राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक (द्वितीय) माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. ५ जून १९७३ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. संघकार्या बरोबरच विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत आणि पर्यायाने सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात श्री गुरुजींचे योगदान अतुलनीय आहे. श्री गुरुजींच्या पुढाकाराने कृष्ण जन्माष्टमी १९६४ रोजी मुंबईतील पवई येथील स्वामी चिन्मयानंद यांच्या सांदिपनी साधनालयात “विश्व हिंदू परिषदे”ची स्थापना झाली. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेसाठी श्री गुरुजींनी या देशातील ज्या आदरणीय महानुभावांची मांदियाळी एका व्यासपीठावर आणली. ती पाहिली की आपण थक्क होतो. चिन्मय मिशनचे स्वामी चिन्मयानंद सरस्वती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भारतीय विद्या भवनचे संस्थापक आणि प्रसिद्ध नेते कन्हैयालाल माणिकलाल (के. एम.) मुंशी, शीख संप्रदायाचे एक अग्रगण्य नेते मास्टर तारा सिंह, नामधारी शीख समुदायाचे प्रमुख नेते सतगुरु जगजित सिंह, गुजरातचे सुप्रसिद्ध विचारवंत केशवराम काशीराम शास्त्री, प्रख्यात विचारवंत व नेते सी. पी. रामस्वामी अय्यर, बौद्ध संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून (१४ वे) दलाई लामा, जैन संप्रदायाचे मुनी सुशील कुमार जी महाराज आणि स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक हनुमान प्रसाद पोद्दार. स्वामी चिन्मयानंद सरस्वती हे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष झाले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे संस्थापक उपाध्यक्ष.
या सगळ्या आदरणीय महानुभावांना सकल हिंदू समाजाच्या उद्धारासाठी एकत्र आणून एखाद्या संघटनेची स्थापना करणे हे श्री गुरुजींशिवाय क्वचितच अन्य कोणाला शक्य झाले असते असे वाटते. पुढे श्री गुरुजींच्या पुढाकाराने कर्नाटकातील उडुपी येथे १३-१४ डिसेंबर १९६९ ला उडुपी पीठाधीश्वर पेजावर मठाचे स्वामी विश्वेशतीर्थ यांच्या नेतृत्वात झालेले विश्व हिंदू परिषदेचे संत संमेलन हे हिंदू धर्माच्या इतिहासातील एक ऐतिहासिक व सामाजिक परिवर्तनाचा टप्पा मानले गेले. या संमेलनामुळे हिंदू समाजात क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. या संत संमेलनात चारही शंकराचार्यांसमवेत हिंदू धर्मातील सर्व संप्रदायांच्या साधू-संतांनी एकत्र येऊन एकमुखाने “हिंदवः सोदरा सर्वे, न हिंदू पतितो भवेत” (अर्थात: सर्व हिंदू सगे सहोदर भाऊ आहेत, कोणताही हिंदू पतित किंवा अस्पृश्य नाही) असा ऐतिहासिक उघोष केला. या संमेलनातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे ‘अस्पृश्यतेला हिंदू धर्मात किंवा धर्मशास्त्रात अजिबात स्थान नाही’ असा ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आला. सर्व धर्माचार्यांनी हिंदू धर्मातून अस्पृश्यता आणि जातीभेद नष्ट करण्याचे आवाहन केले.
श्री गुरुजींचा आनंद गगनात मावेना. आपल्या स्वभावाच्या विपरीत त्यांनी जोरजोराने टाळ्या वाजवल्या. जल्लोष केला. कदाचित तो त्यांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण होता. या संत संमेलनात शैव, वीरशैव, मध्व, वैष्णव, जैन आणि बौद्ध यांसारख्या सर्व हिंदू संप्रदायांचे प्रतिनिधित्व होते. याच संमेलनात इतर धर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घेण्याच्या (‘घर वापसी’) विचारप्रक्रियेला व कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर औपचारिक मान्यता मिळाली. या ऐतिहासिक अधिवेशनात विश्व हिंदू परिषदेचे बोधवाक्य “धर्मो रक्षति रक्षितः” आणि बोधचिन्ह “अक्षय वटवृक्ष” निश्चित करण्यात आले. आणि आज त्याच विश्व हिंदू परिषदेचा विशाल वटवृक्ष आपल्या डोळ्यासमोर आहे. रामजन्मभूमी आंदोलनापासून, प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येत मंदिर उभे करण्यापर्यंत. हजारो सेवाकार्यांपासून गोरक्षणापर्यंत आणि बजरंग दल, दुर्गा वाहिनीपासून जगातल्या ज्या ज्या देशात हिंदू समाज राहतो त्या त्या देशात आपले मजबूत संघटन उभे करण्यापर्यंत. संस्कार, सेवा आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर विश्व हिंदू परिषदेने घेतलेली गरुड भरारी बघितली की ऊर अभिमानाने भरून येतो.
आज दिसणाऱ्या या सगळ्या युगपरिवर्तनाची पायाभरणी १९६० च्या दशकापासून श्री गुरुजींनी केली होती. सरसंघचालकपदाची धुरा समर्थपणे ३३ वर्षे सांभाळून वयाच्या ६७ व्या वर्षी श्री गुरुजींच्या कृतार्थ जीवनाची सांगता झाली.
आज त्यांचा स्मृतिदिन… श्री गुरुजींना कोटी कोटी वंदन!!!
शत्रु को भी जीतता था आपका चारित्र्य उज्वल
निन्दकोंपर मात करता आपका व्यवहार निर्मल ।
मातृभू की वेदना जो आपके मन में बसी थी
पा सके अल्पांश भी तो पूर्ण होगी साधना ॥
चाहिये आशिश माधव नम्र गुरुवर प्रार्थना ॥
– पराग नेरूरकर