Tuesday, April 14, 2026

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन  धर्मगुरू -“मार्टिन ल्यूथर” – भाग १

Share

तुम्ही कधी गुगुलवर जाऊन या जगावर प्रभाव टाकणाऱ्या माणसांची यादी शोधली आहे का? मी शोधली पण माझ्या डोक्यात मला जी चार माणसं वाटतात त्यांची नावे मला त्या यादीत आढळली नाहीत. तर गुगलनी दिलेल्या नावतले कोण आहेत हे चौघे जण?

पहिली व्यक्ती ही येशू ख्रिस्त आणि त्यापाठोपाठ महम्मद पैगंबर या दोन प्रेषितानी या जगाची ओळखच बदलून टाकली. या दोघानी केलेल्या धर्मप्रसारामुळे २००० वर्षापूर्वी या जगातील अनेक देशात कोणती सभ्यता होती? कोणता धर्म होता? हे आज त्या देशातील लोकांनाही माहित नाही. कुणाला परत मागे वळायचे असेल तर परत जायला काही शिल्लकच नाही. या दोघांमुळे जगभरात प्रचंड हिंसाचार झाला. क्रूसेड युद्धे, जिहाद यामुळे. ज्यांच्याकडे जुनी सभ्यता, धर्म, जीवनपद्धती शिल्लक आहे असा देश कदाचित फक्त भारतीय उपखंडात असेल. मला वाटत असलेले तिसरे नाव म्हणजे कार्ल मार्क्स, ज्याच्या आर्थिक तत्त्वज्ञानाने जगाला झपाटून टाकले, धर्माला अफूची गोळी म्हणणार्‍या या तत्वज्ञानाच्या प्रभावाखालीही कदाचित क्रूसेड किंवा जिहाद पेक्षा अधिक क्रूर आणि अधिक व्यापक हिंसा झाल्या. पण याचा प्रभाव झपाट्याने ओसरलेला आपण पहातो. चौथी, मला वाटत असलेली प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आपल्या कथनाचे नायक मार्टिन ल्यूथर. आपल्यातील अनेकांना अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग माहित आहेत पण आपल्या कथनातील नायक मार्टिन ल्युथर माहित नाहीत.

आपल्या कथनातील मार्टिन ल्यूथर हा जर्मनीतील असून, तो धर्मगुरू होता. त्याने प्रस्थापित कॅथलिक चर्च व धर्मगुरूंविरूद्ध बंड करून ख्रिश्चन धर्मांतर्गत प्रोटेस्टंट पंथ स्थापन केला. ज्याला युरोपियन इतिहासात रिफाॅर्मेशन काय म्हणून ओळखले जाते. याने मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखालीही जगभरात अनेक युद्धे, वंशविच्छेद घडून आले. आपल्या म्हणजे भारतीयदृष्टीने महत्वाचे म्हणजे आपल्या ब्रिटीश वसाहतवादी गुलामी प्रवृत्तीत हा मार्टिन नावाचा गुलाम बसला आहे. ज्याने आपला आपल्याकडे पहाण्याचा एक वसाहतवादी चष्मा दिला ज्यातून आजही आपण आपल्याकडे पहातो अगदी आपल्या कट्टर हिंदुत्वाकडे पण.

अशा या आपल्या कथनातील नायकाचा व त्याच्या तात्विक आणि धार्मिक  विचारांचा परिचय पुढील काही भागात करून घेऊ.

मार्टिन ल्युथरचा जन्म हंस ल्यूडर आणि मार्गारेथ या आई वडिलांचे पोटी १० नोव्हेंबर १४८३ साली झाला. नंतर ल्यूडरचे ल्यूथर झाले. जर्मनीतील आयस्लेबन गावात याचा जन्म झाला. जे गाव पवित्र अशा रोमन साम्राज्याचा भाग होते. दुसर्‍याच दिवशी मार्टिनचा बाप्तिस्मा झाला. मार्टिनला खूप भाऊ बहिणी होत्या. त्यातील जॅकाॅब नावाच्या भावाशी त्याची अधिक जवळीक होती. मार्टिन सर्वात थोरला असल्याने त्याच्या वडिलांना तो वकील व्हावा असे वाटत असे. १५०१ साली त्याने एरफर्ट युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला आणि १५०५ मध्ये त्याला मास्टर्स  मिळाली त्यानंतर वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्याने लाॅ साठी प्रवेश घेतला. पण जीवनातील निश्चितता शोधत असलेल्या मार्टिनचे मन कायद्यासारख्या बदलत्या आणि रुक्ष विषयात रमेना. त्याला तत्वज्ञान आणि धर्मशास्त्र विषयाची ओढ वाटू लागली. विशेषतः एरिस्टाॅटल, विल्यम ऑफ ओकहॅम आणि गॅब्रिएल बैल यामधे त्याला विशेष रस वाटू लागला. त्याच्यावर दोन शिक्षकांचा विशेष प्रभाव होता. बार्थोलोमस अर्नोल्डी तथा व्हॅन युसिजेन  आणि जोडोकस ट्रूटफेटर. त्यानी कितीही मोठ्या विचारकांवर किंवा विचारावर संशय घेतला पाहिजे हे त्याला शिकवले. प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला तरच ते खरे मानावे असे शिकवले.

पण तत्वज्ञानामध्येही त्याचे समाधान होईना. त्याला वाटायचे तत्वज्ञान कार्यकारणभाव (Reason) शिकवते पण देवावर प्रेम करायला शिकवत नाही. आणि असे प्रेम फक्त दिव्य साक्षात्काराच्या वर्तनातून शिकायला मिळते त्यामुळे दिवसेंदिवस त्याचा धर्मग्रंथाकडचा ओढा वाढला.

२ जुलै १५०५ मध्ये आपल्या घरातून युनिव्हर्सिटीकडे घोड्यावरून जात असता त्याच्यासमोर विजेचा लोळ कोसळला. त्यावेळी त्याला मृत्यूची आत्यंतिक भिती वाटली आणि त्याने जीवाच्या आकांताने सेंट ॲनीचा (सेंट मेरीची आई म्हणजे येशू ख्रिस्ताची नानी) धावा केला व म्हणाला मला मदत कर मी साधू (monk) बनेन. त्याने हे वडिलांना सांगितले आणि आता मी बोललो त्याप्रमाणे मला वागावे लागेल असे सांगून त्यानी युनिव्हर्सिटी सोडली आणि सेंट ऑगस्टिनच्या माॅनेस्ट्रीमध्ये (मठ) तो दाखल झाला. आपला मुलगा वकील होईल अशी आशा लावून बसलेले त्याचे वडील मात्र त्याच्या या निर्णयाने उद्विग्न झाले. त्याचे धार्मिक आयुष्य आणि धर्मातील बंडखोरी पुढील भागात.

                      – प्रसाद केळकर

अन्य लेख

संबंधित लेख