माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते विधिमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नव्हते. नियमाप्रमाणे ६ महिन्याच्या आत त्यांना विधिमंडळाच्या कोणत्यातरी सदनाचे सदस्य होणे बंधनकारक होते. मात्र त्याचवेळी कोरोना काळ सुरू असल्यामुळे देशातील सर्व निवडणुका तहकूब करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे मुख्यमंत्री पदच धोक्यात आले होते. शेवटी नाईलाजाने नाक मुठीत धरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला व मोदीजींनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा आणि भाजपचा केलेला विश्वासघात विसरून उदार अंत:करणाने कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना फोनवर विनंती करून महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक लावली. आणि महाविकास आघाडी बरेच रुसवेफुगवे करून शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले.
परंतु, मुळातच ऐन तारुण्यात वडिलोपार्जित ऐश्वर्याचा लाभ झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची वृत्ती कष्टाळूही नाही आणि अभ्यासू देखील नाही. फेब्रुवारी २०२० मधील एका पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन एकाच मंचावर उपस्थित होते. मंचावर बोलताना ठाकरे म्हणाले होते की, “आधी मला बजेटमधील काहीच समजत नव्हते. मला ते समजेपर्यंत तर पुढचे बजेट आलेले असायचे. एक पक्षप्रमुख असल्यामुळे मला बजेटवर प्रतिक्रिया द्यावीच लागायची. तेव्हा माझी ठरलेली प्रतिक्रिया असायची – ‘हे बजेट गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करणारे आहे.” त्यानंतर देखील कधी त्यांनी गंभीरपणे अर्थसंकल्प समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असेल असे वाटत नाही. कारण मुळातच वृत्ती अभ्यासू नाही. आणि टोमणे मारायला अभ्यास लागत नसल्यामुळे त्यांना “टोमणे सम्राट” ही पदवी जनतेने बहाल केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अभ्यासु तर नाहीतच पण कष्टाळू तर त्याहूनही नाहीत.

२०१० मध्ये त्यांनी काढलेल्या हवाई फोटोंचे एक कॉफी टेबल बुक प्रकाशित केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील २७ ऐतिहासिक किल्ल्यांचे आकाशातून काढलेले विहंगम दृश्य होते. ‘पाहवा विठ्ठल’ या पुस्तकात त्यांनी पंढरपूर वारीच्या वेळी हेलिकॉप्टरमधून टिपलेले रिंगण सोहळ्याचे आणि इतर महत्त्वाचे विहंगम फोटो समाविष्ट केले होते. यासाठी त्यांना संरक्षण मंत्रालयाकडून विशेष मंजुरी घ्यावी लागली होती. वाडवडिलांच्या कृपेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपला फोटोग्राफीचा छंद जोपासण्यासाठी हेलिकॉप्टरही मिळाले व संरक्षण मंत्रालयाची विशेष मंजुरी देखील मिळाली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आयुष्य असे ऐशोरामात आणि सुखात लोळत गेले आहे. त्यांना “कष्ट” काय असतात हे माहित देखील नाही. कोरोना संसर्गाच्या काळात ते मंत्रालयात जाण्याऐवजी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानातून राज्यकारभार पाहत असत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तब्बल पावणेदोन वर्षांनंतर एप्रिल २०२२ मध्ये ते एका बैठकीसाठी मंत्रालयात आले होते.
कोरोना काळात मुख्यमंत्री या नात्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेऊन जनतेची नुसती विचारपूस करण्यासाठी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरले असते तर त्यांची लोकप्रियता शिखरावर पोचली असती. कदाचित त्यांचे सरकार पडले देखील नसते व पुढच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी लाभली असती. त्याऐवजी घरी बसून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पी आर एजन्सी मार्फत पेड सर्व्हेतून आपण देशात “बेस्ट मुख्यमंत्री” आणि महाराष्ट्राचा “कुटुंब प्रमुख” असल्याचा डांगोरा पिटण्यात धन्यता मानली.

त्याचबरोबर आधीच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या प्रत्येक लोकोपयोगी उपक्रमाला (प्रोजेक्ट) त्यांनी कधी पर्यावरण तर कधी स्थानिकांचा विरोध अशी पोरकट कारणे देऊन स्थगिती देण्यात पुरुषार्थ मानला. कारण एखादा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्याला कष्ट उपसावे लागतात. मेहनत घ्यावी लागते. स्थगिती दिली की आपण घरी झोपाळ्यावर बसायला मोकळे. बहुदा असा साधा सरळ हिशोब त्यांनी मांडला असावा.
या सगळ्यांची परिणीती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोशल मीडियावर “घरकोंबडा” या कुत्सित विशेषणाने ट्रोल करण्यात झाली. मुख्यमंत्र्याला अगदीच “आळशी” म्हणणे संसदीय दिसेल म्हणून सोशल मीडियावर त्यांना घरकोंबडा म्हटले गेले. परिणामी त्यांच्याच पक्षात बंड होऊन हातातली सत्ताही गेली व पुढच्या निवडणुकीत लांछनास्पद पराभव पदरी पडला. मुख्यमंत्र्यांनी जे काम करणे अपेक्षित होते ते काम त्या कोरोना काळात विरोधी पक्ष नेते या नात्याने देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. देवेंद्रजींनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. आवश्यक तेथे आरोग्य व्यवस्थेला हातभार लावला. जनतेची आस्थेने विचारपूस केली. आणि महाराष्ट्राच्या जनतेची मने जिंकली. आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.

आता तर २०२० मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी एकूण १३३ बैठकींपैकी केवळ ४२ बैठकींना हजेरी लावली. म्हणजेच त्यांची उपस्थिती केवळ ३१.५८% टक्के इतकी राहिली अशी बातमी आली आहे.

मुख्यमंत्री पदाच्या काळात हा उत्साह तर मुख्यमंत्रीपद गेल्यावर काय उजेड पडला असेल त्याची कल्पना करून बघा. २०२२ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनात फक्त एकदाच उपस्थिती लावली. २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही १६ पैकी केवळ ४ बैठकींना ते उपस्थित होते. विधीमंडळात उपस्थित न राहण्यामागे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मानसिकता काय असेल? ते स्वतःला विधिमंडळाच्या वर समजतात की विधिमंडळ कामकाजातील त्यांना आपली कुवत कळून चुकली आहे?
या ६ वर्षांत जेव्हा जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे विधिमंडळात उपस्थित राहत त्यात्यावेळी मीडियामध्ये ती बातमी म्हणून दाखवली जायची जणू काही विधिमंडळात उपस्थित राहून ते महाराष्ट्रावर उपकारच करताहेत. खरं म्हणजे ते त्यांचे कर्तव्य पार पाडत होते. त्यात बातमी देण्यासारखे काय होते?
वास्तविक विरोधी बाकांवर असताना सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काही प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडू शकले असते. त्यासाठी मदत करायला त्यांच्याकडे अनुभवी आमदारांची फौज होती. शिवाय याबाबतीत ते मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या देवेंद्रजी फडणवीस यांचा आदर्श त्यांच्यासमोर होता. पण त्यासाठी त्या प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास करावा लागतो व प्रश्न विचारण्यासाठी सदनात यावे लागते. त्यासाठी असणाऱ्या अभ्यासू व कष्टाळू वृत्तीचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांची कोणतीच छाप पडू शकली नाही. “उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ गाजवले” अशी बातमी एकदाही ६ वर्षात महाराष्ट्राच्या जनतेने वाचली नाही . इतिहासात आपल्या नावामागे कायमस्वरूपी “मामु” (माजी मुख्यमंत्री) लावण्यात येईल यातच त्यांनी धन्यता मानली.
महाविकास आघाडीतील आपलाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या राजेश राठोड या विधान परिषद सदस्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदर्श ठेवायला हरकत नव्हता. राजेश राठोडउद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच २०२० मध्ये विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी विधान परिषदेच्या अनेक अधिवेशनांमध्ये १००% उपस्थिती नोंदवून आदर्श कामगिरी केली आहे. पण बहुदा उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद आमदार म्हणून मिळणारे सर्व भत्ते व सोयीसुविधा यांच्यासाठी आवश्यक असलेली कमीत कमी हजेरी लावली असेच म्हणावे लागेल.
किमान मोदीजींच्या कृपेने मिळालेल्या आमदारकीचा मोदीजींसाठी तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सन्मान ठेवायला हवा होता असे प्रामाणिकपणे वाटते.

त्यापेक्षा मोदीजी व देवेंद्रजींकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी
चरैवेति-चरैवेति, यही तो मंत्र है अपना ।
नहीं रुकना, नहीं थकना, सतत चलना सतत चलना ।
यही तो मंत्र है अपना, शुभंकर मंत्र है अपना ॥
एवढा जरी यशाचा मंत्र घेतला असता तरी आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते.