मुंबईच्या वित्तीय केंद्र म्हणून स्थानाला बळकटी; SEBI, NSE आणि EDला बीकेसीमध्ये भूखंड हस्तांतरित
https://x.com/CMOMaharashtra
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ दरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) देशातील महत्त्वाच्या वित्तीय व तपास संस्थांना भूखंड हस्तांतरित करण्यात आले.
यामध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) मुंबई विभागीय कार्यालयाचा समावेश आहे.
या भूखंड हस्तांतरणामुळे संबंधित संस्थांना मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात आपल्या कार्यालयांचा विस्तार करण्यास सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांचे मुंबईतील अस्तित्व अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
मुंबई हे भारताचे प्रमुख वित्तीय केंद्र असून, वित्तीय सेवा, भांडवली बाजार आणि फिनटेक क्षेत्रातील वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर या संस्थांना बीकेसीमध्ये अधिक सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे मानले जात आहे. या उपक्रमामुळे मुंबईचे भारताचे प्रमुख वित्तीय केंद्र म्हणून असलेले स्थान आणखी बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी तसेच शासन आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.