Monday, July 6, 2026

पांडवानी लोककलावंत: पद्मविभूषण तीजन बाईंचे निधन

Share

५ जुलै २०२६ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी पंडवानी लोककलेचा कणखर आवाज, पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांनी जगाचा निरोप घेतला. रायपूरच्या ‘एम्स’ रुग्णालयात दीर्घकाळ आजारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आणि भारतीय लोकसंस्कृतीच्या विश्वातील एक तेजस्वी तारा निखळला. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गनियारी या छोट्याशा गावात जन्मलेल्या तीजन बाईंचा जीवनप्रवास हा केवळ एका कलाकाराचा प्रवास नव्हता, तर तो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून गरिबी, सामाजिक बहिष्कार आणि पितृसत्ताक मानसिकतेवर मात करून जागतिक कीर्ती मिळवलेला एक लढा होता.

कलेचा उगम आणि खडतर बालपण

तीजन बाईंना त्यांच्या बालपणात कधीही शाळेची पायरी चढता आली नाही. त्यांचा जन्म पारधी या अनुसूचित जमातीत झाल्याने हा समाज त्यावेळी प्रामुख्याने शिकार करणे, बांबूच्या टोपल्या विणणे यांसारखी कामे करायचा. मात्र, त्यांच्या जीवनाला कलात्मक वळण मिळाले ते त्यांच्या आजोबांमुळे. त्यांचे आजोबा ब्रिजलाल पारधी हे छत्तीसगढी लेखक सबलसिंग चौहान यांचे महाभारत अत्यंत रसाळ भाषेत गात असत. ते ऐकून तीजन बाईंच्या बालमनात महाभारताच्या कथा घर करून राहिल्या. त्यांनी अवघ्या २१ दिवसांत संपूर्ण महाभारत तोंडी पाठ केले.

तीजन बाईंचे वैयक्तिक जीवन सुरुवातीपासूनच अत्यंत खडतर राहिले. त्यांच्या जन्म तारखेबाबत अधिकृत नोंदींमध्ये काही मतभेद आढळतात. मात्र, बहुतांश ठिकाणी ८ ऑगस्ट १९५६ अशी नोंद आहे. त्यांचा जन्म ‘तीजा’ या सणाच्या दिवशी झाल्याने त्यांचे नाव ‘तीजन’ ठेवण्यात आले होते. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचा बालविवाह झाला, परंतु सासरच्या जाचाला कंटाळून वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी तिथून पळ काढला. याच वर्षी त्यांनी जेव्हा जाहीरपणे पंडवानी सादर करायला सुरुवात केली, तेव्हा त्या काळातील पुरोगामी नसलेल्या समाजाने त्यांना विरोध केला. महिलांनी उभे राहून, नाचत-गायत महाभारत सादर करणे हे त्या काळी निषिद्ध मानले जात होते. त्यामुळे त्यावेळी पारधी समाजाने त्यांना बहिष्कृत केले. पण तीजन बाई खचल्या नाहीत. स्वतःची छोटी झोपडी बांधली, शेजाऱ्यांकडून भांडी आणि अन्न मागून त्यांनी स्वतःची गुजराण केली आणि कष्टाने आपली कला जिवंत ठेवली.

पंडवानी आणि कापालिक शैलीची क्रांती

पंडवानी कला हा हिंदू संस्कृतीचाच एक सुंदर लोककलाविष्कार आहे. पंडवानी म्हणजे पांडवांची यशोगाथा. ही कला प्रामुख्याने महाभारतातील ‘भीम’ या नायकाच्या पराक्रमाभोवती गुंफलेली आहे. तीजन बाईंच्या आधी महिला कलाकार जमिनीवर बसून अत्यंत शांतपणे आणि संथ लयीत पंडवानी गात असत, ज्याला ‘वेदमती’ शैली म्हटले जाते. पण तीजन बाईंनी ही परंपरा बदलली. त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने उभे राहून, नाचत, अभिनय करत आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीतून संवादांची पेरणी करत ‘कापालिक’ शैली लोकप्रिय केली.

जेव्हा त्या सादरीकरण करत असत, तेव्हा त्यांच्या हातातील तंबोरा हे केवळ एक वाद्य राहायचे नाही. तो कधी भीमची गदा बनून शत्रूचा संहार करायचा, तर कधी अर्जुनाचा रथ बनून युद्धभूमीवर फिरायचा. त्यांच्या खर्जातील आवाज आणि चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करायचे. त्यांचे महाभारतातील प्रसंग सादरीकरण पाहणे म्हणजे एखाद्या जिवंत इतिहासाचे दर्शन घेणे असे असायचे.

जागतिक मंचावर भारताची ओळख

प्रसिद्ध नाटककार हबीब तन्वीर यांनी तीजन बाईंच्या कलेची दखल घेतली आणि त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांची कला प्रकाशझोतात आली. शाम बेनेगल यांच्या ‘भारत एक खोज’ या प्रसिद्ध मालिकेतून त्या घराघरांत पोहोचल्या.

तीजन बाई केवळ भारतापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांनी रशिया, फ्रान्स, इंग्लंड, जपान, अमेरिका अशा १७ हून अधिक देशांत जाऊन पंडवानी सादर केली. ही भारतीय लोककला जागतिक स्तरावर नेण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि जपानचा प्रतिष्ठित फुकुओका पुरस्कार देऊन त्यांच्या जागतिक स्तरावरील कार्याचा गौरव करण्यात आला आहे. भिलाई स्टील प्लांटमध्ये नोकरी सांभाळून त्यांनी आपली कला जिवंत ठेवली. प्रौढ साक्षरतेतून त्या लिहायला-वाचायला शिकल्या आणि अखेर चार मानद डॉक्टरेट पदव्याही त्यांच्या कामामुळे त्यांना विविध संस्थांकडून बहाल करण्यात आल्या.

सांस्कृतिक एकात्मता

तीजन बाईंच्या कार्याकडे पाहताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे भारतीय संस्कृतीची अखंडता. महाभारतातील कथा, शबरी, एकलव्य यांसारखी पात्रे ही केवळ पौराणिक नाहीत, तर ती वनवासी बांधवांच्या हृदयाच्या जवळ आहेत. ‘मूलनिवासी’ किंवा ‘आदिवासी’ या केवळ वसाहतवादी मानसिकतेतून आलेल्या शब्दांना झुगारून बाबासाहेबांनी सुद्धा संविधानात ‘अनुसूचित जमाती’ हा शब्द वापरला. त्याचे तीनज बाई हे खूप बोलके उदाहरण आहे.

समकालीन काळात महाभारताचे असे सादरीकरण करणे अनेक कारणांमुळे महत्त्वाचे ठरते. सध्याच्या डिजिटल आणि वेगवान युगात पंडवानीसारख्या लोककला मानवी मूल्यांची आणि नैतिकतेची शिकवण देतात. महाभारतातील प्रसंग केवळ ऐतिहासिक युद्ध दाखवत नाहीत, तर ते माणसाच्या मनातील आंतरिक द्वंद्व, न्याय आणि कर्तव्याची जाणीव करून देतात. तीजनबाईंच्या सादरीकरणातील ‘द्रौपदी चीरहरण’ हा प्रसंग आजही महिलांवरील होणाऱ्या हिंसाचाराविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम मानला जातो. अशा लोककलांमधून महाभारताचे सादरीकरण झाल्याने मौखिक परंपरेचे जतन होते आणि आधुनिक पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडता येते.

आज तीजन बाई आपल्यात नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेली पंडवानीची ऊर्जा आणि प्रचंड संघर्षा अंती त्यांनी स्त्रियांना दाखवलेला मार्ग येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. एका मुलीने जिला समाजातून बहिष्कृत करण्यात आले, हलाखीचे दिवस बघावे लागले आणि सासुरवास अत्यंत लहान वयात भोगावा लागला; तिने आपल्या आवाजाच्या जोरावर महाभारतासारख्या महाकाव्याला जागतिक रंगमंचावर जिवंत केले, ही गोष्ट आपल्यासाठी एक भारतीय म्हणून अभिमानास्पद आहे. लोकसंस्कृतीच्या इतिहासात डॉ. तीजन बाईंचे नाव सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरलेले राहील.

– मैत्रेयी गोडसे

अन्य लेख

संबंधित लेख