मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारीच्या विलीनीकरणाचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. फडणवीसांच्या या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला एक नवी दिशा मिळाली आहे.
“अजितदादांनी आम्हाला कल्पना दिली असती”
विलीनीकरणाच्या दाव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “अजितदादा आणि आम्ही सातत्याने विविध विषयांवर चर्चा करायचो. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत खरोखर काही हालचाली किंवा चर्चा सुरू असत्या, तर अजितदादांनी आम्हाला त्याची निश्चितपणे कल्पना दिली असती. त्यांनी आम्हाला याबाबत काहीही सांगितले नव्हते.” या विधानातून मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचा विलीनीकरणाचा दावा एका प्रकारे खोडून काढला आहे.
विलीनीकरणासाठी भाजपची ‘ही’ अट
भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, तर त्यावर भाजपची भूमिका काय असेल? हे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी एक अट समोर ठेवली आहे. ते म्हणाले, “जर दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र यायचे असेल, तर त्याआधी त्यांनी आमच्याशी (भाजपशी) चर्चा करणे अनिवार्य आहे.”
सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे, तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे. त्यामुळे विलीनीकरण झाल्यास सत्तेचे समीकरण बदलू शकते, हे ओळखूनच फडणवीसांनी ही ‘चर्चा करण्याची’ अट घातल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि त्या पक्षाचे निर्णय घेण्यास ते सक्षम होते, असे सांगत फडणवीस यांनी अजितदादांच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले. अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर आता हा गट काय निर्णय घेतो, यावर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे.
विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार गटाला सत्तेत यावे लागेल किंवा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल. या तांत्रिक आणि राजकीय पेचावर फडणवीसांनी घेतलेली भूमिका महायुतीमधील राष्ट्रवादीच्या स्थानाबद्दल बरंच काही सांगून जाणारी आहे.