नुकताच १९६२ च्या चीन युद्धात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला होता…
चीनने एकतर्फी माघार घेतल्यामुळे आपली थोडी तरी अब्रू वाचली होती…
त्यात १९६४ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले…
आणि लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान झाले…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला याच्यात एक सुवर्णसंधी दिसली…
चीन युद्धात लाजिरवाणा पराभव झाल्यामुळे भारताच्या राजकीय नेतृत्वाचे व लष्कराचे मनोधैर्य खचलेले आहे… नेहरूंचे निधन झालेले आहे…
आणि ५ फूट २ इंच उंचीचा… धोतर नेसणारा… गांधी टोपी घातलेला… कुठलेही विशेष वक्तृत्व नसलेला… भारताचा हा पंतप्रधान आपल्याशी काय लढणार?…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या लष्करशहा अय्युब खानने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ हे गुप्त षडयंत्र आखून… ऑगस्ट १९६५ मध्ये आपल्या सुमारे ३० हजार सैनिकांना स्थानिक काश्मिरी लोकांचा वेष देऊन नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून आमच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी करायला लावली… स्थानिक लोकांच्या मदतीने भारताच्या विरोधात सशस्त्र बंड घडवून आणणे, हा या गुप्त मोहिमेचा मुख्य उद्देश होता…
या घुसखोरीला आणि छंब सेक्टरमधील आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून थेट पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोट क्षेत्रावर प्रतिहल्ला चढवला… बघता बघता युद्धाला तोंड फुटले…
अय्युब खानने “आम्ही सहज फेरफटका मारत दिल्लीपर्यंत पोहोचू,” अशी दर्पोक्ती केली…
पुढे दिल्लीच्या रामलीला मैदानावर जनतेला संबोधित करताना पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अयुब खान यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला… ते गमतीने म्हणाले… “अयुब खान यांनी दिल्लीला पोहोचणार असल्याचं जाहीर केलं होतं… ते खूप मोठे माणूस आहेत… मग त्यांना दिल्लीपर्यंत चालत येण्याचा त्रास कशाला द्यायचा?… म्हणून मी विचार केला की आपणच लाहोरला जाऊन त्यांचे स्वागत करू”…
युद्धाला तोंड फुटले…
भारतीय सैन्याने पंजाब सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि लाहोरवर अचानक हल्ला केला…
भारतीय सैन्याने वेगाने आगेकूच करत लाहोरच्या सीमेवरील इच्छेगिल कालव्यापर्यंत मजल मारली आणि लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या काही मैलांवर असलेल्या बाटापूर व बार्की भागापर्यंत ताबा मिळवला…
भारतीय सैन्याचा तोफखाना लाहोर विमानतळ आणि शहर त्याच्या टप्प्यात येण्याइतपत जवळ पोहोचला… यामुळे संपूर्ण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हादरले…
शत्रूला त्यांच्या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकन बनावटीच्या “पॅटन” रणगाड्यावर पुरेपूर विश्वास होता… पंजाबमधील खेमकरण जवळ झालेल्या ‘असल उत्तर’च्या लढाईत अमेरिकन बनावटीचे अनेक पॅटन रणगाड्यांची भारतीय सैन्याने वाताहात करून टाकली… तर अनेक रणगाडे ताब्यात घेण्यात आले… आज तिथे असे ९७ पॅटन रणगाडे भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभे आहेत…
अशाच एका रणगाड्यावर उभे राहून पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आपला फोटो प्रसिद्ध केला… भारतीय सैन्याच्या क्षात्रतेचा आणि शास्त्रीजींच्या खंबीर नेतृत्वाचा परिचय संपूर्ण जगाला झाला…
भारताने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सैन्याचे अक्षरशः कंबरडे तोडून टाकले…
या युद्धासोबतच देशात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता
आणि अमेरिकेकडून येणारी अन्नधान्याची आयात कमी झाली…
पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना आठवड्यातून एक वेळ (किंवा एक दिवस) उपवास करण्याचे आवाहन केले…
भारतीय जनतेने आपल्या लाडक्या पंतप्रधानांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला… अनेक नागरिकांनी तर एक वेळचे जेवण सोडले…
याच काळात शास्त्रीजींनी सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी आणि मनोधैर्य उंचावणारी ‘जय जवान जय किसान’ ही प्रसिद्ध घोषणा दिली…
चीन युद्धातील लाजिरवाण्या पराभवानंतर खचलेल्या भारतीय जनतेचे आणि लष्कराचे मनोधैर्य पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या असाधारण नेतृत्वाने कमालीचे उंचावले… देशवासीयांमध्ये असलेल्या देशप्रेमाच्या सुप्त भावनेचे रूपांतर त्सुनामीत झाले…
अय्युब खानचा लालबहादूर शास्त्री विषयी असलेला अंदाज साफ चुकला होता…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे अंदाजे ४.५ ते ५ हजार सैनिक मारले गेले… २०० पेक्षा जास्त पॅटन रणगाडे धुळीला मिळाले… अंदाजे ४३ लढाऊ विमाने नष्ट झाली… आणि सुमारे १,९२० चौरस किलोमीटरचा प्रदेश भारतीय सैन्याने ताब्यात घेतला…
अय्युब खानने रडकुंडीला येऊन गुडघे टेकले… संयुक्त राष्ट्र संघाच्या मध्यस्थीने युद्ध विराम झाला आणि पुढे “ताश्कंद करार”… आणि त्यातच शास्त्रीजींचा वयाच्या अवघ्या ६२ व्या वर्षी बळी गेला…
२ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशच्या मुघल सराय (सध्याचे पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर) इथे एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या परंतु आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान झालेल्या… आणि पंतप्रधान म्हणून जेमतेम दीड वर्षाच्या कालावधीत भारत मातेची अतुलनीय सेवा केलेल्या लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त शत शत वंदन.
भारत माता की जय🙏🇮🇳💐