Friday, May 8, 2026

समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर

Share

‘समरसता’ ही संकल्पना आता केवळ संघ परिवारापुरती मर्यादित न राहता, दलित समाजातही रुजू लागली आहे. रामदास आठवले यांनी घोषित केलेला ‘समरसता मार्च’ हे याचे द्योतक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, दलित चळवळीने (विशेषतः दलित पँथरने) प्रस्थापित हिंदू, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारांच्या मक्तेदारीविरुद्ध संघर्ष करून आपली एक ‘समांतर व्यवस्था’ उभी केली. या व्यवस्थेने दलित साहित्य, कला आणि संस्कृतीला स्वतंत्र व्यासपीठ दिले.

मुख्य प्रवाहातील संघटनांनी दलित प्रतिभेला केलेला मज्जाव आणि जाती-उपजातींमधील अंतर्गत संघर्षातून निर्माण झालेली अराजकता, या पार्श्वभूमीवर आठवलेंचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. साताऱ्यातून सुरू होणारी ही यात्रा केवळ राजकीय नसून, संघर्षाकडून सामाजिक ऐक्याकडे जाणारा प्रवास आहे. दलित समाज आता आत्मविश्वासाने मुख्य प्रवाहात स्वतःच्या अटींवर सन्मानाने ‘समरस’ होऊ इच्छितो. हा बदल डॉ. बाबासाहेबांच्या ‘बंधुता’ या मूल्याला अधिक व्यापक आणि परिपक्व स्वरूप देणारा ठरू शकतो.

भारतीय सामाजिक आणि राजकीय पटलावर ‘समरसता’ हा शब्द प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वैचारिक विश्वाशी  जोडलेला आहे. ‘समते’कडून ‘समरसते’कडे असा प्रवास मांडताना संघाने हिंदू समाजातील अंतर्गत मतभेद मिटवण्याचे आवाहन आणि कार्य  केले. मात्र, अनेक दशके हा शब्द दलित चळवळीत आणि पुरोगामी वर्तुळात संशयाने पाहिला गेला. ‘समरसता’ म्हणजे जातीव्यवस्था कायम ठेवून केवळ सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशी धारणा त्यामागे होती. परंतु, आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळचे ‘दलित पँथर’चे आक्रमक नेतृत्व आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) अध्यक्ष रामदास आठवले यांनी ‘समरसता मार्च’ची घोषणा केली आहे. साताऱ्यातून सुरू होणारी ही यात्रा केवळ एका पक्षाचा उपक्रम नसून, ती दलित चळवळीच्या बदलत्या स्वरूपाचे आणि संघर्षाकडून समन्वयाकडे जाणाऱ्या प्रवासाचे प्रतीक आहे.

दलित चळवळ: संघर्षातून समांतर व्यवस्थेची निर्मिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित चळवळीने एका नव्या युगात प्रवेश केला. सुरुवातीला ही चळवळ आंबेडकरी आणि पूर्व-आंबेडकरी अशा दोन स्वरूपात विभागलेली होती. मात्र, १९७० च्या दशकात सुशिक्षित आणि संतप्त दलित तरुणांनी चळवळीची धुरा हातात घेतली. यातून ‘दलित पँथर’ सारख्या आक्रमक संघटनांचा जन्म झाला. या चळवळीचा मूळ गाभा प्रस्थापित व्यवस्थेच्या ‘मक्तेदारी’ला आव्हान देणे, हा होता. ही मक्तेदारी केवळ धार्मिक नव्हती, तर ती राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक होती. दलित तरुणांनी पाहिले की, मुख्य प्रवाहातील व्यवस्था त्यांना सामावून घेण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारून आपली ‘समांतर व्यवस्था’ निर्माण करण्यावर भर दिला.

वैचारिक अस्पृश्यता: हिंदू, समाजवादी आणि कम्युनिस्टांविरुद्धचा लढा

दलित पँथर आणि तत्कालीन दलित नेतृत्वाने केवळ हिंदू संघटनांनाच विरोध केला नाही, तर त्यांचा संघर्ष समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारा सोबतही तितकाच तीव्र होता. यामागचे कारण अत्यंत खोलवर होते. जातिव्यवस्था दलितांना दुय्यम स्थान देत होतीच, परंतु स्वतःला पुरोगामी म्हणवणारे कम्युनिस्ट आणि समाजवादी गटही दलित वर्गातील ‘प्रतिभे’चा स्वीकार करण्यास तयार नव्हते. या डाव्या आणि समाजवादी प्रवाहांमध्ये नेतृत्व हे बहुतांशी उच्चवर्णीय हातांमध्ये एकवटले होते. ते वर्गाच्या गोष्टी करत असले तरी, दलित तरुणांच्या वैयक्तिक आणि सामाजिक अस्मितेला न्याय देण्यास ते अपयशी ठरले. या संघटनांच्या अंतर्गत प्रवाहात दलित तरुणांच्या बुद्धिमत्तेचा आणि कर्तृत्वाचा अंतर्भाव करण्यास एक प्रकारचा अदृश्य ‘मज्जाव’ होता. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या सामाजिक मानसिकतेमुळे, या पुरोगामी चळवळींमध्येही दलितांना केवळ ‘व्होट बँक’ किंवा ‘कार्यकर्ता’ म्हणून पाहिले गेले, ‘नेतृत्व’ म्हणून नाही.

सामाजिक समरसता: हिंदू समाजाच्या एकात्मतेचा मूलमंत्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत ‘सामाजिक समरसता’ हा केवळ शब्द नसून तो एक जिवंत अनुभव आहे. समरसता म्हणजे केवळ कायद्याने दिलेली ‘समानता’ नव्हे, तर ती मनातून उमजलेली ‘एकात्मता’ आहे. ज्याप्रमाणे पाण्यात साखर विरघळल्यावर तिला वेगळे करता येत नाही, त्याचप्रमाणे समाजातील सर्व जाती-पातींचे भेद विरघळून एकसंध समाज निर्माण करणे, हे समरसतेचे मुख्य ध्येय आहे. समरसता ही प्रामुख्याने एक वैचारिक आणि भावनिक अवस्था आहे.  

संघाच्या मते, अस्पृश्यता हे एक महापाप असून, “हिंदू सर्व सहोदरा” या मंत्रानुसार सर्व हिंदू एकाच भारतमातेची लेकरे आहेत. ही संकल्पना मन, व्यवहार आणि कुटुंब अशा तीन स्तरांवर राबवली जाते. संघाने  प्रत्यक्ष कृती कार्यक्रमा अंतर्गत १९८३ मध्ये ‘सामाजिक समरसता मंच’ ची  स्थापन केली.  या माध्यमातून सहभोजन, मंदिर आणि पाणवठे सर्वांसाठी खुले करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले जातात. जातीभेदमुक्त, बलशाली आणि शोषणमुक्त हिंदू समाज घडवणे, हाच समरसतेचा खरा गाभा आहे.

समांतर व्यवस्था: कला, साहित्य आणि संस्कृती

जेव्हा मुख्य प्रवाहाने दलितांना नाकारले, तेव्हा आंबेडकरी प्रेरणेतून एक स्वतंत्र व्यवस्था उभी राहिली. ही व्यवस्था ना हिंदू विचारांच्या अधीन होती, ना कम्युनिस्टांच्या. ही केवळ दलितांची स्वतःची हक्काची जागा होती.  ज्या साहित्यातून दलितांचे जगणे, त्यांच्या वेदना आणि विद्रोह प्रकट झाला. मुख्य प्रवाहातील साहित्याने ज्यांची दखल घेतली नाही, त्या घटकांनी स्वतःचे साहित्य दलित साहित्य या संकल्पनेखाली  निर्माण केले. दलित कला व जलसे, शाहीर आणि लोककलावंतांनी गावोगावी जाऊन बाबासाहेबांचा विचार पोहोचवला. दलित चित्रकार आणि नाट्यकर्मींनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली. 

ज्या सामाजिक घटकांना उजव्या किंवा डाव्या दोन्ही विचारांच्या प्रवाहांनी अंतर्भूत केले नाही, ते सर्व घटक या दलित व्यासपीठाशी जोडले गेले. यामुळे एक असा व्यापक सामाजिक समूह तयार झाला, जो प्रस्थापित व्यवस्थेला समांतर टक्कर देऊ लागला.

जाती-उपजातींमधील संघर्ष आणि अराजकता

या समांतर व्यवस्थेच्या निर्मितीच्या प्रवासात अंतर्गत आव्हानेही कमी नव्हती. दलित समाजातील अंतर्गत उपजातींमधील भांडणे हा एक मोठा अडथळा ठरला. अनेकदा राजकीय स्वार्थासाठी या उपजातींना एकमेकांविरुद्ध उभे केले गेले, ज्यातून सामाजिक अराजकता निर्माण झाली. प्रस्थापित व्यवस्थेने नेहमीच या भेदाचा वापर करून दलित चळवळ कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. रामदास आठवले यांच्यासारख्या नेत्याने या संघर्षाचा अनुभव अगदी जवळून घेतला आहे.

रामदास आठवले आणि ‘समरसता मार्च’चे महत्त्व

रामदास आठवले हे एकेकाळी पँथरच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवणारे नेतृत्व होते. आज त्यांनी ‘समरसता’ हा शब्द स्वीकारणे, हे अनेकांसाठी आश्चर्यकारक असले तरी त्यामागे एक ठोस सामाजिक गरज आहे.

आठवलेंनी ‘समरसता’ या शब्दाला केवळ धार्मिक अर्थाने न घेता, ‘सामाजिक ऐक्य’ या अर्थाने स्वीकारले आहे. जेव्हा एखादा दलित नेता समरसतेची भाषा करतो, तेव्हा तो समाजातील सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहन करत असतो. हे प्रमाण समोर येतेय की, आता दलित समाज मुख्य प्रवाहापासून तुटून न राहता, मुख्य प्रवाहात स्वतःचा सन्मान मिळवून ‘समरस’ होऊ इच्छितो. या यात्रेची सुरुवात साताऱ्यातून होणे सूचक आहे. सातारा ही क्रांतीची भूमी आहे.  येथून यात्रा सुरू करून आठवले हे सांगू इच्छितात की, समरसता म्हणजे आत्मसमर्पण नव्हे, तर तो सामाजिक न्यायाच्या पुढचा टप्पा आहे. दलित नेतृत्वाने हे मान्य केले आहे की, केवळ संघर्ष करून प्रश्न सुटत नाहीत. सत्तेत आणि समाजात स्थान मिळवण्यासाठी इतर समाजांशी संवाद साधणे आवश्यक आहे. ही यात्रा त्याच संवादाचा एक भाग आहे.

दलित समाजात समरसता रुजण्याचे प्रमाण हे दर्शवते की, हा समाज आता आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. एकेकाळी ज्यांना व्यासपीठ नाकारले गेले, त्यांनी स्वतःचे व्यासपीठ निर्माण केले आणि आज ते इतरांना सामावून घेण्याची ताकद बाळगून आहेत.

रामदास आठवले यांचा ‘समरसता मार्च’ हा केवळ राजकीय प्रवास नाही, तर तो एका आक्रमक कालखंडाकडून एका परिपक्व सामाजिक युगाकडे जाणारा प्रवास आहे. जर समाजातील सर्व जाती आणि उपजाती या यात्रेच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आल्या, तर ती खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्नात पाहिलेल्या ‘बंधुता’ (Fraternity) या मूल्याची अंमलबजावणी ठरेल. समरसता आता केवळ एका विचाराची मक्तेदारी राहिलेली नसून, ती दलित समाजाने स्वतःच्या अटींवर स्वीकारलेली एक नवीन विचारव्यवस्था बनत आहे. या पार्श्वभूमीवर, रामदास आठवले यांच्या या समरसता मार्चला दलित समाजातील तरुण पिढी आणि विचारवंत कशा प्रकारे प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

– अपरांत कांबळे

अन्य लेख

संबंधित लेख