प्रस्तावना
यंदाच्या वर्षी येणाऱ्या या अनोख्या १२ दिवसीय गणेशोत्सवानिमित्तर १२ दिवस रोज एकेक नाव आणि त्यामागील रोचक कथा आपण ‘गणपती तुझे नाव चांगले’ या नाम मालेत पाहणार आहोत. आज गणरायाच्या अत्यंत लाडक्या अशा ‘भालचंद्र’ या रूपाचे आणि नामाचे चिंतन करूया.
‘नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्’—नारद पुराणातील संकष्टनाशन स्तोत्रामध्ये गणरायाच्या ज्या बारा मंगल नावांचे स्मरण केले जाते, त्यातील नववे अलौकिक नाव आहे ‘भालचंद्र’. ‘भाल’ म्हणजे कपाळ किंवा मस्तक आणि ‘चंद्र’ म्हणजे शशी. ज्याच्या भालावर शीतल चंद्रकोर विराजमान आहे, तो भालचंद्र.
गणेशाच्या मस्तकावर शोभून दिसणारी ही चंद्रकोर केवळ एक अलंकार नाही; तर त्यामागे अहंकार, पश्चात्ताप, देवत्वाचा न्याय आणि शेवटी लाभलेली क्षमाशीलता यांची एक भावस्पर्शी कथा दडलेली आहे.
पौराणिक कथा
गणेश पुराणातील उपासना खंडात या संदर्भातील एक रंजक उपाख्यान येते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा तो दिवस होता. गजानन आपल्या भक्तांनी अर्पण केलेल्या नैवेद्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन मंद गतीने आपल्या मूषक वाहनावर स्वार होऊन निघाले होते. त्यांचे लंबोदर, संथ हालचाली आणि ते वेगळे रूप पाहून आकाशात फिरणाऱ्या चंद्राला अचानक स्वतःच्या लावण्याचा, तेजाचा आणि आकाराचा अनाठायी गर्व झाला. स्वतःच्या सौंदर्याच्या गर्वाने अंध झालेल्या चंद्राने गणरायाकडे पाहून उपहासाने एक कुत्सित हास्य केले.
गणेशाने चंद्राचा हा उद्दाम अहंकार ओळखला. बाह्य सौंदर्याच्या मोहात जेव्हा विवेक हरवतो, तेव्हा विनाशाकडे पडलेले हे पहिले पाऊल . गणेशाने चंद्राला शाप दिला—”ज्या रूपाचा तुला इतका गर्व आहे, ते तुझे तेज आजपासून समूळ नष्ट होईल. तू निस्तेज होशील आणि आजच्या दिवशी, म्हणजे भाद्रपद चतुर्थीला जो कोणी तुझे मुख पाहील, त्याच्यावर समाजात खोटा आळ व कलंक लागेल!”
गणरायाचा शाप फळला. चंद्राचे तेज एका क्षणात विझून गेले. नभांगणात अंधकार पसरला आणि जगातील शीतलता हरपली. अंधकाराच्या गर्तेत सापडल्यावर चंद्राचे डोळे उघडले. रूपाचे मर्म समजले आणि अहंकाराची जळमट गळून पडली. पश्चात्तापदग्ध झालेल्या चंद्राने देवर्षी नारद आणि भगवान महादेवांच्या सल्ल्यानुसार गणेशाची उग्र तपश्चर्या सुरू केली.
अनेक वर्षांच्या खडतर तपानंतर गणपती प्रसन्न झाले. गणपती केवळ संहारक नाहीत, तर ते ‘करुणासिंधू’ आहेत. चंद्राचा शुद्ध पश्चात्ताप पाहून गणेशाने त्याला क्षमा केली आणि —चंद्राची कला हळूहळू कमी होत जाईल आणि पुन्हा वाढत जाईल (कृष्ण आणि शुक्ल पक्ष) आणि केवळ भाद्रपद चतुर्थीला त्याचे दर्शन वर्ज्य मानले जाईल. इतकेच नव्हे, तर जो चंद्र स्वतःच्या सौंदर्यावर गर्व करून गणेशाला हसला होता, त्याच चंद्राला गणरायाने सन्मानाने आपल्या कपाळावर भूषण म्हणून स्थान दिले. गणेश पुराणात याचे वर्णन करताना म्हटले आहे:
भालदेशे धृतश्चन्द्रः शान्तिदः सर्वदेहिनाम् ।
भालचन्द्र इति ख्यातः सर्वपापप्रणाशनः ॥
अर्थात, गणपतीने आपल्या भालावर चंद्राला धारण केले, जो सर्व जीवांना शांती देणारा आहे. म्हणूनच गणपतीला सर्व पापांचा नाश करणारा ‘भालचंद्र’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
बुद्धीचा मनावर ताबा
पुरुषसूक्तात स्पष्ट म्हटले आहे—‘चन्द्रमा मनसो जातः’ म्हणजे चंद्र हा मानवी मनाचा अधिपती मानला जातो. मन हे चंद्रासारखेच चंचल, कधी अतिउत्साहाने पूर्ण प्रकाशात वाहवणारे, तर कधी नैराश्याच्या अमावस्येत गडप होणारे असते. मन जर अहंकाराच्या अधीन झाले, तर ते इतरांचा उपहास करायला आणि स्वतःला श्रेष्ठ समजायला वेळ लावत नाही.
दुसरीकडे, गणपती हे ‘बुद्धी’ आणि ‘विवेका’चे मूर्तिमंत रूप आहेत. कपाळ किंवा भालप्रदेश हा विचारांचे, आज्ञाचक्राचे आणि प्रज्ञेचे केंद्रस्थान आहे.
गणपतीने चंद्राला आपल्या मस्तकावर धारण करणे म्हणजेच बुद्धीने, विवेकाने आपल्या चंचल मनावर मिळवलेले संपूर्ण नियंत्रण. गणपतीच्या कपाळावरील चंद्र आपल्याला शिकवतो की, बुद्धीच्या नियंत्रणाखाली आलेले मन हे उपहासाचे साधन न राहता शीतलता आणि शांततेचे प्रतीक बनते.
भालचन्द्राय नमः|
मन हे वासना आणि भावनांच्या लाटांवर हेलकावे खाणारे एक चंचल रूप आहे, तर बुद्धी ही त्याला समतोल देणारा दीपस्तंभ आहे. भरकटलेल्या मनाला अहंकाराच्या अंधकारातून बाहेर काढून स्थिरतेची दिशा दाखवणारे हेच आंतरिक तत्त्व म्हणजे ‘भालचंद्र’! संकटात सापडलेल्या मनाला स्थिर करून विवेकाच्या वाटेवर आणणारा हाच तो ‘भालचंद्र’!