यक्रम,  घरपोच प्रसाद अश्या विविध डिजिटल सुविधा आता उत्सवाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. याच डिजिटल सुविधांचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर भामट्यांनीही आपले जाळे पसरवले आहे. भक्तीच्या भावनेचा, विश्वासाचा गैरफायदा घेत नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार घडू शकतात. त्याकरता आपण सावधान असणे अत्यंत आवश्यक आहे.

सायबर गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी..

सायबर गुन्हेगारांची पद्धत अत्यंत चलाख असते. एखाद्या सुप्रसिद्ध गणेश मंडळाच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केले जाते. त्यावर आकर्षक पोस्ट टाकून ऑनलाइन देणगीसाठी QR कोड किंवा बँक खात्याची माहिती दिली जाते. भक्तिभावाने नागरिक त्या लिंकवर किंवा QR कोडवर विश्वास ठेवून पैसे पाठवतात. प्रत्यक्षात मात्र ती रक्कम मंडळाच्या खात्यात न जाता भामट्यांच्या खात्यात पोहोचते.

फक्त देणगीपुरतीच ही फसवणूक मर्यादित नाही. काही ठिकाणी ‘विशेष दर्शन पास’, ‘व्हीआयपी दर्शन’, ‘ऑनलाइन दर्शन बुकिंग’, ‘गणेशोत्सव कार्यक्रमाचे तिकीट’ किंवा ‘घरपोच प्रसाद ’ अशा नावाने बनावट लिंक पाठवल्या जातात. नागरिकांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना बनावट संकेतस्थळावर नेले जाते. तेथे नाव, मोबाईल क्रमांक, बँक खात्याशी संबंधित माहिती, कार्डची माहिती किंवा OTP मागितला जातो. यातील सर्वांत धोकादायक बाब म्हणजे फसवणुकीची सुरुवात अनेकदा अत्यंत निरुपद्रवी वाटते. ‘दर्शनासाठी नोंदणी करा’, ‘बाप्पासाठी देणगी द्या’, ‘ऑनलाइन प्रसाद बुक करा’, ‘विशेष आरतीचा पास मिळवा’—अशा भावनिक आवाहनांना नागरिक सहज प्रतिसाद देखील देतात. सायबर भामट्यांना नेमका याच विश्वासाचा फायदा घ्यायचा असतो.त्यामुळे वेळीच सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

फसवणूक कशी टाळाल?

– सवलतींच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.
– समाजमाध्यमांवर आलेल्या अनोळखी जाहिरातींमधील लिंक किंवा अॅप उघडू नका.
– खरेदीसाठी संबंधित विक्रेता किंवा संस्थेचे अधिकृत अॅप अथवा संकेतस्थळच भाविकांनी वापरावे.
– संकेतस्थळाचा पत्ता काळजीपूर्वक तपासावा.  
– क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी तो कोणत्या व्यवहारासाठी आहे याची खात्री करावी.
– ऑनलाइन खरेदी करताना शक्य असल्यास कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा.
– व्हीआयपी दर्शन अथवा प्रसादाच्या नावाने पैसे मागणाऱ्या अनोळखी व्यक्तींची अधिकृत माध्यमातून खातरजमा आवश्यक..

सार्वजनिक मंडळांची जबाबदारी..

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळांचीही मोठी जबाबदारी आहे. मंडळांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांची माहिती स्पष्टपणे प्रसिद्ध करावी. देणगीसाठी अधिकृत QR कोड किंवा बँक खाते कोणते आहे, हे नागरिकांना स्पष्टपणे सांगावे. बनावट अकाउंट, बनावट QR कोड किंवा संशयास्पद लिंक आढळल्यास त्याबाबत तातडीने समाजाला सावध करावे. मंडळांनी ‘आम्ही फोनवरून OTP किंवा PIN मागत नाही’ असा स्पष्ट इशाराही प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

या सगळ्या प्रक्रियेत कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि डिजिटल व्यवहारांमध्ये तुलनेने कमी परिचित असलेल्या व्यक्तींना विशेष मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगारांसाठी अनुभवाचा अभाव ही संधी असते. समजा एखाद्याची फसवणूक झालीच तर लाज किंवा भीतीपोटी शांत बसणे हा सर्वांत मोठा धोका आहे. आर्थिक फसवणूक झाल्यास शक्य तितक्या लवकर बँकेशी संपर्क साधावा. लगोलग संबंधित अधिकृत सायबर गुन्हे तक्रार यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी. वेळेत केलेली कारवाई नुकसान कमी करण्यास मदत करू शकते. इतर यंत्रणांना देखील सतर्क करू शकते..

गणरायाच्या दर्शनासाठी आपण रांगेत शिस्त पाळतो, गर्दीत आपली काळजी घेतो, मौल्यवान वस्तू सांभाळतो. त्याचप्रमाणे डिजिटल जगातही सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या भक्तीसोबतच डिजिटल सावधानतेचाही जागर करायला हवा.

गणपती बाप्पा मोरया…

– हिंमांशु शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख