“ज्या देशाचे सरासरी वय अवघे २९ वर्षे आहे. जिथली ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, त्या भारताकडे सबंध जग ‘तरुण देश’ म्हणून आशेने पाहत आहे. तरुणांनी विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा डंका वाजवला आहे. पण, या सुवर्णचित्राला विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे एक काळे गालबोट लागले आहे. देशात तरुण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ ही मन हेलावणारी आहे. गरुडझेप घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तुमच्या माझ्या देशात तरुण विद्यार्थी जीवनप्रवास संपवत असतील तर ही संपूर्ण समाजासाठी, देशाच्या भवितव्यासाठी धोक्याची घंटा आहे.”
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने ‘अपघाती मृत्यू आणि आत्महत्या-२०२४’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणातील वाढ चिंताजनक आहे असेच म्हणावे लागेल. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या आकडेवारीनुसार देशात २०२० साली १२ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. देशात झालेल्या एकूण आत्महत्यांच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची टक्केवारी ८.२ इतकी होती. २०२१ साली १३ हजार ८९ , २०२२ साली १३ हजार ४४ , 2023 साली १३ हजार ८९२ तर २०२४ साली १४ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद या अहवालात आहे. २०२४ साली एकूण आत्महत्येच्या तुलनेत ८.५ टक्के इतक्या आत्महत्या विद्यार्थ्यांच्या आहेत. ही आकडेवारी निश्चितच दुर्दैवी आहे.
शिक्षण हे आता ज्ञानप्राप्तीचे साधन राहिले नसून ते आता स्पर्धेचा आखाडा झाल्याचे चित्र आहे. शिक्षण व्यवस्था केवळ स्वतःचेच भले करण्याच्या मागे आहे. अगदी शिशू अवस्थेपासून शाळा (कॉन्व्हेंट), शिकवणी, एक्स्ट्रा क्लास, अदर अॅक्टिव्हिटी या चक्रात विद्यार्थी अडकतो अन् मग स्वयं अध्ययन, आवडीचे विषय, खेळ आदी बाबी त्याच्या आयुष्यातून गायब होतात. मग उरते ती केवळ मार्क आणि टक्केवारीची स्पर्धा. या दृष्टचक्रात अडकल्यामुळे, सतत वाढत असलेल्या दबावामुळे विद्यार्थी आत्महत्येसारखी समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे.
मनोबल वाढवणे हाच आत्महत्येच्या मानसिकतेवर मात करणारा खरा उपाय आहे. जेव्हा कोणतीही व्यक्ती मनाच्या विकल, निराश अवस्थेत असते, तेव्हा तिच्या मनाला धीर देणारी कुटुंब व्यवस्था समाजात अधिक दृढ व्हायला हवी. एखादे अपयश म्हणजे जीवनाची समाप्ती नाही याची जाणीव देऊन जगण्याची उमेद देणारा दुसरा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी विचारपूर्वक योजना हवी. त्यायोगे तरुणांना नवे चैतन्य मिळू शकेल.
“तरुणांना फक्त नोकऱ्या नको आहेत, तर त्यांना त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देणारे मार्ग हवे आहेत.” — स्वामी विवेकानंद
तरुणांच्या शक्तीला योग्य दिशा देणे, ही प्राथमिक आवश्यकता आहे. विचार आणि भावनांना आकार देण्यासाठी समुपदेशन केंद्र, व्यायामशाळा, योगाभ्यास व आरोग्यकेंद्र, आध्यात्म केंद्र, संस्कारकेंद्र देशासाठी व समाजासाठी काम करणाऱ्या विविध संस्था संघटना, शाळा-महाविद्यालये यातील शिक्षक पालक संघटना, अशा अनेक स्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष उपक्रम जाणीवपूर्वक राबवले गेले पाहिजेत.या उपक्रमांमुळे तरुणाईभोवती वाढत चाललेला वैफल्याचा, पराभूत मानसिकतेचा विळखा थोडाफार का होईना सैल होईल.
‘नाईटलाईफ’चा आग्रह धरणाऱ्या आणि पब, हॉटेल्स, पार्ट्या यांना प्रोत्साहन देऊन स्वैराचार, दुराचाराचे उदात्तीकरण करणाऱ्या शक्ती आणि प्रवृत्ती प्रबळ असेपर्यंत देशातील तरुणांचे भविष्य अधिकाधिक धोक्यात आहे. आत्महत्याग्रस्त मानसिकतेपेक्षाही हा धोका जास्त मोठा आहे. तरुणाईला अशा प्रवृत्तींपासून आधी वाचवायला हवे.
– हिमांशू शुक्ला