Wednesday, September 2, 2026

‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’चे औचित्य साधून १७ सप्टेंबरपासून बीड-पुणे रेल्वे सेवा!

Share

बीड जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘बीड-पुणे’ रेल्वे सेवा ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’चे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे

‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि ‘बीड-पुणे’ व ‘बीड-मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.

या रेल्वेमार्गासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षितता चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, डिसेंबर अखेरीस ‘बीड-मुंबई (पनवेल)’ रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीची सर्व आवश्यक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

‘बीड-पुणे’ आणि ‘बीड-मुंबई’ रेल्वे सेवांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले; या सेवांमुळे बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला नवी गती मिळेल. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली, हे स्पष्टपणे या बैठकीत नमूद करण्यात आले.

गेल्या वर्षी बीडच्या जनतेची ४० वर्षांची प्रतीक्षा संपली आणि ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’चे (१७ सप्टेंबर) औचित्य साधून ‘बीड ते अहिल्यानगर’ रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू झाली होती; आता या वर्षी त्याच ऐतिहासिक दिवशी ‘बीड-पुणे’ रेल्वे सेवेचे उद्घाटन होत आहे.

‘बीड-पुणे’ रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट व अधिक कार्यक्षम रेल्वे संपर्क निर्माण होईल. यामुळे बीडमधील कृषी, उद्योग, शिक्षण, सामाजिक आणि व्यापार क्षेत्रांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, तसेच नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यासही मदत होईल. हा रेल्वे मार्ग बीडच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरेल.

१७ सप्टेंबर रोजी ‘बीड-पुणे’ रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीच्या उर्वरित सर्व तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षितता-विषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्या जाव्यात. त्याचबरोबर, डिसेंबर अखेरीस ‘बीड-मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने, आवश्यक कामांसाठी कालमर्यादा निश्चित करणारी योजना तयार करण्याचे आणि सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख