” कातरवेळी पसरणाऱ्या सारंगी उजेडाच्या अवकाशात
घर आरपार उजळते : उजळतात त्याचे अंधारे कोन कोन
आणि घर विस्फारल्यासारखे वाटते त्याच्या व्यापातून
तेव्हा गर्द होते अधिकच आपले असह्य एकाकीपण ”
स्थितीच्या कविता , स्थिती : कातरवेळ १९६४ : राजा ढाले
वरळीच्या बीडीडी चाळीत दंगल, दलित पॅंथर, बौद्ध सभा, मास मुव्हमेंट, नामांतर आंदोलन यासाठी राजा ढाले नेतृत्व वादातीत आहे. पण राजा ढालेंच वाङ्मयीन कर्तृत्व, प्रमुख प्रवाहातल्या वाङ्मयीन संस्कृतीची केलेली मूलभूत चिकित्सा, कवितेबाबत राजा ढालेंच लेखन याबाबत चर्चा नाही झालेली. दलित साहित्य हा दलित चळवळीचा अवीभाज्य भाग आहे. या साहित्याला आंबेडकरी तरुणाईच्या प्रारंभीच्या काळात अवसान दिल त्या प्रमुख नावात राजा ढालेंच नाव महत्त्वाच आहे. त्यांनी सुरुवातीला ‘प्रबुद्ध भारत‘ मध्ये लिखाण केले. पॅंथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले ‘लिटल मॅगझिन’ चळवळीत सक्रिय होते.
ढालेंचा जन्म ३० सप्टेंबर १९४० रोजी सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावी झाला. शिकत असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यांनंतर ते काकांसोबत मुंबईला आले. १९६४ ते १९७४ ही राजा ढाले यांच्या आयुष्यातिल महत्त्वाची वर्ष. या काळात त्यांनी खूप लिहिलं. खूप वाङ्मयीन चळवळी केल्या. वाङ्मयीन परिघात नव्या जाणिवांचे छोटसं रोपट लावणाऱ्या लोकात राजा ढालेंनी महत्वाची भूमिका बजावली.
‘असो’ या मासिकान एकत्र आणलेली माणसं १९६६ साली मुंबईत फोर्ट मधल्या वेस्टर्न इंडिया हाऊस समोरच्या सेलर हॉटेलात एकत्र यायची. यात राजा ढाले या सगळ्यांबरोबर संपर्कात होते. त्यावेळी ‘आत्ता’ हे लघु नियतकालिक संपादक म्हणून राजा ढाले चालवायचे. ‘आत्ता’ हे त्याकाळी छोटेखानी असलं तरी वाचनीय असायचं. कविता, लेख, गालिबसे एखादं पत्र, लीळा चरित्रातला उतारा, विदेशी लेखकाचा उतारा असं एकूण सगळं त्यात असायचं. राजा ढाले यांना विलक्षण कल्पनाशक्ती, वाङ्मयाची सूक्ष्मजाण, विचारांची शिस्त, सखोल विश्लेषण शक्ती, काटेकोर तर्कशक्ती, आणि कवितेवर अपार प्रेम होत. साहित्याच सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवरच मूल्यमापन करण यावर राजा ढाले यांची दृढनिष्ठा होते.
एका मासलेवाईक उदाहरण घ्यायचं झाल्यास, १९६० मध्ये ‘मौजे’ न दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा पहिलाच कवितासंग्रह प्रकाशित केला होता. मुंबईत चित्रे यांचा वेगवेगळ्या कविता संग्रहावर मोठा परिसंवाद झाला होता. कवितेवर उपजत प्रेम असल्यामुळे, आणि चित्रे यांची कविता राजा ढालेंना भावली असल्याने राजा ढालेंनी या परिसंवादावरच ‘ काही विचार: निमित्त: कवितेवरची चर्चा’ असा लेख लिहिला. त्या परिसंवादातल्या टीकाकारांच्या मुद्द्यांचा राजा ढाले यांनी आपल्या लेखात व्यवस्थित समाचार घेतला. त्या टीकाकारांपैकी एका टीकाकाराने सांगितलं: चित्रे हे सावल्या पाडतात; शब्दांच्या सावल्या पडतात, आणि त्यातून आपला अनुभव जसाच्या तसा वाचकांपर्यंत परावर्तित करण्याचा प्रयत्न करतात.’ त्यावर राजा ढाले यांनी लिहिलं : त्याच संदर्भात ते ( म्हणजे उपरोक्त टीकाकार) कुठेतरी लुळे पडले म्हणा किंवा पत्करलेल्या पेशामुळे बटबटीत, मंगळवारी विधान करायच्या सवयीने म्हणा- ते चटकन अवसान घात करणारे वाक्य बोलून गेले: चित्र हे सावल्या पाडतात; शब्दांच्या सावल्या पाडतात.’
राजा ढालें च आणि कवितेचही अतूट नातं. महानुभाव पंथाचं गद्य लेखन केल्यामुळे राजा ढालेंच्या लेखनाला विलक्षण सहजपणा आणि गतिमानता ही लाभलेली होती. विचारांची शिस्त आणि सडेतोड तार्किकता या राजा ढालेंच्या गोष्टी अंगभूत होत्या. वाङ्मयीन व्यवस्थे ची आणि जनाधाराची कुठलीही दडपण येऊ न देता राजा ढाले आपली मते मांडत असत.
आत्ता नंतर राजा ढाले यांनी अनेक लघु पत्रिका काढल्या. राजा ढालेने यात अनेक लेख लिहिले त्यातला ‘येरू’ मधला ‘सत्य कथेची सत्यकथा’ हा 45 पानांचा दीर्घ लेख अत्यंत महत्त्वाचा होता. जेव्हा ‘सत्यकथा’ आपल्या चढत्या काळात होतं तेव्हा राजा ढाले यांनी ‘सत्यकथे’च्या (अंतर बाह्य) स्वरूपा ची आणि त्या मागच्या वाङ्मयीन राजकारणाची परखड मीमांसा करण्याच धाडस दाखवलं. या सबंध लेखात जागोजागी राजा ढाले यांची सूक्ष्म विश्लेषण शक्ती आणि तर्कशक्ती जाणवते. राजा ढाले यांनी तर्कशास्त्राचा जो संयत स्वरूपाचा वापर केला त्याच्या मुळाशी राजा ढाले डॉ. रा भा पाटणकरांचे शिष्य होते हे कारण असायची शक्यता आहे. शिवाय प्रा. मे पु रेगे यांच्याशी राजा ढाले यांचा संबंध होताच आणि त्यांना पाटणकर रेग्यांचं ऋण मान्य असावं !
राजा ढालेंचा झेन, महानुभाव आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता. टिके इतकीच जबर सर्जनशीलताही राजा ढालेंजवळ होती. राजा ढाले यांनी ‘ ढाले राजाच्या झेन गोष्टी’ लिहून हे सिद्ध केलं होतं. त्यांचं शिल्प, त्यांचा आशय, आशयाला व्यक्त करणारी भाषाशैली, त्यांच्यातल्या संरक्षणात्मक पातळ्या, आशयाने जगण्याच्या प्रक्रियेतून घेतलेला उठाव, त्यांच्या गोष्टीशी असलेला अविभाज्य नात, प्रत्यक्ष जगण्याच्या प्रक्रियेतील समस्यांना सर्जनशील कलाकृतीतून मिळणारा उत्तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत कमी अवकाशात, मोजक्या शब्दात मांडलेला जटील अनुभव राजा ढाले यांना फारच उच्च पातळीवर घेऊन जातो. तसंच गोष्टींपेक्षाही जास्त प्रकर्षानं आणि उत्कटपणे घडणारा राजा ढालेंच्या सर्जनशीलतेचा अविष्कार त्यांच्या मोजक्याच कवितांमध्ये दिसून येतो. राजा ढाले, अशोक शहाणे, रघु दंडवते आणि भालचंद्र नेमाडे हे चारच कवी निव्वळ आपल्या 20-25 कवितांनीही मराठी कवितेच्या समकालीन प्रवाहात अतिशय मोलाची भर घालून गेले. राजा ढाले यांनी आपल्या राजा ढाले प्रकाशन तर्फे 1968 मध्ये ‘ स्थितीच्या कविता ‘ नावाचा एक महत्त्वाचा छोटेखानी संग्रह प्रकाशित केला होता.
राजा ढाले यांचं अक्षर अतिशय सुंदर होत. त्याचप्रमाणे त्याकाळी ते चित्रही काढत असत. कमीत कमी रेषा वापरून समकालीन व्यंगचित्र त्यांनी फार अफलातून काढले होते. दलित साहित्यामध्ये दलित चळवळीला सांस्कृतिक जोड देण्यासाठी त्या काळात ज्या तरुणाईने कंबर कसली होती. त्यात राजा ढाले हे अग्रगण्य नाव समोर येतं. आज राजा ढाले यांच्या जयंती निमित्ताने त्यांना विनयपूर्वक जय भीम!