खार पोलिसांनी पाच बांगलादेशी घुसखोरांना भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यास आणि राहण्यास मदत केल्याप्रकरणी ३५ वर्षीय इक्बाल अकबरअली शेख उर्फ गौतम दत्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बालने त्यांच्या राहण्याची आणि रोजगाराची सोय केली होती.
एफआयआरनुसार, खार पोलीस ठाण्याच्या अँटी टेररिझम सेल (ATC) चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर चिंतामण खांडवी हे त्यांच्या पथकासह २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी एस. व्ही. रोडवरील वांद्रे ट्रॅफिक चौकीजवळ तीन पुरुष आणि तीन महिला संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. पोलीस उपनिरीक्षक अतुल मुर्डारे यांनी यापूर्वी कारवाई केलेल्या काही व्यक्तींना ओळखले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी चार जण याआधीही भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करताना आढळले होते आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले होते.
चौकशीदरम्यान त्यांची नावे इक्बाल शेख उर्फ गौतम दत्ता; राणा मोल्ला इमदादुल मोल्ला उर्फ राणा शाह (२०), समीम मिझानुर सरदार उर्फ राजू नरेंद्र (२५), हलिमा अख्तर उर्फ मोनिका दत्ता (२६), मोसामद मुंजिला खातून उर्फ शीला सरदार उर्फ रिया दत्ता (२३), आणि मफुजा अख्तर लिमा मोहम्मद हाशम काझी उर्फ कविता शाह (२५) अशी असल्याचे निष्पन्न झाले. हे सर्व जण मीरा-भाईंदर परिसरात राहत होते आणि त्यांनी मूळचे बांगलादेशचे असल्याचे चौकशीत कबूल केले. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी किंवा प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले वैध पासपोर्ट, प्रवास दस्तऐवज किंवा व्हिसा नव्हता. झडतीदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि बांगलादेशी नागरिकत्व दर्शवणारी कागदपत्रे जप्त केली आहेत.
बेकायदेशीर प्रवेश आणि वास्तव्यासाठी इक्बालने केली मदत
वेगळ्या चौकशीदरम्यान, पोलिसांना समजले की इक्बाल हा देखील बांगलादेशी नागरिक असून तो गेल्या ५ वर्षांपासून भारतात येत-जात होता आणि राहत होता. भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून राहिल्याप्रकरणी त्याच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे हलिमा ही ६ महिन्यांपूर्वी इक्बालच्या मदतीने भारतात आली होती. तर राणा मोल्ला, समीम मिझानुर सरदार, मोसामद मुंजिला खातून आणि मफुजा अख्तर लिमा हे २० सप्टेंबर रोजी कोणत्याही वैध दस्तऐवजांशिवाय भारतात आले होते. इक्बालशी संबंधित असलेल्या बांगलादेशी व्यक्तींनी सीमा पार करण्यास मदत केली आणि त्यासाठी त्यांनी इक्बालला पैसे दिले होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
बांगलादेशात आणि सीमेवर सक्रिय असलेल्या दलालांच्या जाळ्याने या पाच जणांना भारत-बांगलादेश सीमा बेकायदेशीरपणे पार करण्यास मदत केली. यासाठी या नागरिकांनी दलालांना मोठे पैसे दिले होते. भारतात आल्यानंतर इक्बालने विविध फ्लॅट आणि खोल्या मिळवून देणाऱ्या स्थानिक एजंटशी संपर्क साधून या पाच जणांच्या राहण्याची व्यवस्था केली. तसेच त्यांच्या रोजगाराची सोयही केली. मूळ बांगलादेशी नावे बदलून भारतीय/हिंदू नावे (उदा. गौतम दत्ता, कविता शाह, राजू नरेंद्र) धारण करून समाजात मिसळून जाण्याचा प्रयत्न केला गेला.
बेकायदेशीर घुसखोरांच्या आडोशाने दहशतवादी संघटना किंवा गुन्हेगारी रॅकेट भारतात आपले जाळे पसरवत आहेत. ज्या व्यक्तींची कोणतीही नोंद सरकारी दप्तरी नसते, त्यांचा वापर देशविरोधी कारवायांसाठी करणे सोपे जाते. घुसखोरी ही मानवी तस्करी (Human Trafficking), बनावट चलनाचे व्यवहार, अमली पदार्थांची तस्करी आणि बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळ्यांना खतपाणी घालते. अनेक सीमावर्ती आणि मेट्रो शहरांमध्ये घुसखोरांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक लोकसंख्येचे प्रमाण बदलून सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा घुसखोरांना आणि त्यांना मदत करणाऱ्या नेटवर्कला रोखण्यासाठी काही प्रभावी उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे.पकडले गेलेल्यांवर जबर आणि कठोर कारवाई केल्यावर इथे वसवलेल्या लोकांची पोलिसांना त्वरित माहिती मिळेल. या आरोपींवर कसून चौकशी केल्यास भारतामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे नेटवर्क्स या लोकांनी वसवली आहेत याचा अंदाज पोलिसांना तात्काळ मिळेल. त्याचप्रमाणे हे सूत्रधार यांच्याकडे राजकीय मदत केलेल्या सूत्रांचेही यथोचित माहिती असेल. त्यामुळे यांना सहज सोडणे शक्य नाही.
बनावट जन्म दाखले किंवा रेशन कार्डच्या आधारे तयार केलेल्या संशयास्पद ओळखपत्रांची मुळापासून तपासणी करण्यासाठी पोलिसांचा विशेष ‘डॉक्युमेंट व्हॅलिडेशन सेल’ स्थापन केला पाहिजे. त्यामुळे पकडल्या गेलेल्या प्रत्येक बेकायदेशीर व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती केंद्रीय डेटाबेसमध्ये साठवून, हद्दपार केलेल्या व्यक्तीने पुन्हा प्रवेश केल्यास तात्काळ ओळख पटवण्याची व्यवस्था होईल.
भाडेकरूंचे पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य करून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांवर गुन्हे दाखल व्हावेत. तसेच कंत्राटदार आणि कारखानदारांनी कामगारांना रोजगारावर ठेवण्यापूर्वी त्यांच्या वैध ओळखीची खात्री करणे सक्तीचे असावे. सीमेवरून घुसखोरी घडवून आणणाऱ्या दलालांवर मोक्का किंवा मानवी तस्करीविरोधी कठोर कायद्यांन्वये कारवाई झाली पाहिजे.
घरमालक व व्यावसायिकांना भाडेकरू किंवा कामगारांची माहिती सोप्या पद्धतीने नोंदवता यावी यासाठी विशेष मोबाईल ॲप तयार करायला हवेत. याशिवाय, पकडलेल्या घुसखोरांवरील खटले फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया जलद करावी आणि तोपर्यंत त्यांना सुरक्षित डिटेंशन सेंटर्समध्ये ठेवावे.