Monday, December 30, 2024

दिल्लीतील भाजपच्या पहिल्या नगरसेविका: पुण्याच्या पुष्पाताई काळे यांच्या आठवणींचे पुस्तक

Share

दिल्ली महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या नगरसेविका पुष्पाताई काळे यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या आठवणींचा पुष्पगुच्छ असे स्वरूप असलेल्या ‘प्रवाह‘ पुस्तकाचे एका स्नेहमेळाव्यात प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये ९१ वर्षांच्या पुष्पाताई यांनी गप्पांची दिलखुलास मैफल रंगविली.

कुटुंबवत्सल गृहिणी, संसारामध्ये खंबीर साथ देणारी पत्नी, आणीबाणीविरोधात सहभाग घेतल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास भोगलेल्या, दिल्ली महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या नगरसेविका, राजकारणापासून दूर गेल्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल तुरुंगवासात गेलेल्या अशा पुष्पाताई काळे यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या आठवणींचा पुष्पगुच्छ असे स्वरूप असलेल्या ‘प्रवाह‘ पुस्तकाचे एका स्नेहमेळाव्यात प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये ९१ वर्षांच्या पुष्पाताई यांनी गप्पांची दिलखुलास मैफल रंगविली.

पुष्पाताई या मूळच्या डहाणूच्या. हिंदू महासभेचे कार्यकर्ते वसंतराव काळे यांच्याशी विवाह झाल्यावर त्या दिल्लीत गेल्या. मराठी वातावरणात वाढलेल्या पुष्पाताई देशाच्या राजधानीत केवळ रुळल्याच नाहीत. तर, दिल्लीला त्यांनी आपली कर्मभूमी मानले. दिल्ली महानगरपालिका, महानगर परिषदेवर त्या जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका म्हणून दोन वेळा निवडून गेल्या. आपल्या प्रदीर्घ सामाजिक जीवनात त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, राजमाता विजयाराजे शिंदे, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांच्याशी कौटुंबिक स्नेह जपला. अशा पुष्पाताईंच्या समृद्ध जीवनातील आठवणींचा गोफ असलेल्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन करण्यात आले.

Pushpatai-Kale-Pravah

अमेय प्रकाशनच्या वतीने पुष्पा काळे यांच्या ‘प्रवाह’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्योजक प्रकाश आपटे, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे, सर्वोच्च न्यायालयातील वकील मकरंद आडकर, संपादक विजय काळे, प्रकाशक उल्हास लाटकर यांच्या उपस्थितीत झाले. निवेदिता वैशंपायन यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे.

आणीबाणी विरोधातील आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल मी जवळपास दीड वर्ष तुरुंगवास भोगला. तिहार, अंबाला आणि हिस्सार अशा तीन ठिकाणी प्रत्येकी सहा महिने माझी रवानगी करण्यात आली होती. तिहार कारागृहात तर माझ्यासोबत राजमाता विजयाराजे शिंदे आणि गायत्रीदेवी होत्या, अशा आठवणी पुष्पाताई यांनी सांगितल्या.

दिल्ली महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना एका चर्चेमध्ये दिल्ली विकास प्राधिकरणासंदर्भात (डीडीए) आपले काय म्हणणे आहे, असे मला विचारण्यात आले होते. तेव्हा ‘डीडीए म्हणजे डोन्ट डू एनीथिंग’ असाच त्याचा अर्थ आहे, या मी हजरजबाबीपणे दिलेल्या उत्तराला अनेकांनी उत्स्फूर्त दाद दिली होती, असेही पुष्पाताईंनी सांगितले. काळे साहेबांची तब्येत बिघडली. त्यानंतर मी राजकारण सोडले, असेही त्या म्हणाल्या.

राजकीय क्षेत्रात कर्तृत्व गाजविलेली पुष्पाताई ही माझ्यासाठी मावशी आहे. देशामध्ये निस्वार्थी राजकारणी दुर्मीळ झाले आहेत. सध्या ज्या स्वरूपाचे राजकारण सुरू आहे त्यामध्ये त्यांना स्थान नाही. पण, समाजामध्ये त्यांना किती मान असतो हे मला माझ्या मावशीकडे पाहून समजले, असे ठिपसे म्हणाले.

आई म्हणून मला ६५ वर्षांचा सहवास लाभला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना एक पैसाही चुकीच्या मार्गाने येता कामा नये हा तिचा कटाक्ष होता आणि त्याचे पालन आम्ही मुले करत आहोत, असे मनोगत पुष्पाताई यांचे पुत्र विजय काळे यांनी व्यक्त केले.

अन्य लेख

संबंधित लेख