ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त लेख
कामं करता करता गुणगुणता येतील अशी सोपी, सहज, प्रासादिक तरीही आशयघन गीतनिर्मिती करणारा कवी कोण? हा प्रश्न विचारला तर सर्व जातिभेद, पक्षभेद, विचारभेद, मतभेद विसरून अवघा महाराष्ट्र एकमुखाने नाव घेईल ते गदिमा म्हणजेच ग. दि. माडगूळकर यांचं! कित्येक वर्षे आणि अक्षरशः पिढ्यान् पिढ्या ज्यांच्या शब्दांचं गारूड मराठी मनावर आजही टिकून आहे, असा हा शब्दप्रभू… गदिमा!
कित्येक चित्रपटांची संहिता लिहिणाऱ्या गदिमांची जन्मकथा देखील तितकीच फिल्मी आहे. १ ऑक्टोबर १९१९ रोजी जन्म झाल्याझाल्या बाळाला मृत घोषित करण्यात आले होते. दफनासाठी खड्डा देखील करण्यात आला, पण बाळाने जीव धरला! हातून इतकी मोठी साहित्यसंपदा निर्माण व्हावी म्हणूनच नियतीची ही योजना असणार, यात संशय नव्हता.
माडगुळे गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील औंध संस्थानचे कारकून होते. पुढे आर्थिक प्राप्तीसाठी त्यांनी चित्रपटांमध्ये सहायक अभिनेत्याची कामे करायला सुरुवात केली. ‘हंस पिक्चर्स’ या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी’ (१९३८) या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. लहानपणीची नकला करण्याची कला आणि लिहिण्याची आवड, या दोन्ही गोष्टींचा उपयोग इथे होऊ लागला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काही काळ काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके वाचायला मिळाली. त्यातूनच त्यांची लेखनकला बहरली, कवितालेखनालाही हळूहळू वेग आला. हंस पिक्चर्सच्या ‘भक्त दामाजी’ (१९४२) आणि ‘पहिला पाळणा’ (१९४२) या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. पुढे राजकमल पिक्चर्सच्या ‘लोकशाहीर रामजोशी’ (१९४७) या चित्रपटाची कथा, संवाद आणि गीते त्यांनी लिहिली, तसेच त्यात एक भूमिकाही केली. या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. नंतर गदिमा–राजा परांजपे–सुधीर फडके या त्रयीने ‘वंदे मातरम्’, ‘पुढचं पाऊल’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘देवबाप्पा’, ‘मुंबईचा जावई’ असे कित्येक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण करून मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवला. उत्तम कथाबीज, उत्तम पटकथा, उत्तम गीते आणि उत्कृष्ट संगीत अशा चहूबाजूंनी मराठी चित्रपट बहरास येण्याचा तो काळ होता.
गदिमांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व वादातीत होते. कोणत्याही पुस्तकातून ते मराठी शिकले नव्हते; मातीचे संस्कार घेत रुजणाऱ्या बीजाप्रमाणे ती रोजच्या जगण्यातून रुजत गेली होती. आईच्या ओव्या आणि देवळातील नामसंकीर्तन यांतून त्यांनी फुले वेचावीत तसे शब्द वेचले आणि त्यांची सुरेख माला गुंफून ते महाराष्ट्र सरस्वतीला अर्पण करत गेले. त्यांच्या लेखनाचं रूपडं अस्सल मराठी होतं. या मातीत, भाषेत आणि संस्कृतीत रुजलेले शब्द, संकल्पना आणि प्रतिमा त्यांनी अलगद आपल्या कविता आणि लेखनात आणल्या. ‘बिनभिंतींची उघडी शाळा’ सारखी अल्लड बालगीते असोत किंवा ‘पराधीन आहे जगती’ सारखं गंभीर गीत, ‘कुणीतरी बोलवा दाजीबाला’, ‘बुगडी माझी सांडली ग’ सारखी लावणीगीते असोत किंवा ‘विकत घेतला श्याम’, ‘तुला पाहते रे’ सारखी अतिशय प्रतिमासंपन्न आणि आशयगर्भ गीते, गदिमांची लेखणी सगळ्या रसांमधून, सगळ्या गीतप्रकारांमधून, सर्व छंद-वृत्तांतून लीलया संचरली. कुठेही अडली नाही, अडखळली नाही. त्यांच्या प्रतिभेचा दैवी आविष्कार त्यांच्या लेखणीतून सतत होत राहिला.
हुबेहूब शब्दचित्रे उभी करणे ही गदिमांची हातोटी होती. निसर्ग, एखादा देखावा, विविध वस्तू यांचे तंतोतंत वर्णन करण्याची कला त्यांना सहजसाध्य होती. आजही गावातले जुने कौलारू घर समोर दिसले की या ओळी नकळत ओठांवर येतात:
चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू !
‘काय वाढिले पानवरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती…’ या कवितेतील पंगतीच्या पानाचे बहारदार वर्णन वाचताना तर वाढलेले पान प्रत्येक पदार्थाच्या रंगरूपासह, चवी-वासासह डोळ्यांसमोर उभे राहते. हीच त्यांच्या शब्दांची ताकद आहे.
दशरथास त्या तिन्ही भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी
अतुलप्रभा सुंदरी
या एका कडव्यात महाराज दशरथांच्या तिन्ही राण्यांचे वर्णन करताना केवळ बहुश्रुता या एका शब्दामधून त्या तिघींची विद्वत्ता ते सांगून गेले आहेत.
त्यांच्या देशभक्तीपर गीतांमध्ये काव्यातला ओजोगुण परिपूर्णपणे बहरलेला दिसतो.
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेऊनि हाती
तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेती-भाती
एकट्या शिपायासाठी, झुरतात अंतरे कोटी
या ओळी ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्यावाचून राहते का? किंवा
दही घाल हातावरती बाळ रणा जाई.. या कवितेतल्या
‘ युद्ध हीच तारुण्याला असे तीर्थयात्रा
पाहू दे हिमाद्री याला नदी ब्रह्मपुत्रा
या ओळीशी आपण थबकतो. हिमालय आणि ईशान्य भारतातील भारतीय सीमेवर याला जाऊ देत हे सांगत एक वीरमाता आपल्या सुनेला विरहदु:ख कुंकवासंगे घेई कपाळी असा धीरोदात्त वारसा देते आहे.
वीर, शृंगार, कारुण्यादी नवरसांचा मुक्त परिपोष, काव्यातला गेयगुण, प्रासादिकता आणि त्याचवेळी आशयघनता व लोकप्रियता, असे उत्तम कवींत आढळणारे सर्व गुण त्यांच्या लेखनात आहेत.
इतक्या विविधतेतही गदिमांच्या लेखणीचा शिखरबिंदू ठरला तो ‘गीतरामायण’! याच रचनेमुळे त्यांना ‘महाकवी’ ही उपाधी मिळाली. १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या काळात पुणे आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. एकाच कवीने रचलेला, एकाच संगीतकाराने (सुधीर फडके) स्वरबद्ध केलेला आणि वर्षभर अखंड चाललेला असा हा आकाशवाणीच्या इतिहासातला एकमेव कार्यक्रम ठरला. वाल्मीकी रामायणाचे सार त्यांनी सहज, ओघवत्या मराठीत घराघरांत पोहोचवले. त्यामुळे रसिकांनी त्यांना प्रेमाने ‘आधुनिक वाल्मीकी’ म्हटले. याच धर्तीवर पुढे ‘गीत गोपाल’मधून त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला आणि जीवनप्रसंग गीतरूपात मांडले. मर्यादापुरुषोत्तम राम आणि गोकुळातला नटखट कृष्ण, दोन्ही रूपांना त्यांच्या शब्दांनी तितकाच न्याय दिला.
या शब्दपूजकाने काव्य आणि साहित्यात रमत असतानाही वास्तवाचे भान सोडले नव्हते. त्यांच्या जरतारी आयुष्यवस्त्रात समाजभानाचा एक धागा अखंड जोडलेला राहिला. त्यांच्या गावाच्या वाटेवर खंडोबाचा माळ लागत असे. तिथून पुढे गेल्यावर महारवाडा लागत असे आणि या महारवाड्याच्या मध्यभागी ‘तक्क्या इमारत’ नावाची एक जागा होती. ही जागा माडगूळकरांना अतिशय आवडत असे, कारण या साऱ्या कष्टकऱ्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर ती उभारली होती. सारे हरिजन रात्री तिथे जमून भजन करत असत. या भजनांच्या स्मरणातूनच त्यांनी पुढे ‘झाला महार पंढरीनाथ’ या अभंगाची निर्मिती केली.
गदिमा हस्तिदंती मनोऱ्यात कधीच रमले नाहीत. ते नेहमी लोकाभिमुख राहिले स्वातंत्र्यलढ्यात अग्रभागी होते. १९४२ च्या आंदोलनकाळात भूमिगत असताना त्यांची कवने यशवंतराव चव्हाणांपर्यंत पोहोचली आणि १९५० मध्ये मुंबईत झालेल्या प्रत्यक्ष भेटीतून दोघांची घट्ट मैत्री जुळली. काँग्रेसशी नाळ जोडलेली असूनही त्यांचा मित्रपरिवार यशवंतरावांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्वपक्षीय होता.
हे समाजभान त्यांनी विधानपरिषदेतही जपले. निवडणूक लढवू न शकणारी, पण समाजाला काही देऊ शकणारी माणसे सभागृहात हवीत, असा यशवंतरावांचा आग्रह असायचा. त्यातूनच १९६२ मध्ये त्यांनी गदिमांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस केली. गदिमा बोलायला उभे राहिले की विधानसभेतील अनेक सर्वपक्षीय आमदार त्यांचे भाषण ऐकायला परिषदेत येऊन बसत. यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून निरोप देताना केलेले त्यांचे भाषण सभागृहातील सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणून गेले.
साहित्यिक जाण आणि भूमिकेतील निर्भयता दाखवणारा भाऊ पाध्ये यांच्या कादंबरीचा किस्साही गाजला. कादंबरीवर अश्लीलतेचा आरोप होऊन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तेव्हा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुस्तक तपासण्याची जबाबदारी गदिमांवर सोपवली. शब्दांपलीकडे साहित्य काय असते हे जाणणाऱ्या गदिमांनी त्यात काहीही अश्लील नसल्याचा निर्वाळा दिला. त्यांचा शब्द अंतिम मानून सरकारने बंदी घातली नाही आणि ती कादंबरी वाचकांपर्यंत पोहोचू शकली. साहित्य, चित्रपट आणि लोकजीवन या सर्व क्षेत्रांतील योगदानाबद्दल १९६९ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ मिळाली, तसेच १९७३ मध्ये यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
असे हे गदिमा! त्यांचे मोठेपण ठळकपणे न मिरवता, हिरव्या चाफ्यासारखे पानांआड दडलेले असते. हिरवा चाफा डोळ्यांना सहज दिसत नाही, पण त्याचा गंध मात्र दूरवर पोहोचतो. गदिमांच्या शब्दांचेही तसेच आहे. त्यांच्या ओळी साध्या, अलवार आणि रोजच्या जगण्यात मिसळलेल्या वाटतात, पण त्यांचा दरवळ पिढ्यान् पिढ्या मराठी मनांत टिकून आहे. कवी गेले तरी त्यांचा चाफा आजही तितकाच ताजा आहे आणि मराठी मनाचे चैत्रबन आजही त्याच्या न छपणाऱ्या गंधाने मंतरलेले आहे. गदिमा, तुम्हाला विनम्र अभिवादन!
-मैत्रेयी जोशी