
कंगना राणावत ही बॉलीवूड मधली एक सुमार दर्जाची नटी… ती आमच्या शिवसेनेबद्दल आणि उद्धव साहेबांच्या सरकार बद्दल काहीतरी अद्वातद्वा बोलली… म्हणून मुंबईतल्या पाली हिल इथल्या तिच्या कार्यालयाचा काही भाग ९ सप्टेंबर २०२० रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगून पाडला… न्यायालयाने सूडबुद्धीने केलेली कारवाई म्हणून या पाडकामाला ताबडतोब स्थगिती दिली… काय अर्थ राहिला त्या कारवाईला…
बरं पाडला तो पाडला… वर दुसऱ्या दिवशीच्या सामनामध्ये “उखाड दिया” म्हणून फुशारकी मारण्याची काहीच गरज नव्हती… कंगनाने लगेच उद्धव साहेबांना उद्देशून… “आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगाl” म्हणत फिल्मी डायलॉग मारून घेतला… तिच्या कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईपेक्षा तिच्या या डायलॉगची चर्चा जास्त झाली…
एका बाईचं घर पाडणं हाच का तुमचा पुरुषार्थ…? असा तिरकस प्रश्न भक्तगण विचारू लागला… भक्तांना फाट्यावर मारले तरी उद्धव साहेबांनी एका दीड दमडीच्या पण बाईचे शाप घ्यायला नको होता… असं मला कायम वाटत राहिलं…

आणि याच २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात… शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लीम मुलांसाठी ‘अजान पठण’ स्पर्धा आयोजित करण्याच ठरवलं होतं… झालं… भक्तांनी अक्षरशः हैदोस घातला… सोशल मीडिया वर तर राळ उडवली… कधी नव्हे ती शिवसेना बॅकफूटवर आली… अजान पठण स्पर्धा रद्द करावी लागली… भक्त शर्टाची वरची २ बटणे उघडी टाकून आमच्याशी वादवितंड घालू लागले… तू अजून स्पर्धेत भाग घेणार आहेस की नाही? म्हणून मला डिवचू लागले… त्यांच्या डोक्यात वीट घालावी असा संताप येऊ लागला पण शेवटी आपलंच नाणं खोटं निघालं होतं… मी मनोमन शरमलो…

त्यात आगीत तेल ओतले आमच्या वडाळा शाखेने २०२१ सालचे उर्दू कॅलेंडर छापून… त्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख… जनाब बाळासाहेब ठाकरे असा होता… म्हशीच्या बरोब्बर जखमेवरच कावळा चोच मारतो तशी भक्तांनी या जनाब उल्लेखावर चोच मारली… बरं जनाब बाळासाहेब ठाकरे हे इंग्रजी छापल्यामुळे… आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही… दोन-चार खवचट भक्त तर मला भेटल्यानंतर सलाम वालेकुम… आणि उद्धव साहेबांना “जनाब उद्धव ठाकरे” म्हणू लागले… मला याची भयंकर लाज वाटायची…

या सगळ्या घोळात घोळ म्हणून… महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना राज्य ११ फेब्रुवारी २०२१ रोजी महाविकास आघाडी परवानगीशिवाय शासकीय विमानाने डेहराडूनला एका कार्यक्रमासाठी प्रवास करण्याच्या कारणामुळे… मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून विमान वापरासाठी परवानगी मिळाली नसल्याचे कारण सांगून… त्यांना विमानात बसल्यानंतर सुमारे १५-२० मिनिटांनी विमानातून उतरवण्यात आले…
वास्तविक भारतीय घटनेने राज्यपालांना काही बाबतीत अमर्याद अधिकार दिलेले आहेत… काही बाबतीत त्यांच्यावर निर्णय घेण्याच्या वेळेचे देखील बंधन नाही… अनेक बाबतीत न्यायालयसुद्धा राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही… हे योग्य आहे की अयोग्य हा पुढचा भाग झाला… पण ही आजची वस्तुस्थिती आहे… राज्यपालांना विमानातून उतरवणे हा उद्धव साहेबांच्या सरकारने
आपल्यावर उगाचच ओढवून घेतलेले गंडांतर होते असे मला वाटते… राज्यपालांच्या या अपमानामुळे स्वतः राज्यपाल… राष्ट्रपती… मोदी शहांचे केंद्र सरकार… विरोधी पक्ष… सगळ्यांची नाराजी उद्धव सरकारने कारण नसताना ओढवून घेतली… “मौका सभी को मिलता है” या न्यायाने… आता हे सगळे उद्धव साहेबांच्या सरकारच्या वाईटावर एकदिलाने टपून बसले होते…

मुंबई पोलिसांचा एक लाडका अधिकारी सचिन वाझे याला १३ मार्च २०२१ रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली… हे प्रकरण उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्याच्या आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या संशयास्पद प्रकरणामुळे घडले होते…
हा बदनाम पोलीस अधिकारी एका आरोपीच्या संशयास्पद मृत्यूमुळे बडतर्फ झाला होता… कोरोना काळात मनुष्यबळाची कमतरता दाखवून उद्धव साहेबांच्या राज्यात याला परत घेतला होता… परत घेताना राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी मजबूत तोडपाणी केले असणार याची मला खात्री होती…
मुंबईतून महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याची जबाबदारी याच्यावर वरिष्ठांनी दिली होती असा आरोप झाला… मनसुख हिरेन नावाच्या व्यापाऱ्याच्या जीवाला या पोलिस अधिकाऱ्यापासून धोका आहे असा आरोप विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला… (या टरबुजाचे प्रशासनात आणि पोलीस खात्यात बरेच खबरी होते एवढे निश्चित…)… तो पोलिस अधिकारी असल्यामुळे त्याच्या वरच्या सर्व आरोपांना राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते पण… विधिमंडळाच्या आवारात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी “सचिन वाझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातं आहे”… अशी वकिली करण्याचे काहीच कारण नव्हते… यालाच पुढे “मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार; तर सचिन वाझे यांचा सध्या शिवसेनेशी कोणताही संबंध नाही”… अशी पुस्ती जोडल्यामुळे… उद्धव साहेबांनीच सचिन वाजेला परत मुंबई पोलीस खात्यात घ्यायला लावला असावा आणि आता ते त्याला पाठीशी घालताहेत… असा जनतेला संशय येऊ लागला… भाजपचा भक्तगण तर असा स्पष्ट आरोप करत होता… यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आमच्याकडे कुठलाच बिनतोड युक्तिवाद नव्हता… मला आतल्या आत कोंडमारा होतो आहे असे वाटू लागले…

२४ ऑगस्ट २०२१ रोजी कोंबडी चोर नारायण राणेला अटक करण्यात आली होती… स्वर्गीय बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत अतोनात दुःखी करणारा हा कोंबडी चोर पोलिसांनी उचलला त्याचा शिवसैनिकांना आनंद झाला होता…
पण आता राज्यात आम्ही सत्तेत होतो… आणि कोंबडी चोर केंद्रात मंत्री होता… सबंध केंद्रीय सत्ता त्याच्या पाठीशी उभी होती… कितीही झालं तरी तो जेवत होता… जेवणाच्या ताटावरून उठवून त्याला अटक केली होती… विरोधकांनी आम्हाला अक्षरश: घेरलं… बरं यावेळी मामला कोंबडी चोराचा होता… महाराष्ट्राच्या गृह खात्यावर जबाबदारी ढकलून उद्धव साहेबांना मोकळं होता येणारच नव्हतं… शिवसेनेने ही सूड भावनेने केलेली कारवाई आहे हे उघड उघड दिसत होतं…
त्यातच मला माझ्या एका खूप जवळचा मित्र असलेल्या भक्ताने भाजपच्या… कल्याण सिंह, उमा भारती, येडीयुरप्पा अशा भाजपवर नाराज होऊन पक्ष सोडलेल्या… त्यांच्या दिग्गज नेत्यांच्या कहाण्या सांगितल्या… पक्ष सोडला तरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी या नेत्यांना अतिशय आदराने वागवले… त्यामुळे कालांतराने राग शमल्यावर आपली चूक कळून आल्यावर ही सगळी मंडळी परत भाजपमध्ये आली… भाजपनेही मोठा पण दाखवून या सगळ्यांना पक्षात परत घेतले… “घरवापसी” झाल्यावर देखील त्यांना पक्षात अत्यंत सन्मानाने वागवले गेले… पक्षात जबाबदारीची पदे मंत्री मुख्यमंत्री राज्यपाल केले गेले… मी आवाक् झालो…
काहीही झालं तरी नारायण राणे यांनी बाळासाहेबांना ३९ वर्षे सावली सारखी साथ दिली होती… साहेबांच्या आणि शिवसेनेच्या प्रत्येक चढ-उतारात यशापयशात ते बाळासाहेबांच्या कायम सोबत होते… नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत शिवसेनेत सगळी जबाबदारी पेललेले… शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री होते… पक्ष सोडला तरी त्यांनी कधी बाळासाहेबांबद्दल एक वाकडा शब्द काढला नव्हता… किमान त्यांना भरल्या ताटावरून तरी उठवायला नको होतं…
१९९९ ला राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले… लखोबा लोखंडे उपमुख्यमंत्री झाला… २५ जून २००० रोजी या लखोबाने… १९९२/९३ च्या मुंबई दंगलींचे जुने प्रकरण उकरून काढून या लखोबाने बाळासाहेबांना अटक करण्याची तयारी केली होती… आज तोच लखोबा उद्धव साहेबांच्या
मंत्रिमंडळात मंत्री होता… मांडीला मांडी लावून तुम्ही त्या कपटी कारस्थानी लखोबा बरोबर बसू शकता… पण आपला जुना कट्टर शिवसैनिक नारायण राणेला भरल्या ताटावरून उचलता?… माझ्या मनाची भयंकर तगमग होत होती… प्रश्नांना उत्तर तरी कोण देणार?… कारण इथे प्रश्न विचारायलाच बंदी होती… उद्धव साहेब म्हणतील ती पूर्व दिशा…
अरे त्या कोंबडी चोराची लायकी काय?… म्हणून उसनं अवसान आणून भक्तांना तडकवताना… माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी… कमीत कमी जेवताना तरी उचलायला नको हवं होतं… शेवटी कितीही झालं तरी तो आपला माणूस होता… हाडाचा शिवसैनिक होता यार तो… असं कायम सलत राहतं…

याच दरम्यान कोरोनाची लस आली होती… महाराष्ट्राचा “कुटुंबप्रमुख” म्हणून १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची हिंमत आणि ताकद उद्धव साहेबांनी दाखवली… पुढे कित्येक दिवस भक्तांच्या तोंडावर मारण्यासाठी मी हा सामनाचा अंक जवळ ठेवत होता पण…
उद्धव साहेबांवर जळणाऱ्या गुजरातच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीने सगळ्या देशाला फुकट लस वाटून उद्धव साहेबांना श्रेय मिळू दिले नाही…

फेब्रुवारी २०२२ मध्ये उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती… हे प्रकरण देशद्रोही आणि फरार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या बेकायदेशीर कारवायांशी आणि मालमत्ता व्यवहारांशी संबंधित होते… खरं म्हणजे उद्धव साहेबांनी नवाब मलिकाचा राजीनामा घ्यायला हवा… असं आम्हा शिवसैनिकांना वाटत होतं… घ्यायचा की नाही हा त्यांचा विशेष अधिकार होता… पण राष्ट्रवादीच्या लखोबा लोखंडेने… “मलिक यांना अटक झालेली असली तरी त्यांचा न्यायदेवते पुढे गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही” असे परस्पर सांगून टाकले… सरकार उद्धव साहेबांचं होतं की लखोबा लोखंडेचं?… आणि लखोबाच्या या आगाऊपणावर उद्धव साहेबांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही… माझ्यासाठी हा भ्याडपणा होता…
नवाब मलिक तुरुंगातून आपले मंत्रालय चालवत होते असेच चित्र विरोधकांनी उभे केले… उद्धव साहेबांनी नवाब मलिकांचा राजीनामा शेवटपर्यंत घेतला नाही त्यामुळे हे चित्र उभे राहिले आणि जनतेने त्याच्यावर विश्वास देखील ठेवला…
आणि असला मौका सोडतील तर ते भक्त कसले?… उद्धव साहेबांना ते कणाहीन लाचार मुख्यमंत्री म्हणू लागले… एक हरामखोर भक्त मित्र मला हा फोटो दाखवून म्हणाला… ” हे बघ सिल्व्हर ओक वरचं पायपुसणं”…

आता समोरून भक्त मित्र येताना दिसला की मी गल्ली बदलायला लागलो…

या जवळपास २.५ वर्षांच्या उद्धव साहेबांच्या पार पडलेल्या कारकिर्दीत त्यांच्या भाषणातून सुरुवातीच्या “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो” या आजपर्यंतच्या परिपाठी ऐवजी “जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो” असा मराठी किंवा देशभक्त किंवा काहीच विशेषण न लावता नुसता कोरडा उल्लेख होऊ लागला… उद्धव साहेबांनी “हिंदू” हा उल्लेख गाळल्यामुळे आम्हा सैनिकांना आमचे अस्तित्व सत्वहीन… प्राणहीन वाटू लागले… शिवसेनेतला प्राणच निघून गेल्यासारखे वाटू लागले…
पण वंदनीय बाळासाहेबांवरच्या नितांत प्रेमामुळे आणि त्यांना मनोमन दिलेल्या “आम्ही उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांना सांभाळू” या वचनामुळे… ही सगळी घुसमट होत असताना देखील मी शिवसेनेत टिकून राहिलो…

दुसऱ्या बाजूला आमचे प्रवक्ते आणि मुलुख मैदानी तोफ… संजय राऊत साहेब महाविकास आघाडीची सत्ता पुढची २५ वर्षे राहणार… असे छातीठोकपणे वारंवार सांगत होते…
कागदोपत्री हिशोब मांडला असता महाराष्ट्रातील… शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेतली तर ते अगदी सत्य सांगत होते… आमच्या ३ पक्षांची ताकद आणि शरद पवारांसारख्या राजकीय चाणक्याचे नेतृत्व… २५ वर्ष महाविकास आघाडीची सत्ता कुठे जाणार नव्हती या राऊत साहेबांच्या वचनावर आमचा पूर्ण विश्वास होता… आणि महाविकास आघाडीची सत्ता म्हणजे पुढची २५ वर्ष उद्धव साहेब किंवा आदित्य साहेब मुख्यमंत्री ही काळ्या दगडावरची रेघ होती… याच आनंदात आम्ही होतो…
विरोधी पक्षात एकटा भाजप होता… त्याची ताकद असून असून ती काय असणार… सुप्रियाताई सुळेंनी “अकेला देवेंद्र क्या करेगा?”… म्हणून टरबूजाला त्याची औकात दाखवून दिली होती… बाकी ते दोघे ढोकळा फाफडा जलेबीवाले गुजराती दिल्लीत राहिले होते… महाराष्ट्रात फक्त “ठाकरे ब्रँड” चालणार होता…
आम्ही खुशीत गाजरं खात होतो…
आणि एवढ्यात…

२१ जून २०२२ रोजी विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर… आमचे कट्टर शिवसैनिक आणि उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बहुसंख्य आमदार (सुमारे ४०) संपर्काबाहेर गेले… हा आमच्यासाठी प्रचंड मोठा धक्का होता… आम्ही हादरलो होतो…
हे बाजारबुणगे आधी सुरत, गुजरात आणि नंतर गुवाहाटी, आसाम येथील भाजपशासित राज्यांत थांबले… याचा अर्थ स्पष्ट होता… या गद्दारांना दिल्लीचे ते दोन दाढीवाले फूस लावत होते…
एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी आरोप केला की… उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात आणि सरकारमध्ये त्यांना सातत्याने डावलले गेले… आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही…
अनेक आमदारांनी निधीवाटपावरून नाराजी व्यक्त केली होती… तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या खात्यांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याचेही त्यांचे म्हणणे होते…
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहिल्यास पुढील निवडणुकीत विजय मिळवणे कठीण होईल असे बहुतेक आमदारांचे म्हणणे होते…
गद्दारी शिवसेनेला नवीन नव्हती… यापूर्वी बंडू शिंगरे… छगन भुजबळ… नारायण राणे… राज साहेब ठाकरे… यांनी गद्दारी केलीच होती पण शिवसेनेच्या बुरुजाचा एक चिरा देखील ढासळला नव्हता… आता मात्र किल्ल्याचे दरवाजे आतूनच उघडले गेले होते… शिवसेनेत अक्षरशः दुफळी माजली होती…
(क्रमश:)
– तुमचाच
बाळासाहेबांचा शिवसैनिक
या आधीचे भाग वाचा –
१) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १
२) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २
३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३
४) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४
५) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५
६) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६