Tuesday, September 8, 2026

महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात अव्वल – अमित शाह

Share

मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास

पश्चिम विभागीय परिषदेची २८ वी बैठक

महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांकावर असून, देशाची वित्तीय राजधानी मुंबई जागतिक भांडवलाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गोवा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २८ व्या बैठकीत केले.

महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राज्याची स्टार्टअप परिसंस्था आणि मुंबईचा वाढता जागतिक दर्जा या बाबींना ठळकपणे अधोरेखित केले. तसेच, महाराष्ट्राने प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या (PACS) संगणकीकरणाचे 98% काम पूर्ण करून उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशाचा पहिल्या तिमाहीत 7.8% विकास दर

2026-27 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका विकास दर नोंदवल्याचे सांगत, जागतिक पातळीवरील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा दर साध्य करणे संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले. पश्चिम विभाग हा देशासाठी अनेक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, देशातील सर्वात मोठे आर्थिक, औद्योगिक आणि वित्तीय केंद्र असल्याचेही त्यांनी सांगितले.

सायबर गुन्हे व किनारपट्टी सुरक्षेवर भर

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्व अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना FCFRS प्रणाली व I4C केंद्राशी जोडणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नमूद केले. तसेच, आगामी काळात किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृह मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री व परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच संबंधित राज्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘नवीन न्याय संहितां’च्या अंमलबजावणीत पुढाकार घेण्यासोबतच, किनारपट्टीची सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि ‘अमली पदार्थमुक्त भारत’ मोहिमेसाठी कार्यसूची (अजेंडा) तयार करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले.

अन्य लेख

संबंधित लेख