Monday, June 8, 2026

घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही!

Share

आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही, सणावारी जमणारी वडीलधारी भावंडं, त्यांची मुलं, सूना-जावई, नातवंडं, त्याने भरून जाणारं अंगण, देवघरातील रोजची घंटा एवढ्यानेही घर मोठं होतं. देशमुखांचं घर असंच मोठं होतं.

पाच भावंडं. प्रत्येकाचं शिक्षण, संसार, नोकरी, शहरं वेगवेगळी. कोणी पुण्यात, कोणी नाशिकला, कोणी मुंबईत, कोणी नागपुरात. धाकटा भाऊ शरद पुण्यात स्थायिक झाला होता. पण सगळ्यांची पाळंमुळं अजूनही जुन्या वाड्याशी, एकमेकांच्या आठवणींशी आणि सुखदुःखाशी जोडलेली होती.

घरातील सगळे सुशिक्षित. मुलं-मुली तर त्याहून पुढची — इंजिनिअर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, आयटीवाले, परदेशी शिकलेले. घरात चर्चा व्हायच्या त्या जात, पात, परंपरा, आधुनिकता, धर्म, संविधान, करिअर, अमेरिका, भारत — सगळ्यावर.

एकंदरीतच हे घर आधुनिक विचारसरणीने पुढे चालणारं होतं. शरदची मुलगी अनन्या अमेरिकेत शिकायला गेली आणि तिथेच नोकरीला लागली. हुशार, आत्मविश्वासी आणि देखणी. तिच्या यशाचा अभिमान सगळ्यांनाच होता. काका-काकू, आत्या-मामा, मावशी-मामा, चुलत-मामे-आते भावंडं!

मग एक दिवस बातमी आली — अनन्या लग्न करणार होती. मुलगा भारतीयच. सुशिक्षित. चांगल्या कुटुंबातील. दोघंही समजूतदार. एकच गोष्ट कुजबुजीत सांगितली गेली — तो वेगळ्या जातीचा आहे.

घरात चर्चा झाली. काहींच्या भुवया उंचावल्या. वडिलधाऱ्या मंडळींनी सगळी खात्री करून घेण्यास सांगितले, काहींनी एवढंच विचारलं, “मुलगा चांगला आहे ना?”, तरुण मंडळींना जात हा प्रश्नच वाटला नाही. थोडी चर्चा झाली, काही शंका व्यक्त केल्या गेल्या, काही नव्या काळाचे मुद्दे मांडले गेले; पण शेवटी संपूर्ण घराने होकारच दिला!

खरं तर हीच वेळ होती जिथे अनन्याने किमान आपल्या भावंडांशी स्पष्टपणे बोलायला हवे होते, तिने सांगायला हवे होते:
“मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे.”
“आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.”

इतकं बोलणं कठीण नव्हतं. तेवढं नातं होतं. तेवढा विश्वास होता. किंवा कदाचित — होता असं सगळ्यांना वाटत होतं.

त्याच उन्हाळ्यात शरद आणि त्याची पत्नी अमेरिकेला गेले. घरात सांगण्यात आलं की, लग्न ठरलं आहे. पुढे भारतात लग्न समारंभ होईल, विधी होतील. सगळ्यांना बोलावू. छान कार्यक्रम करू. घरात आनंदाचे वारे वाहायला लागले आणि लग्नाची तयारी देखील सुरु झाली.

मात्र, शरद आणि कुटुंब अमेरिकेत असतानाच सोशल मीडियावर अनन्याच्या अमेरिकेतील रजिस्टर विवाहाचे फोटो दिसू लागले. त्यात वधू – वरांचे पालक आणि ते असे होते! “म्हणजे, भारतात लग्न करू असे सगळ्यांना सांगितल्यावर अमेरिकेत परस्पर लग्न होऊन गेले”

त्या लग्नात अनन्यचा सख्खा भाऊ आणि वहिनी देखील नव्हते. केवळ वधुवरांचे माता – पिता. नोंदणीकृत लग्न जरी असले तरी त्या मागे कागदपत्ररांची जुळवा-जुळव असते, तयारी असते. म्हणजे सगळं आधीच ठरलं होतं. फक्त घरातल्यांना सांगितलं गेलं नव्हतं!

कुणी स्पष्ट विचारण्याचं धाडस केलं नाही. कुणी स्पष्ट सांगण्याचं प्रामाणिकपणा दाखवला नाही, आणि मोठ्या घराच्या व्हाट्सअप ग्रुप वरील अंगणात एक विचित्र शांतता पसरली! ही शांतता रागाची नव्हती. अपमानाचीही नव्हती. “ती अविश्वासाची होती.” जात हा प्रश्न नव्हता. परदेश हा प्रश्न नव्हता. नोंदणीकृत विवाह हा प्रश्न नव्हता. प्रश्न होता — आपल्या लोकांना परकं समजण्याचा.

त्या संध्याकाळी घरातील ज्येष्ठ भाऊ आप्पासाहेब अंगणात बसले होते. हातातला चहा बराच वेळ थंड होत राहिला. ते हळूच म्हणाले, “आपण नव्या काळाला नकार देणारे क्रूर लोक नव्हतो गं! आपण फक्त लेकरांच्या आनंदात सामील होऊ इच्छिणारे पाठीराखे होतो. मग त्यांनी आपल्याला आधीच ‘जुनाट’ ठरवून परकं का केलं?” त्यांच्या पत्नीने शांतपणे म्हटलं, “कदाचित त्यांना वाटलं असेल, आपण समजून घेणार नाही.” आप्पासाहेब म्हणाले, “आपण समजून घेणार नाही म्हणून त्यांनी खरं लपवलं, की खरं लपवायचं होतं म्हणून आधीच आपल्याला कालबाह्य ठरवलं? यात फरक असतो गं. पहिल्या गोष्टीत भीती असते; दुसऱ्या गोष्टीत अविश्वास असतो.”

कालांतराने भारतात मंडप उभारला गेला. फुलांच्या कमानी, सनई, वाजंत्री, पुजारी, छायाचित्रकार, नातेवाईक सगळे अनन्याच्या विवाहसमारंभास आले. सगळ्यांनी हसून गाठीभेटी घेतल्या. अनन्याला आशीर्वाद दिले. मुलालाही प्रेमाने स्वीकारलं. कुणीही प्रसंग बिघडवला नाही. घराची संस्कृती तशी नव्हती. पण त्या दिवशी अग्नीकुंडासमोर मंत्रोच्चार सुरू झाले, तेव्हा काहींच्या मनात एक न उच्चारलेला प्रश्न जळत राहिला, हा खरोखर विवाह संस्कार आहे की सगळ्यांचीच सांस्कृतिक, धार्मिक आणि वैचारिक फसवणूक?

कायद्याने पती-पत्नी झाल्यानंतर पुन्हा संस्काराचे नाटक का करायचे? की आधीच झालेल्या नात्याला आपल्या परंपरेचे छप्पर द्यायचे? प्रश्न अमेरिकेत विवाह करण्याचा नव्हता. तिथे विवाह करायचा असेल तर करा. स्थानिक कायद्यानुसार नोंदणी करा. तिथल्या मंदिरात जाऊन वैदिक विधी करा. दोन साक्षीदार पुरतील तर दोन असू द्या. पालक असतील तर तेच पुरे. साधेपणा पाप नाही. पण साधेपणाच्या नावाखाली सत्य लपवणं, खोटे बोलणे हा नात्यांवर केलेला अन्याय आहे.

“आम्ही तिथेच विवाह केला. भारतात येऊन फक्त स्वागत समारंभ ठेवू,” एवढं सांगितलं असतं, तर कदाचित घराला सुरुवातीला टोचलं असतं. कुणी दोन शब्द बोललं असतं. कुणी परंपरेची आठवण करून दिली असती. पण काही दिवसांनी सगळं निवळलं असतं.

सगळे ग्रुप कॉल वर जॉईन होऊ शकले असते, आनंदात सहभागी होऊ शकले असते. कारण सत्याला दुखावण्याची ताकद असते; पण खरे बोलण्याने नाते वाचू शकले असते! असत्य मात्र हसतमुखाने येतं आणि आतून कुटुंबाचा पाया पोखरतं. कार्यक्रम संपला. पाहुणे गेले. मंडप उतरला. फुलं कोमेजली. छायाचित्रकाराने “हायलाइट फिल्म” पाठवण्याचं आश्वासन दिलं!

काही महिन्यांनी अनन्या पुन्हा अमेरिकेला गेली. तिचं आयुष्य सुरू राहिलं. सुंदर घर, दोघांची नोकरी, दिवाळीत लावलेले दिवे, Zoom वर कुटुंबीयांना नमस्कार. सर्व काही व्यवस्थित दिसत होतं. पण मोठ्या घराच्या WhatsApp ग्रुपवर आधीसारखी नात्याची उब राहिली नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या, पण वैयक्तिक फोन कमी झाले. सणांचे फोटो शेअर झाले, पण प्रतिसाद औपचारिक झाले. चुलत-मामे-आते भावंडांतील सहज चेष्टा थांबली! कोणी उघड बोललं नाही; पण न बोलण्याचे वेगवेगळे दरवाजे तयार झाले.

विश्वास तुटतो तेव्हा आवाज होत नाही. काच फुटते तसा आवाज नसतो. तो धागा झिजतो, तसा तुटतो आणि कळतं तेव्हा वस्त्र हातात राहतं, पण विण हरवलेली असते.

परंपरा म्हणजे बेडी नाही. कुटुंब म्हणजे नियंत्रण नाही. धर्म म्हणजे दिखावा नाही.
आधुनिकता म्हणजे मुळांपासून पळ काढणं नाही.

शरद वाईट पिता नव्हता. त्याची पत्नीही वाईट आई नव्हती. अनन्या आणि तिचा नवरा चुकीची माणसं नव्हती. कदाचित ते फक्त घाबरले. कदाचित त्यांना संघर्ष टाळायचा होता. कदाचित त्यांना वाटलं — आधी करून टाकू, मग सगळे स्वीकारतील. पण माणूस अनेकदा संघर्ष टाळताना नातंच टाळून जातो. खरं धैर्य आक्रमक बोलण्यात नसतं. खरं धैर्य आपल्या लोकांसमोर सत्य ठेवण्यात असतं. “हो, आम्ही वेगळ्या जातीचे आहोत.” “हो, आम्ही अमेरिकेतच विवाह करणार आहोत.” “हो, आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे.” “हो, आमच्या पद्धतीने करू; पण तुमच्याशी प्रामाणिक राहू.” ही चार वाक्यं बोलली असती, तर कदाचित घर अजून मोठं झालं असतं. कारण कुटुंब रक्ताने टिकत नाही; विश्वासाने टिकतं. धर्म विधींनी टिकत नाही; श्रद्धेने टिकतो. आधुनिकता शिक्षणाने येत नाही; प्रामाणिकतेने येते.


विवाह अमेरिकेत झाला की भारतात — हा मोठा प्रश्न नाही. मोठा प्रश्न आहे — विवाहाने दोन जीव एकत्र आले; पण त्या प्रक्रियेत किती नाती दूर गेली?

– ॲड. आशिष सोनावणे

अन्य लेख

संबंधित लेख