महाराष्ट्रात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेले जलसंकट आता उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. याच पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात किमान १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा मोठा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. राज्याच्या एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये म्हणजेच तब्बल ७४ टक्के भागात २६ सप्टेंबर रोजी दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. ही आकडेवारी राज्यावरील भीषण जलसंकटाची स्पष्ट जाणीव करून देते. आजघडीला धरणांमधील पाणीसाठा मागील वर्षीच्या ८८.८२ टक्क्यांच्या तुलनेत केवळ ७५.२५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. अपुरा पाऊस आणि ‘अल निनो’ (El Niño) या हवामान बदलाच्या प्रभावामुळे ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाण्याचे नियोजन केले असून, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. उद्योगांनादेखील त्यांच्या एकूण पाणी वापरापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर (recycle) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण नुसती पाणी कपात करणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. हे संकट खूप मोठे आणि गडद आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आता ठोस, आधुनिक आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.
इस्रायलकडून शिकण्यासारखे…
पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण इस्रायल या देशाकडून खूप काही शिकू शकतो. इस्रायल हा वाळवंटी देश आहे. तिथे पावसाचे प्रमाण कमालीचे कमी असते. तरीही त्यांनी शेती आणि पाणी व्यवस्थापनात जगात मोठी क्रांती केली आहे. आज इस्रायल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरतो. त्यांनी ‘स्मार्ट वॉटर ग्रीड’ (Smart Water Grid) ही संकल्पना राबवली आहे. यामुळे पाण्याचे वितरण अचूक होते आणि गळती शून्य टक्क्यांवर येते. शेतीसाठी इस्रायलने ‘प्रिसिजन ॲग्रिकल्चर’ (Precision Agriculture) म्हणजेच अचूक शेतीचे तंत्र विकसित केले आहे. तेथे पिकांच्या मुळाशी सेन्सर लावले जातात. हे सेन्सर जमिनीतील ओलावा आणि पिकाची तहान ओळखून संगणकाद्वारे नेमके तेवढेच पाणी सोडतात. यामुळे पाण्याचा अपव्यय पूर्णपणे थांबतो. याशिवाय, इस्रायलमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून जवळपास ९० टक्के सांडपाणी पुन्हा शेतीसाठी वापरले जाते. जगात सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यात इस्रायल पहिल्या क्रमांकावर आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे (Desalination) अनेक मोठे प्रकल्प तिथे आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी कायमचा सोडवला आहे. पाण्याचा पुनर्वापर आणि तंत्रज्ञानाची जोड हे त्यांच्या यशाचे गमक आहे, जे आपण तातडीने शिकायला हवे.
राज्यातील शेतीत सुधारणा
राज्यातील पाण्याचा सर्वाधिक म्हणजे जवळपास ७० ते ८० टक्के वापर एकट्या शेतीसाठी होतो. त्यामुळे शेती पद्धतीत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. उसासारख्या आणि केळीसारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचा मोह आता शेतकऱ्यांनी टाळायला हवा. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात उसाचे क्षेत्र वाढणे, हे जलसंकटाला आमंत्रण देणारे आहे. त्याऐवजी कमी पाण्यात आणि कमी वेळेत येणाऱ्या पिकांकडे आपण वळायला हवे. भरडधान्ये, तेलबिया, कडधान्ये अशा कमी पाण्याची गरज असलेल्या पिकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर आता ऐच्छिक न ठेवता तो प्रत्येक शेतकऱ्यासाठी अनिवार्य करायला हवा. इस्रायलप्रमाणेच आपणही शेतात सेन्सर आधारित सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी सरकारी पातळीवर अनुदान आणि प्रशिक्षण द्यायला हवे. पिकांची फेरपालट करणे, जमिनीचा पोत सुधारणे आणि मातीत ओलावा टिकवून ठेवणारी सेंद्रिय शेती करणे, हे बदल आता स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही.
शहरी आणि ग्रामीण पाणी नियोजन
शहरी तसेच ग्रामीण पाणी वाचविण्याची आणि वापरण्याची तंत्रे पूर्णपणे वेगळी असतात. शहरात पाण्याचे वितरण मोठ्या जलवाहिन्यांद्वारे होते. तिथे सिमेंट आणि डांबराचे जंगल असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. शहरात एकदा वापरलेले पाणी थेट गटारातून नदीत किंवा समुद्रात सोडून दिले जाते. हे थांबवणे आता काळाची गरज आहे. शहरी पाणी वापरलेले पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी ते शुद्ध करणे आवश्यक आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) प्रत्येक मोठ्या सोसायटीत सक्तीचे करायला हवेत. पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि स्वच्छतागृहे, बागा, गाड्या धुण्यासाठी प्रक्रिया केलेले पाणी अशी दुहेरी व्यवस्था शहरात उभी राहायला हवी. याउलट, ग्रामीण भागात पावसाचे पाणी जमिनीवर पडते. ते पाणी वाहून न जाता गावातच कसे अडेल, यावर भर द्यावा लागतो. तिथे पाझर तलाव, शेततळी, बांधबंदिस्ती, आणि समतल चर खोदणे ही गावाची मुख्य गरज असते. शहरात पाणी शुद्ध करून पुन्हा वापरण्यावर भर हवा, तर गावात पडणारे पावसाचे पाणी मातीत जिरवण्यावर भर असायला हवा.
पाणी वाचवण्यासाठी कृतीशील उपाय
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहर आणि खेडे अशा दोन्ही स्तरांवर एकत्रित प्रयत्न हवेत. पाणी वाचवण्यासाठी खालील वीस गोष्टी करता येतील..
शहरांसाठी उपाय
१. घरातील नळ, जलवाहिन्या आणि फ्लशची गळती त्वरित दुरुस्त करून घ्यावी.
२. दात घासताना, दाढी करताना किंवा हात धुताना बेसिनचा नळ सतत चालू ठेवू नये.
३. वाहने धुण्यासाठी पाईपने पाणी मारण्याऐवजी बादली आणि ओल्या कपड्याचा वापर करावा.
४. अंघोळीसाठी शॉवरचा वापर टाळून बादली आणि मगचा वापर करावा. याने भरपूर पाणी वाचते.
५. प्रत्येक इमारतीवर आणि बंगल्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rain Water Harvesting) यंत्रणा बसवणे सक्तीचे व कार्यान्वित करावे.
६. वॉशिंग मशीन पूर्ण कपड्यांनी भरल्यानंतरच चालवावी, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टळेल.
७. पिण्याच्या पाण्याचे आरओ (RO) फिल्टर वापरताना वाया जाणारे पाणी बादलीत साठवून ते घरपुसण्यासाठी किंवा शौचालायात वापरावे.
८. फ्लश टँकमध्ये पाण्याने भरलेली एक छोटी प्लास्टिकची बाटली ठेवावी, जेणेकरून प्रत्येक फ्लशला थोडे पाणी वाचेल.
९. कुंडीतील झाडांना पाणी देताना सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडावी, जेणेकरून उन्हामुळे होणारे बाष्पीभवन कमी होईल.
१०. भाज्या, डाळी आणि तांदूळ धुतलेले पाणी बेसिनमध्ये फेकून न देता ते बागेतील झाडांना घालावे.
खेड्यांसाठी पाणी वाचविण्याचे उपाय
१. शेतीला मोकाट आणि प्रवाही पाणी देण्याऐवजी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा काटेकोर वापर करावा.
२. पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेततळे बांधायला हवे.
३. गावातील ओढे, नाले आणि तलावांचे खोलीकरण व गाळ काढण्याची कामे पावसाळ्यापूर्वी लोकसहभागातून करावीत.
४. पावसाळ्यापूर्वी विहिरींचे आणि बोअरवेलचे पुनर्भरण (Recharge) करण्यासाठी आजूबाजूला शोषखड्डे तयार करावेत.
५. शेताच्या बांधावर आणि पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची लागवड करावी, ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो.
६. उसासारखी जास्त पाण्याची पिके घेण्याऐवजी ज्वारी, बाजरी, मका यांसारखी कमी पाण्यावरील पिके घेण्यास प्राधान्य द्यावे.
७. गुरांना धुण्यासाठी नदी किंवा तलावात न नेता, त्यांना घरीच बादलीच्या पाण्याने स्वच्छ करावे, जेणेकरून जलप्रदूषण टळेल.
८. घरातील सांडपाणी थेट रस्त्यावर सोडून न देता ते परसबागेत किंवा शोषखड्ड्यात जिरवावे.
९. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी मातीचे किंवा सिमेंटचे छोटे बंधारे (वनराई बंधारे) बांधावेत.
१०. ग्रामपंचायतीने पाणी वितरणाचे वेळापत्रक निश्चित करावे आणि पाण्याचा बेकायदा वापर किंवा अपव्यय करणाऱ्यांना दंड करायला हवा.
पाणी हे जीवन आहे, हे आपण फक्त निबंधात लिहितो. पण आता ते प्रत्यक्षात जगण्याची वेळ आली आहे. हे वीस उपाय अतिशय साधे आहेत. पण ते रोजच्या जीवनात अंगवळणी पडले, तर दररोज लाखो लिटर पाणी वाचू शकते. पाणी कपातीचा निर्णय हा निसर्गाचा आणि प्रशासनाचा आपल्याला दिलेला शेवटचा इशारा आहे. वेळीच जागे होऊन आपण पाण्याचे सुयोग्य नियोजन केले, तरच भविष्यात आपण आणि आपली पुढची पिढी या भीषण जलसंकटावर कायमची मात करू शकू.