Friday, September 4, 2026

भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल – बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर

Share

भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून हे नाते ‘ॲडमास’ अर्थात कधीही न तुटणारे आहे, असे प्रतिपादन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी केले. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी मुंबई भेटीचा विशेष उल्लेख करताना अँटवर्प आणि मुंबई या दोन्ही शहरांची तुलना आर्थिक केंद्र म्हणून केली.

भारत हा जगातील हिऱ्यांचे उगमस्थान असून हिरे व्यापाराची हजारो वर्षांची परंपरा या देशाला लाभली आहे. अँटवर्प आणि भारत यांच्यातील हिरे व्यापाराचे संबंध अनेक दशकांपासून परस्परपूरक स्वरूपाचे राहिले आहेत. आज जगातील दहा पैकी नऊपेक्षा अधिक हिऱ्यांवर भारतात पैलू पाडले जातात, तर अँटवर्प हे जागतिक हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स येथे आयोजित हिरे व्यापार क्षेत्रातील उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साली, हिरे उद्योगाशी संबंधित उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात भारत-बेल्जियम हिरे व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांतील उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात आगामी काळात नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी बेल्जियमचे राजदूत डिडिएर व्हॅंडरहासेल्ट, महावाणिज्यदूत फ्रँक गीर्केन्स, भारताचे बेल्जियममधील राजदूत प्रणय वर्मा, डायमंड बोर्सचे पदाधिकारी आणि हिरे उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख