Friday, October 2, 2026

ज्ञानेश्वरी जयंती : ज्ञानाचा दीप घराघरांत पोहोचवणारा ग्रंथ

Share


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात काही ग्रंथ असे आहेत, ज्यांचे स्थान केवळ धार्मिक वाङ्मयापुरते मर्यादित नाही. ते लोकांच्या जगण्याचा, विचारांचा आणि श्रद्धेचा भाग बनले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हा त्यांपैकीच एक ग्रंथ. संस्कृतमधील भगवद्गीतेचा अर्थ सामान्य माणसाला आपल्या भाषेत समजावा, त्याने जीवनातील प्रश्नांकडे विवेकाने पाहावे आणि अध्यात्माचा अनुभव आपल्या जगण्यात उतरवावा, या हेतूने अवघ्या सोळाव्या वर्षाच्या आसपासच्या ज्ञानदेवांनी हा ग्रंथ रचला.

भाद्रपद वद्य षष्ठी हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदा, २ ऑक्टोबर २०२६ रोजी, या ग्रंथाच्या निर्मितीमागील विचारविश्वाचा आणि त्याच्या आजही टिकून असलेल्या प्रभावाचा मागोवा घेता येईल.

ज्ञानेश्वरीतील दोन पानं  – १७व्या शतकातले हस्तलिखित 

नेवासे येथे उमटलेला ज्ञानाचा स्वर

तेराव्या शतकातील महाराष्ट्रात संस्कृत ही धर्मग्रंथांच्या अभ्यासाची प्रमुख भाषा होती. भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी ज्ञानदेवांनी मराठीचा आधार घेतला. नेवासे येथे त्यांनी गीतेवर ओवीबद्ध भाष्य रचले (शालिवाहन शके १२१२ / सामान्य काल १२९०). परंपरेनुसार, सच्चिदानंद बाबा यांनी ज्ञानेश्वर महाराजांचे निरूपण लिहून घेतले. या ग्रंथाला ‘भावार्थदीपिका’ असे नाव आहे. पुढे तो ज्ञानेश्वरी या नावाने महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला.

ज्ञानेश्वरीचे महत्त्व तिच्या भाषांतरात नाही, तर गीतेचा भावार्थ उलगडून सांगण्याच्या पद्धतीत आहे. कठीण तत्त्वज्ञान समजावून सांगताना ज्ञानदेव निसर्गातील दृश्ये, दैनंदिन जीवनातील अनुभव आणि साधे दृष्टान्त वापरतात. 

याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, स्थितप्रज्ञ माणसाची स्थिर बुद्धी समजावून सांगताना ते वाऱ्याविना स्थिर असलेल्या दीपाची उपमा देतात

“जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु ।

तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥”

— ज्ञानेश्वरी, अध्याय २, ओवी ३४१
(अर्थ: वारा नसलेल्या जागी ठेवलेला दिवा जसा अजिबात डळमळत नाही, तशी योगयुक्त आणि स्थिर बुद्धी असलेल्या माणसाची अंतःस्थिती असते.)

कठीण तत्त्वज्ञान समजावून सांगताना ज्ञानदेव निसर्गातील दृश्यांना विचारांची भाषा बनवतात. संसाराचे स्वरूप सांगताना ते पिंपळ आणि वडाच्या विस्ताराची प्रतिमा वापरतात:

प्रबळला चौमेरी । पिंपळा कां वडाचिया परी ।

जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती।”

– ज्ञानेश्वरी, अध्याय १५, ओवी ५८

वडाच्या पारंब्या आणि सर्व दिशांना पसरणाऱ्या फांद्यांचे हे परिचित दृश्य वापरून ते संसाराच्या गुंतागुंतीचे गहन तत्त्व सहजपणे समोर आणतात.  त्यामुळे आत्मज्ञान, कर्म, भक्ती आणि विवेक यांसारखे विषय वाचकाच्या अनुभवविश्वाशी जोडले जातात. ओवीच्या लयीतून व्यक्त झालेले हे विचार वाचताना ग्रंथ आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव येतो.

ज्ञानेश्वरीचे अठरा अध्याय भगवद्गीतेच्या अठरा अध्यायांशी निगडित आहेत. तिच्या अखेरीस येणारे पसायदान हा या ग्रंथाचा सर्वपरिचित भाग. स्वतःच्या मुक्तीपुरती प्रार्थना न करता संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे, माणसांमध्ये मैत्रीभाव वाढावा आणि सर्व जीवांना सद्बुद्धी लाभावी, अशी व्यापक आकांक्षा त्यातून व्यक्त होते. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ ही ओळ आजही अनेकांच्या मनात आशेचा आणि सद्भावनेचा भाव जागवते. पसायदानातील विश्वकल्याणाची दृष्टी ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानाचा गाभा स्पष्ट करते.

जयंतीचा अर्थ ग्रंथाच्या पुनरुज्जीवनात

भाद्रपद वद्य षष्ठीचा दिवस ज्ञानेश्वरीच्या रचनेशी जोडला जातो; मात्र या तिथीमागे ग्रंथाच्या जतनाची परंपराही आहे. काळाच्या ओघात हस्तलिखित प्रतींमध्ये पाठभेद आणि चुका निर्माण झाल्या. संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण केल्याची परंपरा सांगितली जाते. त्यांच्या या कार्याची सांगता भाद्रपद वद्य षष्ठीला झाली, असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून पाळला जातो.

ज्ञानेश्वर महाराजांनी इ.स. १२१२ मध्ये ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण केले. मात्र, ग्रंथलेखन पूर्ण झाल्याची तिथी त्यात नमूद केलेली नसल्यामुळे श्री ज्ञानेश्वरी जयंती नेमकी कोणत्या दिवशी आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

त्यानंतरच्या काही वर्षांत नाथ महाराजांनी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर उपलब्ध असलेल्या ज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रती गोळा केल्या. त्यांचा अभ्यास करून त्यांनी शुद्ध प्रती तयार केल्या आणि त्या पुन्हा प्रसारित केल्या. आज आपण ज्या ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तिचे शुद्धीकरण श्री एकनाथ महाराजांनी केले आहे. त्यामुळे नाथ महाराज हे ज्ञानेश्वरीचे पहिले संपादक मानले जातात. एवढेच नव्हे, तर मराठी साहित्याचे पहिले संपादक म्हणूनही त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.

श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी चार ओव्या लिहिल्या आहेत. त्या अशा आहेत —

शके पंधराशे साहोत्तरी ! तारणनाम संवत्सरी !
एकाजनार्दने अत्यादरी ! गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली !!१!!

ग्रंथ पुर्वीच अतिशुद्ध ! परि पाठांतरी शुद्ध अबद्ध !
तो शोधुनिया एवंविध ! प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी !!२!!

नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका ! जयाची गीतेची वाचितां टीका !
ज्ञान होय लोकां ! अतिभाविकां ग्रंथार्थिया !!३!!

बहुकाळ पर्वणी गोमटी ! भाद्रपद मास कपिलाषष्ठी !
प्रतिष्ठानी गोदातटी ! लेखन कामासाठी संपूर्ण जाहली !!४!!


ज्ञानेश्वरीच्या ७००व्या जयंतीनिमित्त स्मरणार्थ टपाल तिकीट भारतीय डाक विभागाने ३१ डिसेंबर १९९० रोजी जारी केले. या टपाल तिकिटाची दर्शनी किंमत दोन रुपये होती.

या परंपरेत एक महत्त्वाचा संदेश आहे. एखादा ग्रंथ निर्माण करणे जितके मोलाचे, तितकेच त्याचे मूळ स्वरूप जपणे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे आहे. ज्ञानदेवांनी मराठीला तत्त्वज्ञानाची समर्थ अभिव्यक्ती दिली; पुढील संतांनी त्या ज्ञानपरंपरेचे जतन केले.

आज ज्ञानेश्वरी जयंती साजरी करताना ग्रंथाचे पूजन, पारायण किंवा अभंग-ओव्यांचे गायन यांबरोबर त्यातील विचार समजून घेणेही आवश्यक आहे. दैनंदिन व्यवहारात विवेक ठेवणे, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव राखणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग व्यापक कल्याणासाठी करणे, ही ज्ञानेश्वरीची शिकवण आजही तितकीच अर्थपूर्ण आहे.

सातशेहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेली ज्ञानेश्वरी आजही वाचली जाते, ऐकली जाते आणि नव्याने समजून घेतली जाते. तिचे सामर्थ्य याच सातत्यात आहे. काळ बदलला, जीवनाचे प्रश्न बदलले, तरी माणसाला स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा हा ग्रंथ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीतील एक जिवंत दीप आहे.   

– राजेश कोरडे

अन्य लेख

संबंधित लेख