‘Touch the Sky with Glory’ या भारतीय वायुदलाच्या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत एअर व्हाईस मार्शल शक्ती शर्मा यांनी महिलांसाठी वरिष्ठ नेतृत्वाची नवी वाट खुली केली आहे.
शक्ती शर्मा यांच्या ऐतिहासिक पदोन्नतीचे संरक्षण मंत्रालयाने स्वागत केले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांची ही कामगिरी भारतीय संरक्षण दलांमधील महिला अधिकाऱ्यांच्या प्रवासातील नवा महत्त्वाचा अध्याय आहे. तीन दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर शक्ती शर्मा आजच्या पिढीसह भविष्यातील महिला अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत. भारतीय वायुदलातील वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये महिलांचा वाढता सहभाग या कामगिरीमुळे अधोरेखित झाला आहे.
भारतीय हवाई दलाच्या एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा यांनी देशाच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला आहे! असे गौरवोद्गार उप-मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या शुभेच्छासंदेशांत म्हटले आहे.
वैद्यकीय शाखेव्यतिरिक्त इतर विभागांतून भारतीय सशस्त्र दलांमध्ये ‘एअर व्हाइस मार्शल’ या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. १ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांनी ‘असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ (शिक्षण)’ या पदाचा कार्यभार स्वीकारला.
१८ जून १९९४ रोजी हवाई दलात रुजू झाल्यापासूनचा शक्ती शर्मा यांचा तीन दशकांहून अधिक काळाचा सेवाप्रवास आज असंख्य महिला आणि तरुणींसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
राष्ट्रसेवेची जिद्द आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नवा इतिहास घडवणाऱ्या शक्ती शर्मा यांना मनापासून सलाम! असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
सैनिक स्कूलचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला :
एअर व्हाइस मार्शल होण्यापूर्वीही शक्ती शर्मा यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्रि-सेवा दलातून सैनिक स्कूलचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. त्यांनी सैनिक स्कूल, कपूरथला येथे प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक आणि संस्थात्मक पातळीवर विविध उपक्रम राबवण्यात आले.
IIT आणि विद्यापीठांसोबतही महत्त्वाचं काम :
शक्ती शर्मा यांनी भारतीय वायुदल आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य मजबूत करण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. IIT कानपूर आणि पुणे विद्यापीठात IAF Chairs of Excellence स्थापन करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. यामुळे संरक्षण क्षेत्रातील शैक्षणिक आणि संस्थात्मक सहकार्याला चालना मिळण्यास मदत झाली.
शक्ती शर्मा यांनी १९९४ मध्ये भारतीय वायुदलाच्या एज्युकेशन ब्रँचमध्ये कमिशन मिळवत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. विशेष म्हणजे, मेडिकल ब्रँचच्या बाहेर IAF मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.