Friday, September 4, 2026

कृष्ण जन्माष्टमी: भारताच्या सांस्कृतिक आणि विविधतेतील एकतेचा सोहळा

Share

भारत हा जगाच्या नकाशावर असलेला एक देश नाही, तर हजारो वर्षांच्या संस्कृतीने बांधून ठेवलेली एक अखंड भूमी आहे. या भूमीला एकत्र बांधण्याचे काम श्रीकृष्णाने केले आहे. कृष्ण जन्माष्टमी हा केवळ एका देवाच्या जन्माचा उत्सव नाही, तर भारताची विविधता, बंधुता आणि सांस्कृतिक परंपरा एकत्र आणणारा एक सोहळा आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा असो, गुजरातची द्वारका असो किंवा महाराष्ट्रातील दहीहंडी  प्रत्येक राज्याची भाषा, पद्धत वेगळी आहे. पण सर्वांच्या मनात वसलेला कृष्ण मात्र एकच आहे!

मथुरा ते द्वारका

श्रीकृष्णाच्या आयुष्याचा प्रवास दोन महत्त्वाच्या टप्प्यांत विभागलेला दिसतो:

  • मथुरा-वृंदावनामध्ये बालकृष्णाचे खोडकर रूप, बासरी, ‘रासलीला’ आणि ‘सांझी’ कला पाहायला मिळते. इथली ‘ब्रज चौरासी कोस परिक्रमा’ हजारो भाविकांना भक्तीच्या एकाच धाग्यात बांधून ठेवते.
  • द्वारकेमध्ये बालकृष्णाचे रूपांतर एका मुत्सद्दी, राजा आणि महाभारतातील तत्त्वज्ञ श्रीकृष्णात होते.

यमुनेच्या तीरापासून ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंतचा हा प्रवास भारताच्या सांस्कृतिक स्मृतींचा एक अनोखा भाग बनला आहे.

विविध राज्यांतील अनोख्या परंपरा

जन्माष्टमी साजरी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी, पण त्यामागील उत्साह तोच!

  • महाराष्ट्र दहीहंडी ही गोविंदा पथकांची मानवी मनोरे रचण्याची कला म्हणजे केवळ खेळ नाही, तर संघभावना, धैर्य आणि परस्परांवरील विश्वासाचे प्रतीक आहे.
  • उत्तर प्रदेशातील झुलनोत्सव हा वृंदावनातील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णाला सोने-चांदीच्या झुल्यांवर बसवले जाते आणि मध्यरात्री छप्पन भोगांचा महानैवेद्य दाखवला जातो.
  • हरियाणात मटकी-फोड आणि गो-पूजा केली जाते. कुस्तीचे दंगल, गायी-वासरांची पूजा आणि मध्यरात्रीनंतर अस्सल देशी तुपातील खीर व लोण्याने सोडला जाणारा उपवास, अशी इथली खास पद्धत आहे.
  • बिहारमध्ये शोभायात्रा आणि लाठी खेळ खेळतात. पाटणा-दरभंगामध्ये निघणाऱ्या मिरवणुकीत पारंपारिक ‘लाठी खेळ’ आणि बाळ जन्माच्या वेळी गायली जाणारी ‘सोहर’ ही लोकगीते गाण्याची खास परंपरा आहे.
  • गुजरातमध्ये माखण-हंडी आणि गरबा करतात द्वारकाधीश मंदिरात ५२ गजांचा ध्वज फडकवला जातो. मक्खन-हंडीसोबतच दांडिया आणि गरब्याची रंगत इथे पाहायला मिळते.
  • केरळमध्ये’उरीअडी’ म्हणजे दोरीने वर-खाली हलवलेल्या मडक्याला काठीने फोडण्याचा थरारक खेळ. लहान मुलांना राधा-कृष्णाच्या रूपात सजवून चेंडामेलमच्या (वाद्य) तालावर मिरवणुका काढल्या जातात.
  • कर्नाटक (उडुपी श्रीकृष्ण मठ): संत कनकदासांच्या भक्तीने प्रसन्न होऊन मंदिराच्या भिंतीला पडलेल्या भेगातून श्रीकृष्णाने त्यांना दर्शन दिले होते, ती ‘कनकना किंडी’ आजही या भक्तीचे प्रतीक म्हणून उभी आहे.
  • तमिळनाडूमध्ये घराच्या दारापासून ते पूजेच्या घरापर्यंत तांदळाच्या पिठाने बालकृष्णाची छोटी-छोटी पावले काढली जातात, जणू प्रत्यक्ष बाळकृष्णच घरात चालत येत आहे!
    • पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये चैतन्य महाप्रभूंचे नामसंकीर्तन आणि जयदेवांचे ‘गीतगोविंद’ आजही इथल्या हवेत भक्तीरस पेरते.
    • आसाममध्ये श्रीमंत शंकरदेवांनी स्थापन केलेले ‘नामघर’ आणि ‘सत्रिया नृत्य’ कृष्णाच्या भक्तीत तल्लीन करते.
    • मणिपूरमध्ये येथील प्रसिद्ध ‘मणिपुरी शास्त्रीय नृत्य’ आणि यूनेस्कोचा वारसा ठरलेले ‘नट संकीर्तन’ जन्माष्टमीचा सोहळा अत्यंत निसर्गरम्य आणि आध्यात्मिक बनवते.

पिढ्यानपिढ्या जपलेला एकतेचा वारसा

कृष्ण जन्माष्टमी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते ती आहे एकता म्हणजे सगळीकडे एकसारखेपणा असणे नव्हे!

आपल्या वेगळ्या भाषा, वेगळे पोषाख आणि वेगळ्या चालीरीती जपत असतानाही, जेव्हा आपण एकत्र येऊन उत्सव साजरा करतो, तेव्हा भारताची विविधता अधिक सुंदर दिसू लागते. जन्माष्टमी हा भूतकाळातील आठवणींचा उत्सव तर आहेच, पण सोबतच तो आपल्या संस्कृतीचा आणि सामाजिक एकतेचा जिवंत प्रवाह आहे!

अन्य लेख

संबंधित लेख