Saturday, June 6, 2026

दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात

Share

आजवर आपण शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याची चर्चा अनेकदा केली आहे. न्यायालयापासून ते शिक्षण तज्ज्ञांपर्यंत सर्वांनीच हे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवले. परंतु बदलत्या काळाची पावले ओळखून आता दप्तराकडे केवळ ‘वजन’ या दृष्टिकोनातून न पाहता त्याकडे पर्यावरणीय जाणिवांचा निर्देशांक’ म्हणजेच ‘ग्रीन स्कोअर’ म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. दप्तराचा ग्रीन स्कोअर म्हणजे विद्यार्थ्यांच्या रोजच्या वापरातील वस्तू किती पर्यावरणपूरक आहेत, याचे मूल्यमापन करणे होय.

‘ग्रीन स्कोअर’ म्हणजे काय?

ज्याप्रमाणे एखाद्या उपकरणाची ऊर्जा कार्यक्षमता मोजण्यासाठी स्टार रेटिंग असते अथवा आर्थिक पत मोजण्यासाठी सिबिल स्कोअर असतो अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या दप्तराचा पर्यावरणावर होणारा परिणाम मोजण्यासाठी ‘ग्रीन स्कोअर’ ही संकल्पना आहे. दप्तरामध्ये असणाऱ्या वस्तू किती पर्यावरणपूरक आहेत, त्या कशापासून बनल्या आहेत, त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो का किंवा त्या नष्ट करताना निसर्गाला किती हानी पोहोचते यावरून हा स्कोअर ठरवला जातो.

उदाहरणच द्यायचे झाल्यास प्लास्टिकची वॉटर बॉटल, प्लास्टिकचा डबा, कृत्रिम रसायनांचे पेंट्स, प्लास्टिकचे कव्हर घातलेल्या वह्या असणाऱ्या दप्तराचा ग्रीन स्कोअर खूप कमी असेल. याउलट स्टील बॉटल, स्टीलचा डबा, रिसायकल केलेल्या कागदाच्या वह्या आणि कापडी दप्तर असणाऱ्या विद्यार्थ्याचा ग्रीन स्कोअर सर्वोत्तम असेल. ही जाणीव बालपणातच रुजली तरच आपली पिढी निसर्गाचे रक्षण करण्यास सक्षम असणार आहे.

संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि शालेय शिक्षण

संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण समितीने नेहमीच शाश्वत विकासासाठी शिक्षण क्षेत्रावर भर दिला आहे. UNEP च्या मते जोपर्यंत पर्यावरणपूरक जीवनशैली आपल्या दैनंदिन सवयींचा भाग बनत नाही तोपर्यंत जागतिक तापमानवाढ रोखणे अशक्य आहे.

आज बाजारात मिळणारी बहुतांश दप्तरे, कंपास पेट्या, पाण्याच्या बाटल्या आणि पेन हे ‘सिंगल युज’ प्लास्टिकचे बनलेले असतात. UNEP च्या अहवालानुसार, दरवर्षी कोट्यवधी टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो ज्यातील मोठा हिस्सा शालेय साहित्यातून येतो.याचा विचार देखील होणे आवश्यक आहे.

शाळा आणि पालकांची भूमिका

हा बदल केवळ विद्यार्थ्यांवर लादून चालणार नाही. यामध्ये शाळा प्रशासनाची आणि पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. पालकांनीही मुलांना महागड्या, चकचकीत प्लास्टिकच्या वस्तू घेऊन देण्याचा हट्ट सोडला पाहिजे. वाढदिवसाला मुलांना प्लास्टिकची खेळणी किंवा कंपास देण्याऐवजी झाडांचे रोप, लाकडी खेळणी, पर्यावरणपूरक पुस्तके भेट देणे यथोचित असेल..

पुस्तकात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा धडा वाचणारा विद्यार्थी जर प्लास्टिकच्या वेष्टनात गुंडाळलेली पुस्तके वापरत असेल, तर त्या शिक्षणाचा काहीही उपयोग नाही. पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे केवळ वर्षातून एकदा वृक्षारोपण करणे नव्हे, तर दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू निवडीमध्ये सजग असणे होय.

शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी व्यवस्था नसून सुजाण नागरिक घडवणारे व्यासपीठ आहे. बालकांमध्ये लहानपणापासूनच निसर्गाप्रती कृतज्ञता आणि पर्यावरणाची काळजी घेण्याची सवय रुजवली, तरच आपण शाश्वत भविष्याची, आत्मनिर्भर राष्ट्राची निर्मिती करू शकणार आहोत. दप्तरातील प्रत्येक वस्तू निवडताना ती निसर्गाला हानी पोहोचवणारी नसावी, हा संस्कार मुलांवर होणे गरजेचे आहे. जुन्या वह्यांचे कोरे कागद एकत्र करून नवीन वही बनवणे, कागदाचा दोन्ही बाजूंनी वापर करणे यासारख्या छोट्या गोष्टीही दप्तराचा ग्रीन स्कोअर वाढवण्यास मदत करतात.

पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे या मोहिमेत पुढाकार घेण्याची गरज आहे. ‘माझे दप्तर, माझे पर्यावरण’ ही भावना जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होत नाही, तोपर्यंत केवळ कायदे करून पर्यावरण रक्षण होणार नाही. दप्तराचा वजन कमी करण्यासोबतच त्याचा ‘ग्रीन स्कोअर’ वाढवणे हेच आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान पर्यायाने काळाची गरज आहे.

“Children are the builders of the nation, and by the right education and upbringing, they can be made the great citizens of tomorrow.”- Pandit Jawaharlal Nehru


– हिमांशु शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख