Tuesday, March 24, 2026

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

Share

वाशी (नवी मुंबई) : हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज हरिनामाचा गजर करत प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांसाठी वाशी येथे “भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा २०२६” चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, छत्रपती शिवराय भजन मंडळ (वाशी), श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि नवविधा भक्ती सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष होते.

या सोहळ्याला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, उपमहापौर दशरथ भगत आणि अनेक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना गणेश नाईक यांनी रेल्वे प्रवासी भजनी मंडळांना मोठा दिलासा दिला. ते म्हणाले, “पूर्वी रेल्वे पोलीस भजनी मंडळांवर कारवाई करत असत, मात्र आता केंद्र आणि राज्यात आपले सरकार असल्याने मंडळांना असा त्रास होणार नाही. तसेच, हार्बर मार्गावरील भजनी मंडळींना संघटित करण्यासाठी नवी मुंबईत ‘रेल्वे प्रवासी वारकरी भवन’ उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

उपमहापौर दशरथ भगत यांनी सांगितले की, आगामी काळात तिन्ही रेल्वे मार्गावरील सुमारे ४५० भजनी मंडळांना एका व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रवासातील हरिनाम नोकरदारांना दिवसभराच्या कामासाठी सकारात्मक ऊर्जा देते, ज्यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लागतो.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून महाराष्ट्राची थोर संत परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. स्पर्धेमुळे समाजात एकात्मता आणि श्रद्धा अधिक दृढ होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ह.भ.प. हनुमंत तावरे महाराज, ह.भ.प. शंकर कदम, विनय धाडवे, अनिल मोरे, डॉ. अनिल म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सहभागी सर्व मंडळांचे आणि कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख