प्रस्तावना
आज गणेश चतुर्थी! गणरायाच्या आगमनाचा दिवस. त्याची विविध रूपे आणि असंख्य नावे तर आहेतच. पण, या प्रत्येक नावामागे एक सुंदरशी कथा देखील आहे. यंदाच्या वर्षी येणाऱ्या या अनोख्या १२ दिवसीय गणेशोत्सवानिमित्तर १२ दिवस रोज एकेक नाव आणि त्यामागील रोचक कथा आपण ‘गणपती तुझे नाव चांगले’ या नाम मालेत पाहणार आहोत. आज गणरायाच्या अत्यंत लाडक्या अशा ‘गजानन’ या रूपाचे आणि नामाचे चिंतन करूया.
‘गजानन’ या शब्दाचा अर्थ अगदी सरळ आणि सोपा आहे. ‘गज’ म्हणजे हत्ती आणि ‘आनन’ म्हणजे मुख; अर्थात ज्याचे मुख हत्तीचे आहे तो‘गजानन’. परंतु, जगदंबेच्या आणि देवाधिदेव महादेवांच्या पुत्राला हे गजमुख का धारण करावे लागले? यामागील कथा जितकी नाट्यमय आहे, तितकीच ती मानवी मनाला अंतर्मुख करणारी आहे.
शिवपुराणातील कथा
शिवपुराणातील ‘रुद्रसंहिता’ अंतर्गत येणाऱ्या ‘कुमारखण्डा’त ही कथा वर्णिली आहे. एकदा आदिमाया जगदंबा पार्वतीने स्नानास जाण्यापूर्वी विचार केला की, अंतर्गृहाच्या द्वारावर स्वतःचा असा एक विश्वासू रक्षक असावा. त्यांनी आपल्या अंगाच्या उटण्यापासून एका अत्यंत देखण्या, सुकुमार बालकाची मूर्ती घडवली आणि आपल्या दिव्य तेजाने त्यात प्राण ओतले. मातेने त्या बालकाच्या हाती छडी दिली आणि आज्ञा केली, “बाळा, माझ्या अनुमतीशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नकोस.”
बालक आज्ञाधारक मुलाप्रमाणे द्वारावर उभा राहिला. इतक्यात साक्षात देवाधिदेव महादेव तिथे आले. त्रिलोकांचे स्वामी आपल्याच घरात प्रवेश करू लागले; पण या अनोळखी बालकाने त्यांना अडवले. बालकाचा तो निर्धार पाहून प्रथम शिवगणांनी त्याच्याशी युद्ध केले, पण मातेच्या तेजाने युक्त असलेल्या त्या बालकापुढे कोणाचेच काही चालेना. शेवटी महादेवांनी आपल्या त्रिशूळाचा प्रहार केला आणि त्या बालकाचे मस्तक धडावेगळे झाले!
स्नान आटोपून माता पार्वती बाहेर आल्या आणि पुत्राचा निष्प्राण देह पाहून त्यांचे काळीज विदीर्ण झाले. मातेचे ते वात्सल्य क्षणात रौद्ररूपात परावर्तित झाले. संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले. जगन्मातेचा हा संताप शांत करण्यासाठी महादेवांनी गणांना आज्ञा केली, “उत्तरेकडे जा, आणि जो प्राणी पहिल्यांदा दृष्टीस पडेल, ज्याची पाठ आपल्या दिशेने असेल, त्याचे मस्तक घेऊन या.” गण उत्तरेकडे निघाले. त्यांना एका शांत, संयमी आणि महाकाय गजाचे (हत्तीचे) दर्शन झाले. गणांनी ते मस्तक आणले. महादेवांनी ते गजशीर्ष त्या बालकाच्या धडावर प्रस्थापित करून संजीवनी मंत्राने त्यात प्राण भरले. बाळ उठून उभे राहिले! महादेवांनी त्याला प्रेमाने आलिंगन दिले, त्याला ‘गजानन’ हे नाव देऊन आशीर्वाद दिला की, “यापुढे त्रिभुवनात कोणत्याही शुभकार्यात पहिली पूजा या गजाननाची होईल.”
मुद्गल पुराणातील संदर्भ: लोभासुराचे मर्दन
या नावाला दुसरा एक गहन संदर्भ ‘मुद्गल पुराणा’त मिळतो. मुद्गल पुराणात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. त्यातील एक अवतार म्हणजे ‘गजानन अवतार’. मानवी मनाला अधोगतीकडे नेणारा सर्वात मोठा षड्रिपू कोणता असेल, तर तो म्हणजे ‘लोभ’—अमर्याद हाव! या लोभाचे मानवीकरण म्हणजेच ‘लोभासुर’.
लोभासुराने तपश्चर्या करून संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडले होते. ज्याच्या मनात लोभ शिरतो, त्याला नीती-अनीतीचे भान उरत नाही. अशा वेळी विश्वाला लोभाच्या पाशातून सोडवण्यासाठी गजाननाने अवतार धारण केला आणि लोभासुराचा गर्व मोडून काढला. म्हणूनच शिवपुराणातील ध्यानमंत्रात म्हटले आहे—
लोभासुरप्रमथनं गजवक्त्रं नमाम्यहम् ।
गजाननो महातेजाः सर्वविघ्नविनाशकः ॥
जो मानवाच्या लोभाचा नाश करतो आणि बुद्धीला सन्मार्ग दाखवतो, त्या गजाननाला माझा साष्टांग नमस्कार असो!
गजानन रूप
गजाननाचे रूप हे मानवी जीवनाला जगण्याचा आदर्श वस्तुपाठ शिकवते. हत्तीचे मस्तक अथांग विचारशक्ती, प्रगल्भता आणि गांभीर्याचे प्रतीक आहे. कान सुपासारखे मोठे असतात. सूप जसे फोलकट उडवून देते आणि सकस धान्य मागे ठेवते. माणसाने जगात वावरताना निंदा, नालस्ती, व्यर्थ गप्पा सोडून द्याव्यात आणि केवळ ज्ञानाचे, सत्याचे श्रवण करावे, हा या कानांचा तात्त्विक संदेश आहे. हत्तीचे डोळे बारीक असतात. याचा अर्थ जगात प्रत्येक गोष्टीकडे सूक्ष्म दृष्टीने पाहून परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. हत्तीची सोंड एवढी नाजूक असते की जमिनीवर पडलेली बारीक सुईही अलगद उचलू शकते, आणि एवढी बलवान असते की भल्याभल्या वृक्षाचे खोड मुळासकट उपटू शकते. माणसाची बुद्धीही अशीच हवी—प्रसंगी लवचिक आणि कर्तव्य बजावताना वज्रासारखी कठोर! मानवी शरीर हे भौतिक जगाचे प्रतीक आहे, तर गजाचे मुख हे साक्षात परब्रह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक आहे. जेव्हा सामान्य मानवी देहाला अशा वैश्विक ज्ञानाची जोड मिळते, तेव्हा जीवनाचे कल्याण होते.
गजाननाय नमः|
आपल्या अंतःकरणातील ‘लोभासुर’ जेव्हा ज्ञानाच्या वचनांनी शांत होतो, तेव्हाच आपल्या अंतरात खऱ्या ‘गजानना’चा वास होतो. बाह्य जगात विघ्ने कितीही आली, तरी गजाननासारखी विशाल बुद्धी आणि विवेकाची कास धरली, तर मानवी जीवनातील सर्व विघ्नांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही.